प्राणवायूचा पुरवठा ठप्प; ३० बालकांचा तडफडून मृत्यू

0
44

गोरखपूरच्या बीआरडी रुग्णालयातील घटना
गोरखपूर, ११ ऑगस्ट 
उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथील बीआरडी रुग्णालयाचा प्राणवायू पुरवठा ठप्प झाल्यामुळे ३० बालकांचा तडफडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे गोरखपूर हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे.
प्राणवायू पुरवणार्‍या कंपनीने पुरवठा थांबविल्यामुळे या बालकांना आपला जीव गमवावा लागला. रुग्णालयाने ६९ लाख रुपये न भरल्याने कंपनीने ऑक्सिजनचा पुरवठा गुरुवारी रात्रीपासून थांबविला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बाबा राघवदास असे या रुग्णालयाचे पूर्ण नाव आहे. वास्तविक, रुग्णालयातील द्रवरूप ऑक्सिजन गुरुवारीच बंद झाले होते. त्यानंतर आज उर्वरित सिलेंडरही रिकामे झाले. या स्थितीतही बालकांनी ऍम्बू बॅगच्या मदतीने दोन तास काढले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
६९ लाख रुपयांची थकबाकी तातडीने भरण्यात यावी, यासाठी कंपनीकडून सातत्याने तगादा लावण्यात येत होता. पण, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. मेंदूज्वर वॉर्डमधील रुग्णांना ऍम्बू बॅगच्या आधारावर ठेवण्यात आले. मेंदूज्वर विभागात सिलिंडरची प्रचंड कमतरता भासली होती, अशात द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठाही बंद झाला. या रुग्णालयात दोन वर्षांपूर्वीच द्रवरूप ऑक्सिजनचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून रुग्णालयातील ३०० रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होत असे. मात्र या ऑक्सिजनचे बिल थकले होते.
मेंदूज्वर विभागाच्या वॉर्ड क्रमांक १०० मध्ये प्रत्येक दीड तासाला ऑक्सिजनचे १६ सिलेंडर खर्च होत असतात. आज दुपारी १२ च्या सुमारास सर्व सिलेडर्स संपले होते.
मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. यात जे कोणी दोषी असतील, त्यांची कदापि गय केली जाणार नाही. अतिशय कठोर शिक्षा केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (वृत्तसंस्था)