अयोध्येवर ५ डिसेंबरपासून अंतिम सुनावणी

0
52

– सुप्रीम कोर्टाचा निर्णय
– कुठल्याही स्थितीत तहकुबी नाही
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट
रामजन्मभूमी-बाबरी वादावर येत्या ५ डिसेंबरपासून अंतिम सुनावणी सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी घेतला. कोणत्या स्थितीत सुनावणी तहकूब होणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेत गठित करण्यात आलेल्या विशेष न्यायासनापुढे आज सुमारे दीड तास या मुद्यावर प्रभावी चर्चा झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या २०१० मधील निकालाला आव्हान देणार्‍या याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्याचा मतैक्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. न्या. अशोक भूषण आणि न्या. अब्दुल नाझीर यांचाही या विशेष न्यायासनात समावेश आहे. उच्च न्यायालयाने आपल्या ऐतिहासिक निकालात अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी २.७७ एकर जागेच्या त्रिभाजनाचा निर्णय दिला होता. सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लला यांनी ही जागा समान प्रमाणात वाटून घ्यावी, असा हा तोडगा होता.
आजच्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवजांचे भाषांतर करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला आहे. मूळ कागदपत्रे आणि दस्तऐवज हे संस्कृत, पारशी, उर्दू आणि अरबी भाषांमध्ये आहे. त्यांच्या भाषांतरांचे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही, असे सुन्नी वक्फ बोर्डाने सांगितले. त्यावर न्यायालयाने दस्तऐवजाच्या भाषांतरासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.
सर्वात आधी सात भाषांमधील दस्तऐवजांचे भाषांतर करण्यात यावे, असे न्यायालयाने सांगितले. विशेष म्हणजे या प्रकरणाशी संबंधित ९ हजार पानांचे दस्तऐवज आणि साक्षीदारांच्या साक्षी असलेली ९० हजार पाने पाली, पारशी, संस्कृत, अरबीसह विविध भाषांमध्ये आहे. त्यांचे भाषांतर करण्याची मागणी सुन्नी वक्फ बोर्डाने केली होती. (वृत्तसंस्था)