हाफीझ सईद मुस्लिमांसाठी कलंक

0
89

– ताबडतोब फासावर लटकवा
-• उलेमांच्या परिषदेत ठराव पारित
मुंबई, ११ ऑगस्ट 
क्रूर अतिरेकी हाफीझ सईद हा मुस्लिमांसाठी कलंक असून इस्लामचा आणि हिंदुस्थानचा सर्वांत मोठा शत्रू आहे. त्याच्या संघटनांवर केवळ प्रतिबंध लावून चालणार नाही, तर त्याला तत्काळ फासावर लटकविले जावे आणि त्याच्या सर्व संघटना या अतिरेकी असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित करून त्या नेस्तनाबूत कराव्यात, अशी मागणी गुरुवारी मुंबईत आयोजित परिषदेत देशभरातील हजारो उलेमांनी केली.
या परिषदेत केवळ हाफीझ सईदच नव्हे, तर पाकिस्तानात कार्यरत असलेल्या अन्य अतिरेकी संघटनाही नेस्तनाबूत कराव्यात अशीही मागणी या परिषदेत करण्यात आली. हे लोक मानवतेसाठी कलंक असून ते निष्पाप लोकांचा क्रूरपणे बळी घेत आहेत. त्यासाठी ते इस्लाम या नावाचा वापर करीत आहेत. इस्लाममध्ये दहशतवादाला कोणतेही स्थान नाही. त्यांच्या या अतिरेकी कारवायांमुळे केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील मुस्लिम समुदायाकडे लोक संशयाने बघत असतात. या लोकांनी इस्लामच्या नावावर जो उच्छाद मांडला आहे, त्याचे कुणीही समर्थन करणार नाही. म्हणून या लोकांवर केवळ प्रतिबंध घालून चालणार नाही तर या सर्वांना फाशीचीच सजा व्हायला हवी. त्यांची जागा केवळ जहन्नुममध्येच (नरक) आहे, असेही यावेळी अनेक उलेमांनी आपल्या भाषणात सांगितले.
मदरसा दारूल उलूम अली हसन अहले सुन्नत यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या परिषदेत वरील ठराव पारित करण्यात आला आणि सर्व उलेमांनी दोन्ही हात उंचावून या ठरावाला मंजुरी दिली. हा ठराव वाचून दाखविणारे अब्दुर रहमान अंजरिया म्हणाले की, हाफीज सईद हा जगासाठी सर्वात मोठा धोका आहे. त्यांनी हाफीझची संघटना जमात-उद-दावाचाही धिक्कार केला. याच ठरावात, मसूद अझहर आणि सय्यद सलाहुद्दीन यांनाही फासावर लटकविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जगाभरात ज्या ६४ अतिरेकी संघटना कार्यरत आहेत, त्या सर्व नेस्तनाबूत करण्यात याव्यात, अशी मागणी या ठरावान्वये संयुक्त राष्ट्रसंघाला करण्यात आली. या ठरावाच्या प्रती युनो आणि दहशतवाद पीडित सर्व देशांना पाठविण्यात येणार आहेत. याची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठविण्यात आली आहे. या परिषदेत देशभरातून हजारोंच्या संख्येने उलेमा आणि मुस्लिम विचारवंत सामील झाले होते.
परिषदेनंतर काही प्रमुख उलेमा वाहिन्यांशी बोलताना म्हणाले, हाफीझच्या संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी होते. पण, बंदी घालून काय फायदा? त्यांच्या कारवाया तर सुरूच असतात. त्यामुळे या लोकांना पकडून फासावर लटकविणे हाच सर्वात योग्य उपाय आहे. त्याशिवाय हा दहशतवाद नष्ट होणार नाही.