सर्वोच्च पदांवर आता सामान्य लोक : मोदी

0
93

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट 
देशातील सर्वच सर्वोच्च घटनात्मक पदांवर गरीब कुटुंबातून आलेल्या व्यक्ती विराजमान होणे हे भारतील लोकशाहीचे सौंदर्य आणि वैशिष्ट्‌य असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेत सभापतिपदाचीही सूत्रे स्वीकारली. यावेळी संपूर्ण सभागृहाने नायडू यांचे स्वागत केले. नायडू यांच्या सन्मानार्थ भाषण करतांना मोदी म्हणाले की, स्वतंत्र भारतात जन्म झालेले नायडू देशाचे पहिले उपराष्ट्रपती आहे. आपल्या राजकीय आयुष्याचा सर्वाधिक काळ संसदभवनाच्या परिसरातच घालवलेलेही नायडू हे पहिले उपराष्ट्रपती असावे. नायडू शेतकर्‍याचे पुत्र आहेत, त्यामुळेच त्यांना देशातील गरीब आणि निम्न वर्गातील लोकांच्या समस्यांची चांगली जाणिव आहे.
मोदी यांच्या वक्तृत्वशैलीची तसेच शब्दांवर कोटी करण्याच्या कौशल्याची मुक्तकंठाने प्रशंसा करतांना मोदी म्हणाले की, नायडू यांचे भाषण म्हणजे फक्त शब्दांचा खेळ नाही, तर ते अंतकरणाला भिडत असते. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानपदावर गरीब कुटुंबातून आलेल्या व्यक्ती विराजमान झाल्या आहेत, हे फक्त भारतातील लोकशाहीतच शक्य आहे, आपल्या लोकशाहीची ते एकप्रकारचे सौंदर्य आहे, असे मोदी म्हणाले.
जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून नायडू पुढे आले, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही नायडू यांनी देशाला दिलेली मोठी देणगी आहे. ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात नायडू यांचे मोठे योगदान आहे, देशात असा एकही खासदार नसेल ज्याने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामे आपल्या मतदारसंघात यावी म्हणून नायडू यांची भेट घेतली नसेल.
श्रीमंतांचेही योगदान
स्वातंत्र्यलढ्यात तसेच नंतर देशातील लोकशाही मजबूत करण्यात श्रीमंताचेही तेवढेच योगदान आहे, हे योगदान कोणाला विसरता येणार नाही, याकडे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी लक्ष वेधले.
मोतीलाल नेहरु अतिशय श्रीमंत होते. वकील म्हणून त्या काळात त्यांची दररोजची प्रॅक्टिस काही कोटी रुपयांची होती, महात्मा गांधीही अतिशय समृद्ध अशा कुटुंबातील होते, वकिली करण्यासाठी ते दक्षिण ऑफ्रिकेतही गेले होते, याकडे लक्ष वेधत आझाद म्हणाले की, असे अनेक लोक त्या काळात होते, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी आपल्या श्रीमंतीवर पाणी सोडले. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात जे सहभागी झाले, यात गरीब आणि श्रीमंत असा भेद करणे योग्य नाही. या सवार्र्मागे एकच ताकद होती, ती म्हणजे लोकशाहीची. सुभाषचंद बोस, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, मौलाना आझाद, सरदार पटेल यांचे स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान कोणी विसरू शकणार नाही. हे सर्व संपन्न परिवारातील होते, पण या सर्वांनी देशाला असे संविधान दिले, ज्यामुळे आज कोणीही काहीही बनू शकतो.
नायडू यांचे अभिनंदन करतांना आझाद म्हणाले की, तुम्ही याआधी एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष होता, पण आता तुम्हाला सर्वांना न्याय द्यायचा आहे. तुमच्या खुर्चीमागे तराजू आहे, त्याची जाणीव तुम्हाला ठेवावी लागणार आहे. या पदावर बसलेल्या व्यक्तीचा ना धर्म असतो, ना कोणता पक्ष, तो फक्त मनुष्य असतो.
अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक सदस्यांनी नायडू यांच्या सन्मानार्थ मनोगत व्यक्त केले.
कामकाजात अडथळा आणू नका : नायडू
सत्काराला उत्तर देतांना केलेल्या भाषणात सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणून मूल्यवान वेळेचा दुरुपयोग करू नये, असे आवाहन केले.
एकीकडे लहान पक्ष आणि त्याचे सदस्य आपल्याला सभागृहात बोलण्याची संधी मिळत नाही, अशी तक्रार करतात, याकडे लक्ष वेधत नायडू म्हणाले की, सभागृहाच्या कामकाजात अडथळा आला नाही, तर सर्व सदस्यांना बोलण्याची संधी मिळू शकते. गरिबीचे निर्मूलन, समाजातील विषमता, सत्तेचा दुरुपयोग तसेच देशातील अन्य समस्यांवर चर्चेचा आग्रह सदस्यांनी धरला पाहिजे, जेणेकरून या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला कायदे करते येतील, असे नायडू म्हणाले.
मतभेद विसरून सर्वांनी देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन करत नायडू म्हणाले की, सर्वसामान्य माणसाच्या चेहर्‍यावर हसू आणण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करायचे आहे. आमच्याजवळ वेळ अतिशय कमी आहे, त्यामुळे आमच्यावर घटनेने जे काम सोपवले आहे, ते आम्ही केले पाहिजे. संघराज्य प्रणाली मजबूत करण्याची आवश्यकता प्रतिपादित करत नायडू म्हणाले की, मी आता कोणत्याही पक्षाचा नाही, तर सर्वपक्षीय झालो आहे. त्यामुळे सगळ्यांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील.
नायडू यांनी घेतली शपथ
देशाचे १३ वे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू यांनी आज सूत्रे स्वीकारली. याबरोबर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष या चारही प्रमुख आणि घटनात्मक पदांवर संघ विचारधारेची माणसे विराजमान झाली आहेत. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आज सकाळी झालेल्या एका समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विशेष म्हणजे नायडू यांनी हिंदीतून शपथ घेतली. यावेळी मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सपाचे मुलायमसिंह यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तारिक अन्वर, तृणमूल कॉंग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. व्यंकय्या नायडू यांच्या पत्नी उषाही यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. उपराष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी व्यंकय्या नायडू यांनी राजघाट या महात्मा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. त्याचप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्याही प्रतिमेला माल्यार्पण केले.(तभा वृत्तसेवा)