नितीश, सुशील ३०० कोटींच्या घोटाळ्याचे सूत्रधार ः लालूप्रसाद

0
30

राजकीय काडीमोड झाल्यानंतर शाब्दिक हल्ले सुरूच
पाटणा, ११ ऑगस्ट 
मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे दोन वर्षांपूर्वीच्या ३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. भागलपूरमध्ये या घोटाळ्याची माहिती मिळाली असून, या प्रकरणी सीबीआयच्या पाटणा कार्यालयात तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नितीश कुमार आणि सुशीलकुमार मोदी यांना हा मोठा घोटाळा उघड होऊ शकतो, याबाबतची जाणीव झाली. त्यावेळी त्यांनी तीन पक्षांचा समावेश असलेली महाआघाडी तोडून कारवाईपासून वाचण्यासाठी ते एनडीएमध्ये दाखल झाले आणि सरकार बनवले, असा दावा लालूप्रसाद यांनी केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
सृजन महिला विकास सहयोग समिती लि.ने बेकायदेशी रीत्या सरकारी तिजोरीला चुना लावला असून त्याचे संरक्षक नितीश कुमार व सुशीलकुमार मोदी असल्याचा आरोप लालूंनी केला आहे.
सीबीआयमध्ये तक्रार दाखल करताच केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी लालूप्रसाद यांनी केली आहे.
ते म्हणाले की, घोटाळा समोर आल्यानंतर नितीश कुमार यांनी लगेच एका विशेष चौकशी समितीची स्थापना करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा योग्य तपास केल्यास अनेक नेते आणि अधिकारी अटक होऊ शकतात. हा घोटाळा २०१५-१६ मधील असून, नितीश कुमार मुख्यमंत्री व सुशीलकुमार मोदी उपमुख्यमंत्रिपदी होते. (वृत्तसंस्था)