विदेशी तुरुंगात साडेसात हजार भारतीय कैदी

0
28

किमान ५० महिलांचाही समावेश
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट 
अनेक देशांमधील कठोर कायद्यांमुळे विविध देशांतील ८६ तुरुंगांमध्ये जवळपास ७,६२० भारतीय नागरिक कैद आहेत. त्यात किमान ५० महिलांचा समावेश आहे. त्यातील काही महिला श्रीलंका, चीन, नेपाळ आणि आखाती देशांमधील तुरुंगांमध्ये आहेत, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी दिली.
विदेशी तुरुंगांमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसंदर्भातील प्रश्‍नावर उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री अकबर यांनी सांगितले की, विदेशी तुरुंगांमध्ये कैद असलेल्या एकूण भारतीय नागरिकांपैकी ५६ टक्के नागरिक आखाती देशांत आहेत. त्यात सर्वाधिक २,०८४ नागरिक हे सौदी अरेबियात कैद आहेत. त्यांच्यावर लाच, चोरी आणि फसवणुकीचे आरोप आहेत. काही तर मद्यपान केल्याप्रकरणी तेथील तुरुंगांमध्ये आहेत. सौदी अरेबियात मद्यपान आणि विक्री करणे गुन्हा समजण्यात येत असून, अनेकांना तुरुंगांत टाकले आहे.
थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये भारतीय नागरिकांना अंमली पदार्थ आणि मानवी तस्करीसह व्हिसासंबंधी गुन्ह्यातही अटक करण्यात आली आहे. तामिळनाडूतील काही नागरिक बांगलादेश, भूतान आणि ब्रुनेईच्या तुरुंगांमध्ये कैद आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये ११५ कैदी आहेत. युरोपीय देश तेथील तुरुंगांमध्ये असलेल्या भारतीय कैद्यांची माहिती देत नाहीत, अशी माहितीही सरकारने सभागृहाला दिली. (वृत्तसंस्था)