मराठ्यांचा मोर्चा वॉशिंग्टन पोस्टमध्येही झळकला

0
153

वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट 
अमेरिकेतील प्रसिद्ध द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने ९ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाची दखल घेतली आहे. आरक्षणासहित अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाने मुंबईमध्ये काढलेला ५८ वा मोर्चा ऐतिहासिक ठरल्याचे समजण्यात येत आहे.
गर्दीचा विक्रम मोडीत काढलेल्या मराठा मोर्चाची चर्चा देशासह परदेशातही सुरू आहे. मराठा समाजाला शासकीय नोकर्‍या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, यासहीत अन्य मागण्यांसाठी मराठे मुंबईतील आझाद मैदानात धडकले होते. मराठा क्रांतीच्या या विजयी मोर्चाचे छायाचित्रासह सविस्तर वृत्तांकन ’द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या दिवशी दक्षिण मुंबईतील शाळा व काही व्यवसायदेखील बंद ठेवण्यात आले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चाच्या मार्गावरील वाहनांची रहदारी पर्यायी मार्गावर वळवण्यात आली होती, असा उल्लेख करीत अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणही बातमीत मांडले आहे.
कोपर्डी बलात्काराच्या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ सुरुवातीला मराठ्यांनी हा मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर समाजातील अन्य मुद्यांकडेही लक्ष वेधण्यास सुरुवात झाली. दरम्यान, कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणानंतर या मोर्चाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की, आता त्याचे एक वादळच संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. (वृत्तसंस्था)