कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास देश सज्ज

0
33

•अरुण जेटली यांची लोकसभेत ग्वाही
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट 
डोकलामच्या मुद्यावर भारत आणि चीनमध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली असतानाच, कोणत्याही बाह्य संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय सशस्त्र दले पूर्णपणे सज्ज आणि सक्षम असल्याची ग्वाही संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी आज शुक्रवारी लोकसभेत दिली.
डोकलाम सीमेवर चिनी सैनिकांच्या हालचाली वाढत आहेत आणि पाकिस्तानची सुरक्षा क्षमता भारतापेक्षाही सरस असल्याचे एका वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याचे मत याकडे सदस्यांनी लक्ष वेधले असता, जेटली म्हणाले की, काळजी करण्याचे मुळीच कारण नाही. कोणत्याही आकस्मिक संकटाचा आणि धोक्याचा सामना करण्यासाठी आपली सशस्त्र दले सक्षम आहेत.
युद्धाच्या प्रसंगी ४० दिवस पुरेल इतका शस्त्र व दारुगोळा असणे आवश्यक असताना आपल्या देशात केवळ २२ दिवस पुरेल इतकाच दारुगोळा आहे, या कॅगच्या अहवालाबाबतही सदस्यांनी विचारणा केली होती. आता ही स्थिती बदलली आहे. अत्याधुनिक शस्त्र आणि दारुगोळ्याचा मुबलक साठा तयार करण्यात आला आहे, असे सांगताना आपल्या जवानांच्या क्षमतेवर शंका घेऊ नका, असे आवाहन जेटली यांनी केले.
माघार ही केवळ अफवा
बीजिंग : भारताशी तडजोडीची भूमिका स्वीकारण्यात आली असून, चिनी सैन्य मागे घेण्यास तयार आहे, या निव्वळ अफवा आहे, असा खुलासा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. डोकलाकमधून चीनचे सैनिक १०० मीटर मागे हटण्यास तयार आहे, तर भारताने त्यांना २५० मीटर मागे जाण्यास सांगितले असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते.
चीन भारताच्या अवास्तव मागण्या कधीही मान्य करणार नाही, असेही चीनने म्हटले आहे. डोकलामवर चीनचा हक्क असताना भारताने चीनच्या हद्दीत घुसखोरी केली, असेही सांगण्यात आहे.
गावे रिकामी करणार नाही : भारतीय लष्कर
दरम्यान, सीमेवर तणाव निर्माण झाल्याने भारतीय लष्कराने या परिसरातील गावे रिकामी करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली असतानाच, अशी कोणतीही घडामोड या भागात सुरू नसल्याचे भारतीय लष्करातर्फे आज स्पष्ट करण्यात आले. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून तिबेटमध्ये सैनिक व तोफांसोबथत हवाई संरक्षण युनिटमध्ये वाढ करण्यात येत असल्याची माहिती आहे.
प्रत्यक्षात मात्र, सीमेजवळ चीनकडून अशा कोणत्याही हालचाली होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गावे रिकामी करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचे लष्करातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
भारत आमचा मित्र : अमेरिका
भारत आमचा सच्चा मित्र आहे. डोकलामवरून निर्माण झालेल्या स्थितीवर आमची बारीक नजर असून, हा वाद चिघळविण्याऐवजी भारत आणि चीन दोघांनीही चर्चेतून हा वाद निकाली काढावा, अशी भूमिका अमेरिकेने घेतली आहे.
ही समस्या सोडविण्यासाठी आवश्यकता भासल्यास मध्यस्ती करण्याची आमची तयारी आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.(तभा वृत्तसेवा)