जगू दे माझे मला…

0
28

समस्या
गेल्या आठवड्यात अप्रूपच कानावर आलं. आमच्या वीणा वहिनींनी वेगळं होण्याचा म्हणजे घटस्फोटाचा प्रस्ताव वसंतापुढे मांडल्याचे समजले. यातलं अप्रूप असं की, त्यांच्या लग्नाला चांगली ३५ वर्षे झाली होती. वरकरणी मुलंबाळं, घरदार, गाड्या, गाठीला बर्‍यापैकी बँक बॅलन्स या सुखवस्तू संसाराच्या सगळ्या सुखसोयी हाताशी होत्या. वसंता आमचा सहकारी होता, होता थोडा सनकी पण मित्र होता. बातमीची शहानिशा सांगोवांगी करून घेण्याची गरज नव्हती. कारण आमची फॅमिली फ्रेण्डशिप असल्याने या नाजूक विषयाला थेट हात घालण्याची मुभा होती.
एके दिवशी ठरवून मुलगा-सून ऑफिसला गेल्यावर आम्ही उभयता त्यांच्या घरी गेलो. आमच्या येण्याचे कारण त्यांच्याही लक्षात आले होतेच. आम्हालाही ते लपविण्याचे कारण नसल्याने, हे काय ऐकतो आहे? अशी सुरुवात केली. त्यापैकी वसंताने तूच ऐक आणि बघ तिचा वेडपटपणा, असं म्हणत गुळणी धरली आणि जणूकाही हे कुणा तिसर्‍याबद्दल आहे, असा भाव पांघरला.
वहिनींनी उत्तरादाखल जी कैफियत मांडली ती थोडक्यात अशी- एका नववधूच्या गुलाबी अपेक्षांसहित आणि सोनेरी स्वप्न बघत वीणावहिनी या घरात आल्या. त्यावेळच्या तुटपुंज्या मिळकतीत वसंताच्या भावा-बहिणीसहित सासू- सासर्‍यांच्या संसाराचा धबडगा संभाळला, सावरला. स्वतःच्या संसाराची उस्तवारी काढली, कधी कर्तव्य म्हणून तर बहुतेकदा मायेची ओढ म्हणून. कुठलीच गृहिणी- आई परतफेडीच्या हव्यासाने हे करत नसली, तरी किमान आपल्या जोडीदाराला याची जाणीव असावी, त्याची पोच एकान्तात तरी मिळावी, ही आस नाकारणे स्वतःचीच प्रतारणा ठरेल. प्रपंचाची अगणित अवधानं-व्यवधानं पाळताना संबंधातील कोमलता करपणे समजण्यासारखे असले, तरी तो प्रभाव तात्पुरता असायला हवा. शिवाय नाही जमत एखाद्याला असे ऊठसूट आपल्या हळवेपणाचे प्रदर्शन करायला, असे स्वतःचे सांत्वन करून घेत असे .
लोकांकडे पती-पत्नी संबंध लोणच्यासारखे असतात, जसजसे मुरत जाते तसा पौष्टिक गुणधर्मासहित स्वाददेखील बहरतो. इथे संबंध कुजताहेत. दैनंदिन व्यवहाराची एकही बाब अशी नाही जिथे आमचे एकमत होते. सौख्य उपभोगणे नशिबात असावे लागते. आतापर्यंत यांच्या बर्‍या-वाईट निर्णयाला रुकार भरत आले. यांचे वागणे, यांच्या सवयी निकोप, निर्दोष मानून साथ दिली. आवडी-निवडी तर यानांच होत्या. पत्नी म्हणून माझा तो अधिकार बहुधा लग्नातल्या लाजाहोमातच स्वाहा झाला होता.
आपल्या समाजात स्त्रीला निवडीचे स्वातंत्र्य तसेही अभावानेच असते. लग्नाच्या बाजारात उपवर मुलगी सुस्वरूप, बहुगुणसंपन्न, सोशीक, सुशील आणि काय काय असावी, या मागण्यांसहित नवरा मुलगा मुली नाकारण्याचा अधिकार गाजवत असतो.
आम्ही बायका पदरी पडलं अन् पवित्र झालं, या न्यायानं हरतालिका-वड पूजत सातजन्मासाठी सौभाग्य विनवीत असतो. दिसणं-नेसणं, वागणं-बोलणं पतीच्याच मर्जीनं. आमचं शिक्षण, समजुतदारी, ह्यांच्या हो त हो मिळविण्यापुरतीच. आता पुरे झाली इतकी फरफट. उतरणीला लागलोय्, तब्येतीच्या कुरबुरी सुरू झाल्यात, खरं तर आताच एकमेकांची साथ-सोबत असावी असा सुज्ञ व्यावहारिक विचार करणारेच बहुतांश आहेत, अगदी मुलंसुद्धा.
पावसांत भिजण्याचे वय निघून गेले असले, तरी एकदा या बाजूने निष्पक्षपणे आत डोकावणार्‍यास डहुळलेले अंतरंग दिसेल. स्वतंत्रतेचा मोकळा श्‍वास उरात भरून घेऊन जी घुसमट आजवर झाली आहे तिचा विसर पडतो का बघायचंय.
जे झालं त्याची कारणं नकोयत, स्पष्टीकरणं नकोयत, कुणाकडून काही नकोय्, पण कुणाची काही सोबतपण नकोय्, अगदी नातं-नावसुद्धा. उरलेलं सगळं नव्यानं पण फक्त स्वतःचं जगायचंय्. न फिरे माघारी या निर्धाराने जितकं जमेल तोवर, जसं जमेल तसं. घाबरू नका, काहीही आचरटासारखं करणार नाही, दोन्ही घरांची आब राखून, संस्कारांची बूज राखून जगेन. तेव्हा भाऊजी, नो मोअर युक्तिवाद, नो मोअर परस्युएशन. द्यायच्याच तर शुभेच्छा द्या. झाला तर त्याचाच उपयोग होईल. हे वेगळेपण, हा वेडेपणा आहे का? आणि कशासाठी? मी, वसंता आणि माझी पत्नी सुन्न झालो होतो. अगम्य काळाच्या उदरात काय दडलंय् ते यथावकाश उघड होईलच. तोवर…
बाबा नरवेलकर
९८६००६०२१२