प्रजाहितदक्ष राष्ट्रमाता अहल्याराणी होळकर!

0
42

स्मरण
प्राचीन काळी स्त्रियांना राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक यापैकी एकाही गटाचा अधिकार नव्हता, तर फक्त चूल आणि मूल यामध्येच गुंतून राहून घराच्या चार चौकटीच्या आत राहावे लागत होते. भारतामध्ये फक्त पुरुषप्रधान व्यवस्था होती. या व्यवस्थेला जोरदार तडाखा देऊन भारतामध्ये शांतता व समता निर्माण करण्याचे काम लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहल्याराणी होळकरांनी केले. जिचा राजकीय वारसा म्हणून भारतामध्ये नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये ‘सर्वोत्कृष्ट पहिली स्त्री प्रशासक’ म्हणून गौरव आहे. समताप्रिय, प्रजाप्रिय, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष अशा कितीतरी पदव्यांनी लोकांनी त्यांचा गौरव केला. अहल्यामाईने आपल्या आयुष्यात कितीतरी आप्तस्वकीयांचा मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर पाहिला, परंतु मनाने खचून न जाता एकटी सह्याद्री पर्वतासारखी उभी राहून स्वराज्यासाठी हातात तलवार घेऊन ती लढत राहिली.
‘अहल्याराणीचा धर्म म्हणजे तहानलेल्यांना पाणी आणि भुकेलेल्यांना अन्न जेवू घालणे हाच होता.’ अहल्यामाईंचे वडील मानकोजी शिंदे यांनी अहल्यामाईवर लहानपणापासून लिहिण्या-वाचण्याचे संस्कार केले. त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी निर्माण झाली. एकेक पुस्तक वाचून त्यांनी ग्रंथालय तयार केले. भारतातील सर्व घडामोडीवर चिकित्सा करून त्यांनी पुरोगामित्व स्वीकारले. अहल्यामाईंचे पती शूरवीर सुभेदार खंडेराव होळकर हे कुंभेरीच्या किल्ल्यात जाटांसोबत लढताना इ. स. १७५४ साली शहीद झाले. युद्धात खंडेरावांना वीरमरण आले. त्याचा सार्थ अभिमान अहल्यामाईस वाटत होता, त्या सती गेल्या नाहीत. उलट, सती प्रथेविरुद्ध मोहीम चालविली व सनातनी धर्माला ठणकावून सांगितले, ‘‘बाई जर मेली तर एकही पुरुष सती का जात नाही. ही तर केवळ स्वार्थी कुटुंबांनी लादलेली उजेडाकडून अंधाराकडे नेणारी एक अंधरूढी.’’
पेशव्यांच्या काळामध्ये अस्पृश्यता व जातिविषमतेला महत्त्व दिले जाई, परंतु पेशव्यांचे समकालीन असलेल्या होळकर राज्याने जातिविषमतेला महत्त्व दिले नाही. उलट सर्वांना समान न्यायाची वागणूक होती. कोणत्याही व्यक्तीला जर न्याय मिळाला नाही, तर त्यास विना अडथळा अहल्यामाईंसमोर आपली बाजू मांडता येत होती. त्यांच्या दरबारामध्ये कठोर शिस्त व वेळेचे भान पाळले जाई. राज्यकारभाराचा दीर्घकाल अहल्याराणीच्या वाट्याला आला आणि नेमके याच कालावधीत त्या कुशल प्रशासक, दानशूर राज्यकर्त्या, अलौकिक राष्ट्रमाता म्हणून समोर आल्या. राजे मल्हारराव सतत उत्तरेच्या मोहिमेवर राहात असल्यामुळे, इंदूर संस्थानची जबाबदारी अहल्याराणी सांभाळत असत. इथेच त्या थांबल्या नाहीत, तर आपल्या पतीसोबत रणांगणावर हातात तलवार घेऊन लढाईत सामील होत. लढाईतील डावपेचांचे प्रत्यक्ष आकलन करून घेत असत. अशा त्या एकमेव राजमाता होत्या. प्रजा हाच धर्म मानून उत्कृष्ट असा भारताचा सांस्कृतिक वारसा अहल्यामाईने जोपासला. पंढरपूर, जेजुरी, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, द्वारका, बद्रीनाथ, रामेश्‍वर इत्यादी ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यांनी मशिदीसुद्धा बांधल्या. यातून हिंदू-मुस्लिम एकता, समानता, बंधुता वाढत गेली. कोणताही धर्म, वंश, जात यामध्ये कधीही भेदभाव मानला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या पंधराव्या कलमामध्ये सदर बाब नमूद केली आहे.
अहल्याराणी होळकरांचा समकालीन असलेला मुंबई इलाख्याचा गव्हर्नर सर जॉन माल्कम हा इंग्रज अधिकारी अहल्याराणीच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना म्हणतो, ‘‘अहल्यामाईंचे चरित्र गंगेसारखे निर्मळ आणि राज्यकारभार अत्यंत वाखणण्याजोगा होता.’’ वास्तविक पाहता जॉन माल्कम होळकरांचा शत्रू होता, परंतु दुश्मनानेसुद्धा अहल्यामाई होळकरांचे पोवाडे गायले. इतकी ताकद अहल्यामाई होळकरांच्या चरित्रात आहे. त्यांनी नदीवर बांधलेले घाट, यात्रेकरूंसाठी धर्मशाळा, अन्नछत्रे, उत्तम प्रवास व्हावा म्हणून रस्ते, पूल यांचीसुद्धा बांधणी केली आहे. याशिवाय स्त्रियांना सैनिकी प्रशिक्षण देऊन जगातील स्त्रियांची पहिली लढवय्यी फलटण अहल्याराणीने तयार केली. भारत सरकारने कृतज्ञता म्हणून एक महिला बटालियन उभारून तिला ‘अहल्याराणी बटालियन’ किंवा ‘ब्रिगेड’ असे नाव द्यावे. राजस्थानच्या चंद्रावत या राजपूतांनी होळकरांविरुद्ध केलेल्या बंडाचा बीमोड करण्याची जबाबदारी शरीफभाई या मुसलमान शूरवीरावर सोपवून, अहल्यामाईने सैनिक तुकडीचे प्रमुखपद दिले होते. होळकर राज्यात मशीद पाडून मंदिर बांधल्याचे इतिहासात कुठेही नमूद नाही. उलट सर्वांना धार्मिक स्वातंत्र्यसुद्धा अहल्याराणीने दिले. लेखिका विजया जहागिरदार लिहितात की, श्रावणात आणि इतर वेळीही मुस्लिम, फकीर आले तर अहल्यामाई त्यांनाही चादरीसाठी खैराती देत असत. अहल्यामाई म्हणायच्या, ‘‘आम्ही अल्लास वेगळे समजत नाही.’’ सर्वधर्म समभावासाठी त्यावेळेस अहल्यामाईने कार्य केले. मंदिरे बांधलु याचा अर्थ त्या अत्यंत धार्मिक होत्या असे नाही, तर त्या प्रयत्नवादी होत्या. राष्ट्रसंत तुकडाजी महाराज यांच्या शब्दात सांगावेसे झाल्यास-
सर्वाभूती प्रेमभाव| वाढवावा गुणगौरव| यासाठीच गावोगाव| मंदिरे केली निर्माण|
इतिहासात जर डोकावून पाहिले तर असे लक्षात येईल की, त्या काळी अहल्यामाईंनी शोतीकडेसुद्धा गांभीर्याने लक्ष दिले. म्हणून त्यांच्या स्वराज्यात एकाही शेतकर्‍याने आत्महत्या केली नाही. शासनाच्या कोतवाल पदाच्या निर्मात्या राष्ट्रमाता अहल्याराणी होळकर आहेत. आज महाराष्ट्रात अनेक विद्यापीठे आहेत, परंतु एकाही विद्यापीठाला अहल्यामाईचे नाव नाही. आज महाराष्ट्रात अनेक मुख्य सांस्कृतिक केंद्रे आहेत, ज्या काळात अहल्यामाईने सांस्कृतिक वारसा जोपासून भारताच्या सौंदर्यामध्ये भर घातली व अनेक पर्यटनस्थळे निर्माण झाली, पण एकाही पर्यटनस्थळाला अहल्यामाईंचे नाव नाही. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला, रयत शिक्षण संस्थेला मदत होळकर राजांनी केली आहे. एवढेच काय, तर देेेशाची राजधानी असलेले दिल्लीतील राष्ट्रपती भवन, सचिवालय व देशाची संसद उभी आहे ती जागासुद्धा होळकरांची आहे. शेतकर्‍यांसाठी आर्थिक मदत होळकरांनी केली, त्या शेतकर्‍यांच्या शासकीय योजनेस अहल्यामाईंचे नाव नाही. जागोजाग निवासासाठी अन्नछत्रे, नदीवरचे घाट, रस्तेबांधणी करणार्‍या अहल्यामाईंचे भव्यदिव्य स्मारक भारतात कुठेही नाही. एवढेच काय, तर अहल्याराणी होळकरांच्या जीवनावर एखादा पुरोगामी चित्रपटसुद्धा नाही. साधी चित्रफीत जरी तयार झाली तरी ती धार्मिक स्वरूपाची बनली. ही सर्वात दुर्दैवी बाब भारतीय राजकारणासाठी व लोकांसाठी आहे. नुसते अहल्यामाईंचे नाव घेऊन भाषणबाजी करून काहीही होणार नाही, याउलट आता कृती हवी. विज्ञानवादी शतकामध्ये भारताच्या जनमानसावर आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या अहल्यामाईंचे पुरोगामी चरित्र इतर भाषांमध्ये संकलन करून जगामध्ये जाणे गरजेचे आहे. कारण अहल्यामाईंचा लोककल्याणकारी आदर्श समोर ठेवत महात्मा फुले यांनी भारतात अस्पृश्यांसाठी जी पहिली शाळा उघडली तिचे नाव ‘अहल्याश्रम’ ठेवले. तसेच अहल्यामाईंचा आदर्श घेत राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात गोरगरिबांसाठी जो दवाखाना उघडला त्याचे नामकरण ‘अहल्यामाई होळकर स्मरणार्थ दवाखाना’ असे केले होते.
अखेर १३ ऑगस्ट १७९५ चा दिवस उजाडला आणि शूरवीर राणीची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!
सोहन पुरुषोत्तम घोरपडे
८०५५५६८८४९