ग्रामीण वसाहतीतील रस्ते शासनानेच बांधावेत!

0
21

वाचकपत्रे
शासन, ग्रामपंचायत व नगरपालिकांना रस्तेबांधणीसाठी पैसा देते. पण, या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीने होत नाही, असा सर्वांचाच अनुभव आहे. डांबरी रस्ते एकाच पावसाळ्यात गायब होऊन जातात! जागोजागी केवळ खड्डे दिसतात. एवढेच नव्हे, तर सिमेंट रस्त्यांवरही अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. याचे कारण भ्रष्टाचार! त्यामुळे दर्जाबाबत तडजोड होते. वसाहत अंतर्गत सिमेंट रस्ते बांधण्यासाठी शासनाने यांना निधी न देता रस्त्यांचे बांधकाम जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली व्हावे. शक्य नसेल तर शासनाच्या बांधकाम विभागातर्फे बांधावेत. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञांची समिती असावी. यामुळे निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय टळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याकडे लक्ष पुरवावे.
डॉ. जयंत ओक
९७६४६४८३८३

चिनी वस्तूंवर बहिष्कार; हाच उत्तम मार्ग!
सध्या भारत आणि चीन संबंध हाच मुद्दा सगळीकडे गाजत आहे. चीनची आडमुठेपणाची भूमिका भारतासाठी मोठी अडचण ठरत आहे. या पार्श्‍वभूमीवर, चीनने भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करून भारतीय सैनिकांच्या चौक्या उध्वस्त केल्या. चीनचा पाकिस्तानलासुद्धा उघड पाठिंबा आहे. त्यामुळे पाकिस्तानसुद्धा आपले तोंड वर करत आहे व दहशतवाद वाढत आहे. म्हणून अशा कुरापतखोर चीनला जर धडा शिकवायचा असेल, तर आपल्याला चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा लागेल. भारतात चिनी माल मोठ्या प्रमाणात आयात होतो. चीनसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. आपण जर चिनी वस्तू घेण्याचे टाळले, तर नक्कीच चीनच्या नांग्या ठेचल्या जातील.
मोहन कळमकर
उमरखेड, यवतमाळ

चीनला आवरून मोदींनी योग्य पाऊल उचलले!
डोकलाम भागात चीन आणि भारतीय सैन्य एकमेकांसमोर आल्यानंतरही, आमचे सैन्य आम्ही मुळीच काढून घेणार नाही, आधी चीनने आपले सैन्य परत बोलवावे, अशी ठाम भूमिका घेऊन चीनला पहिल्याच झटक्यात, भारत हा आता १९६२ चा राहिलेला नाही, हे दाखवून दिले. मोदींच्या या निर्णयाचे जेवढे कौतुक करावे, तेवढे थोडेच! चीनला आपल्या सैन्यावर खूपच भरवसा असल्याचे दिसते. पण, भारताच्या सैन्यापुढे त्यांची डाळ १९६७ साली गळली नव्हती, याची आठवण त्यांना असेलच. चीनने धोका दिल्यामुळे आपणास १९६२ च्या युद्धात हार मानावी लागली. त्यालाही नेहरूच कारणीभूत होते. पण, आता काळ बदलला आहे. केवळ सैन्य खूप आहे म्हणून आपली सरशी होईल, या भ्रमात राहू नये. छत्रपती शिवाजी महाराजांजवळ सैन्यशक्ती कमी असतानाही, कधी गनिमी कावा, तर कधी अचानक हल्ला करून त्यांनी शत्रूंवर मात केली होती. भारताला शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पूर्ण जाणीव आहे. तेव्हा चीनने आडमुठी भूमिका न घेता आपला आग्रह सोडावा आणि सांमजस्याची भूमिका घ्यावी. यातच त्याचे भले आहे. कारण, पाकिस्तानला चारदा लोळविल्यानंतर आता चीनच्या ६२ च्या युद्धाचा बदला घेण्याची मानसिकता आमच्या सैन्याच्या रक्तात सळसळत आहे, हे लक्षात ठेवावे.
मधुकर अमृत डबीर
महाल, नागपूर

भाजपाच्या खासदारांनाही अनुपस्थितीचा संसर्ग?
राज्यसभेत एका विधेयकाला मंजूर करण्याच्या वेळी भाजपाचे सदस्य मोठ्या संख्येने अनुपस्थित असल्यामुळे भाजपाची नाचक्की झाली. ती पंतप्रधान मोदींच्या एवढी जिव्हारी लागली की, तुम्ही जर असेच वागाल तर २०१९ मध्ये तुमच्याकडून हिशेब मागीन, अशी तंबीच त्यांनी दिली. भाजपा हा शिस्तबद्ध आणि अनुशासन पाळणारा पक्ष म्हणून ख्याती आहे. पण, या पक्षाचे सदस्यसुद्धा अन्य पक्षातील सदस्यांसारखेच वागले तर त्यात फरक काय? मतदार खासदारांना आपला प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवितात. पण, निदान संसद सुरू असताना, दररोज उपस्थिती लावणे हे जर निवडून आल्यानंतर जड जात असेल, तर मग अशा सदस्यांना घरीच बसवणे योग्य राहील!
विनायक पाटील
नागपूर

स्वाईन फ्लूची भल्याभल्यांना लागण!
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची ताजी बातमी वाचली. यापूर्वी अभिनेता आमीर खान, त्याची पत्नी किरण राव, अभिनेत्री रिचा चढ्ढा यांनाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याच्या बातम्या आल्या. हे सर्व लोक हाय प्रोफाईल आहेत. चांगल्या बंगल्यात राहतात, उत्तम आहार घेतात, तरीही यांना लागण कशी झाली, हा प्रश्‍नच आहे. याचा अर्थ, हे सर्व बडे प्रस्थ आपल्या आरोग्याची काळजी घेण्यात अपयशी ठरले, असेच म्हणावे लागेल.
विकास जाधव
अमरावती