अण्णाद्रमुकमध्ये एकी!

0
37

वेध
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अखिल भारतीय अण्णाद्रमुकच्या दिवंगत नेत्या जे. जयललिता यांच्या निधनानंतर या पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी अजूनही भरली गेलेली नाही. उलट, त्यांच्या मृत्यूनंतर पक्षातील दोन गटांनी आपली वेगळी चूल मांडली. के. पलानीस्वामी आणि ओ. पन्नीरसेल्वम् या दोन नेत्यांनी स्वतःचे गट निर्माण करून एकमेकांना शह देण्याचे प्रयत्न आजवर चालवले होते. पण, तामिळनाडूच्या राजकीय सारिपाटावर नवा राजकीय पक्ष उभा ठाकण्याचे संकेत मिळाले आहेत. सुविख्यात दाक्षिणात्य अभिनेते आणि आपल्या अभिनव कलाकारीने स्वतःची जनमनात आगळी ओळख निर्माण करणारे कलाबाज रजनीकांत नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे घाबरून जाऊन म्हणा किंवा भविष्यात कॉंग्रेस, भाजपा आणि द्रमुकपुढे आपल्या स्वतंत्र गटांची डाळ शिजणार नाही, हे ध्यानात आल्याने म्हणा, या पक्षाच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल. राजकारणात म्हणा किंवा संघटनेत एकट्याने काम करणे शक्य नसते. मूठ एकत्र आली की जशी सशक्त होते, तसेच राजकारणातील गट एकत्र आले की पक्ष सशक्त होतो. एकत्र येण्याचे बरेच फायदे या पक्षाला मिळणार आहेत. राज्यातील पुढच्या विधानसभा निवडणुकीत हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष होऊ शकतो किंवा एकसंधपणे स्वतंत्र निवडणुकादेखील लढू शकतो. भारतीय जनता पक्षाला तामिळनाडूत एका सशक्त मित्राची गरज आहेच. हे दोन्ही गट एकत्र आल्यास भाजपादेखील त्यांच्या मैत्रीसाठी हात पुढे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रपतिपद आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत अण्णाद्रमुकने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन आपला कल भाजपाच्या बाजूने असल्याचे संकेत दिलेलेच आहेत. पण, ही मैत्री घट्‌ट करण्यापूर्वी किंवा मैत्रीचा हात पुढे करण्यापूर्वी स्वतःचे घर, त्याचा पायवा मजबूत करण्याची आवश्यकता आहे. सध्यातरी त्या दिशेने या पक्षाची पावले पडताना दिसत आहेत. दोन्ही गटांनी एकत्र येण्याला तत्त्वतः मान्यता दिलेली आहे. पुढील आठवड्यात विलीनीकरणाची प्रक्रिया पार पडण्याची आणि तत्पूर्वी भ्रष्टाचारासाठी तुरुंगात असलेल्या नेत्या शशिकला आणि त्यांचा भाचा दिनकरन् यांची हकालपट्‌टी होऊ शकते. पक्षाची प्रतिमा जोपासण्यासाठी अशी शस्त्रक्रिया गरजेची आहे. नव्या खेळीसाठी या पक्षाला शुभेच्छा!

स्मृती इराणींचा सवाल…
भारत छोडो आंदोलनाचा ७५ वा वर्धापनदिन देशात साजरा केला जात आहे. या निमित्ताने त्या चळवळीची आठवण केली जात आहे. सरकारी स्तरावर ज्याप्रमाणे मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले गेले, त्याचप्रमाणे देशभरात स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार आणि जाहीर सभांचे आयोजनही केले गेले. संसदेचे यानिमित्ताने विशेष सत्र आयोजित झाले, ज्यात सर्वपक्षीय नेत्यांनी या आंदोलनावर प्रकाश टाकला. महात्मा गांधींच्या नेतृत्वात छेडल्या गेलेल्या या आंदोलनात भारताच्या कानाकोपर्‍यातील लोकांनी भाग घेतला. लाठ्या-काठ्या खाल्ल्या, मिरवणुका काढल्या, विदेशी वस्त्रांची होळी केली आणि इंग्रजांनी हा देश सोडावा म्हणून अहिंसक पद्धतीने निषेध नोंदविला. महात्मा गांधींसारखे नेतृत्व यानिमित्ताने भारतीयांसमोर सिद्ध झाले. त्यांनी ‘करो या मरो’चा नारा देत सारा देश जागा केला. वर्धापनदिनाच्या निमित्ताने सारे नेते त्यांच्या भाषणात- महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस आदी नेत्यांच्या योगदानावर प्रकाश टाकत असताना, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केवळ पंडित जवाहरलाल नेहरू यांना या आंदोलनात तुरुंगवास भोगावा लागल्याचे नमूद केले. इतर नेत्यांच्या योगदानाबद्दल त्यांनी अवाक्षरही न काढणे खटकले. ही बाब भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनीदेखील हेरली आणि त्यांनी ट्विट करून सोनिया गांधींना लक्ष्य केले. सोनियांचे भाषण त्या दिवशी रुळावरून घसरले, असेच म्हणावे लागेल. आंदोलनाबद्दल बोलायचे सोडून त्यांनी संघ आणि भाजपाचा प्रत्यक्ष उल्लेख न करता या संघटनांचा उद्धार केला. तो केल्याशिवाय कॉंग्रेससह अनेकांना झोप लागत नाही! भाजपाचे एखाद् वेळी ठीक आहे, तो राजकीय पक्ष आहे, त्यामुळे त्याच्यावर राजकीय विरोधापोटी टीका-टिप्पणी होणे एकवेळ समजण्यासारखे आहे. पण, प्रत्येक वेळी सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर राहणार्‍या संघावरही टीका होणे हे अनाकलनीयच म्हणावे लागेल. ‘चले जाव चळवळीत इतरांचेही योगदान, सोनियांकडून नेहरूंच्याच नावाचा जप का?’ अशी पोस्ट फेसबुकवर टाकून स्मृती इराणींनी सोनियांना कैचीत पकडले. स्मृती इराणी यांनी पुढे असेही नमूद केले की, ‘चले जाव’सारख्या देशव्यापी ऐतिहासिक आंदोलनाबाबत आमच्याकडून पक्षविरहित विचार समोर ठेवण्याची अपेक्षा केली जाते. परंतु, सोनिया गांधी आपल्या दीर्घ भाषणात कॉंग्रेसच्या पराभवाबद्दल खेद व्यक्त करताना दिसून आल्या. त्यांनी ‘चले जाव’ आंदोलनाबाबत फक्त नेहरूंचीच बाजू मांडली. स्मृती इराणी म्हणतात, त्याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. आज कॉंग्रेसची जी अवस्था झाली आहे, त्यासाठी या पक्षातील नेत्यांचा नेहरू आणि गांधी जपच कारणीभूत आहे! इतरांचे मोठेपण मान्य करायला मनाचा मोठेपणा लागतो, तो कॉंग्रेसमध्ये कुठेच दिसत नाही. भारतातील शेकडो शासकीय इमारतींना, महाविद्यालयांना, तंत्रज्ञानविषयक संस्थांना, वस्त्यांना फक्त गांधी-नेहरू परिवारातील लोकांची नावे का आहेत? याचाही या निमित्ताने आढावा घेतला, तर लोकांच्या सामान्य ज्ञानात भर पडेल!
चारुदत्त कहू
९९२२९४६७७४