आओ चिनीयों मैदानमें…

0
102

चौफेर
‘‘लढ जायेंगे, बढ जायेंगे, हम हिम्मतके साथ,
मजाल क्या है शत्रूकी, धरे हमारा हाथ,
आओ चिनीयों मैदानमें, देख हिंद का हाथ…’’
बासष्टच्या युद्धात, समोर पराभव दिसत असतानाही कर्तव्यभावनेने लढत राहिलेल्या भारतीय सैन्याचे खचू लागलेले मनोबल सावरण्यात ज्या प्रेरणादायी गीतानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, त्याच्या निर्मितीची कहाणीही तेवढीच रोचक आहे. केवळ सैनिकांचीच नव्हे, तर सीमेवरील गावांत राहणार्‍या नागरिकांची उडालेली दाणादाणही मन विषण्ण करणारी होती. कारभार सांभाळणार्‍या सत्ताधार्‍यांपासून तर रणांगणात लढणार्‍या सैनिकांपर्यंत, सारेच पराभूत मानसिकतेने ग्रस्त होते. अशा वेळी राष्ट्रपतींनी राष्ट्रसंतांना बोलावून घेतले. परिस्थिती आणि परास्त मनं सावरून धरण्याची गरज विशद केली. त्या स्थितीत राष्ट्रसंतांच्या वाणीतून स्फुरलेल्या शब्दांचा मग मंत्र झाला! त्यांनी रचलेली गीतं ओठांवर आली तरी शत्रूंशी लढण्याची प्रेरणा मिळायची. तुकडोजी महाराजांनी त्या काळात ठिकठिकाणी फिरून चीनविरुद्ध केलेला जागर बघितला तर लक्षात येईल की, त्या देशाबाबत स्थिती अजूनही तीच आहे. धमक्या देण्याची त्यांची रीतही तीच अन् गोड बोलून धोका देण्याची तिरपी चालही तीच. भारतीय सीमेत घुसखोरी करून छोट्याछोट्या जागा बळकावयाच्या, तिथे तळ ठोकून उभे राहायचे. स्वत:च्या नकाशात भारताच्या जमिनीचा समावेश करून जगाच्या डोळ्यांत धूळ फेकायची अन् लक्षात आणून दिलं की, ‘चुकलंच बेटं’ म्हणत, चूक सुधारण्याचं जाहीर आश्‍वासन द्यायचं. ते पाळायचं मात्र जाणीवपूर्वक टाळायचं…
वर्षानुवर्षे हेच चाललं आहे. कधी त्यांनी ईशान्य भारताच्या सीमेतला छत्तीस हजार चौरस फुटाचा भाग ‘चुकीनं’ स्वत:च्या नकाशात दाखवला, तर कधी १९५६ मध्ये मान्य केलेल्या मॅकमहोन रेषेची पुढच्या चारच वर्षांत स्वत:च ऐसीतैसी केली! ५० हजार चौरस मैल जागेवर केलेला चिनी दावा कसा फोल आहे, हे सिद्ध करण्याचा भारताचा खटाटोप अजून सुरूच होता, पण बासष्टमध्ये कधी गलवानच्या खोर्‍याकडून, तर कधी लद्दाखकडून, चिनी चढाई सुरू झाली. अतिक्रमण करून बळकावलेल्या जमिनीचा तुकडा सरळ सरळ हाती येत नाही हे बघून लढाईचा मार्ग त्यांनी स्वीकारला होता. वाटाघाटीसाठी आपला प्रतिनिधी चीनमध्ये पाठविण्याच्या, पंडित नेहरूंच्या घोषणेचे तसेच तीनतेरा वाजले होते…
अस्मितेला आव्हान देत भारताला डिवचण्याची त्यांची पद्धत आजही किंचितशीही बदललेली नाही. तेव्हा लद्दाख होता, आता डोकलामचा परिसर आहे, एवढाच काय तो फरक. दुसरीकडे, आपली ताकद आणि मर्यादांचे भान जपतानाही चीनविरुद्ध प्राणपणाने लढण्याच्या इराद्यात तसूभरही मागे न राहिलेले सैनिक आणि त्यांच्या पाठीशी आपले मनोबल उभे करण्यात जराही कुचराई न करणारे भारतीय नागरिक… गेल्या काही दिवसांत चिनी मालावर बहिष्कार घालून आर्थिक आघाडीवर त्या देशाच्या नाड्या आवळण्याच्या दृष्टीने चाललेला लोकजागर आणि त्या काळात राष्ट्रसंतांनी भजनांच्या माध्यमातून चीनविरुद्ध रान पेटविण्याचा केलेला प्रयत्न, दोहोंचाही संदर्भ एकाच दिशेनं प्रवास करणारा आहे.
भारतीय नागरिकांचे मनोबल उंचावणारी आणि त्यांच्यात शत्रूंविरुद्ध उभे ठाकण्याची जिद्द निर्माण करणारी, अंगावर शहारे आणणारी भजनं गाऊन तुकडोजी महाराजांनी त्या वेळी गावागावांतून लोकजागृती केली. हे खरंच आहे की, सारीच कामं सरकार करू शकत नाही अन् शासकीय पातळीवरून सारे प्रश्‍न सुटतातच असेही नाही. लोकसहभागातून घडू शकणार्‍या चमत्काराला पर्याय तो नाहीच कशाचा. जो त्या वेळी डॉ. राजेन्द्र प्रसादांच्या पुढाकारातून राष्ट्रसंतांनी घडवला, नेमक्या त्याच चमत्काराची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. चिनी वस्तूंवरील बहिष्कार हा कुण्या एका संघटनेचा अजेंडा नाही, ती संपूर्ण भारत देशाची गरज आहे. बळकावण्यासाठी त्यांनी निवडलेल्या स्थानांची नावं काहीशी बदलली आणि म्हणूनच त्यायोगे येणारे काही संदर्भ तेवढे बदलले, बाकी भारताविरुद्धचे त्यांच्या मनातले मनसुबे काल होते तेवढेच आजही तिरकस अन् तितकेच निलाजरे आहेत. युद्धजन्य स्थिती तेव्हाही होती, आजही आहे. ते कालही भारताविरुद्ध दंड थोपटून उभे ठाकले होते अन् आजही त्यांना या देशाविरुद्ध लढण्याची खुमखुमी आहे. अशा वेळी, ‘‘आओ चिनीयों मैदानमें, देख हिंद का हाथ,’’ हे राष्ट्रसंतांचे धारदार शब्दही मैदानावरील लढाई प्रत्यक्षात लढणार्‍या आपल्या सैनिकांना जर युद्ध लढण्याची प्रेरणा देत असतील, तर मग त्याच चीनविरुद्ध सारा भारत देश आपल्या पाठीशी उभा असल्याचे वास्तव काय थरार निर्माण करू शकेल? कल्पनाही करवणार नाही, इतका जबरदस्त परिणाम साधण्याची ताकद त्या एकोप्यात आहे. चीन बलवान आहेच. कदाचित आमच्यापेक्षा काकणभर जास्तच. म्हणूनच त्याची मुजोरी दिवसागणिक वाढते आहे. त्याला केवळ स्वत:लाच भारतीय भूप्रदेशावर कब्जा करायचा नाहीय्, तर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय भूभागाबाबतही त्याची भूमिका भारताच्या विरोधातलीच आहे. या पार्श्‍वभूमीवर,
‘‘उठो अब हिंद के पुत्रो, पुकारे सोच भारतकी
करो सब संघटन अपना, मचाओ ना ये मत – मत की…’’
हे राष्ट्रसंतांचे आवाहन अगदीच अस्थानी असल्याचे कोण म्हणेल? आणि
‘‘गुलामी फिरसे ना आए हमारे प्रिय भारतमें
लगेगा मुंहको काला, खबर सब सोचलो गत की…’’
हा त्यांचा इशाराही आज संदर्भहीन ठरला असल्याचा दावा कुणाला करता येईल इथे?
चिनी प्रजासत्ताक अस्तित्वात आल्यापासून भारत अतिशय खंबीरपणे त्याच्या बाजूने उभा राहिला. नेहरूंच्या मनात तर कम्युनिस्टांविषयी कायम प्रेमाचे भरते असल्याने, रशिया अन् चीन तर त्यांनी पोसूनच ठेवले होते उराशी. पण, नंतरच्या काळात भारताने चीनला मागे टाकून साधलेला विकास खरंतर नेत्रदीपक ठरला होता. नेमके काय, कसे अन् का घडले कुणास ठाऊक, पण इंदिरा अन् राजीव गांधींच्या काळात भारताला कितीतरी अंतराने मागे टाकून चीन आश्‍चर्यकारक वेगाने पुढे निघून गेला. आणि तोच आता आपल्याला वाकुल्या दाखवत आपल्याचविरुद्ध कुरघोड्या करतोय्!
जवळपास साडेपाच दशकांचा कालावधी मागे पडेल आता चीनने लादलेल्या ‘त्या’ युद्धानंतरचा! तीच परिपाठी अजूनही कायम आहे. त्यांची तीच मुजोरी, त्याच धमक्या… अन् आमचे तेच धोरण. त्यावेळच्या ‘श्री गुरुदेव’चा चिनी निषेध अंक असेल किंवा मग राष्ट्र संरक्षण विशेषांक, यातून राष्ट्रसंतांनी आरंभलेल्या जनजागृतीच्या मोहिमेची गरज संपल्याचे चित्र अजूनही कुठेही नाही. ‘‘ सारा भारत रहे सिपाही शत्रूओंको दहशाने…’’ या त्यांच्या म्हणण्यातील तथ्य अद्याप मिथ्या ठरलेले नाही. उलट तीच काळाची गरज ठरते आहे. दुर्दैव फक्त एवढेच आहे की, काळाची ही गरज ओळखण्यापेक्षा चिनी मालावरील बहिष्काराचे आवाहन पायदळी तुडवण्याच्या राजकारणात रमली आहे काही मंडळी. या कुरघोड्यांमागील गांभीर्य लक्षात येईल, डोकलाममधील त्यांच्या माघारीतील भारताच्या लक्षणीय विजयाचे महत्त्व जेव्हा कळेल, तेव्हाच राष्ट्रसंतांच्या मनातील तळमळ समजेल आपल्याला अन् आपल्या हद्दीत घुसलेल्यांना हुसकावून लावण्याची गरजही ध्यानात येईल सर्वांच्या. राष्ट्रसंतांच्याच शब्दात सांगायचं झालं तर-
‘‘जागा है भारत मेरा, शत्रूपर देने पहरा
किसकी ताकद है लडने की, हक छिनने आये हमरा
विश्‍व हमारा साथ करे, शत्रू यही अब घात करे
भाई-भाई नारे कहके, अब धोके की बात करे
नीती जिनकी गंदी है, आखे जिनकी अंधी है
वह क्या जितेंगे भारतको, प्रभू हमारे साथी हैं…’’
सुनील कुहीकर
९८८१७१७८३३