अंतराळात चाळीस वर्षांपासून भारतीय संगीत

0
190

वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट 
अंतराळात गेल्या चाळीस वर्षांपासून भारतीय संगीताचे स्वर गुंजत आहेत. हे संगीत आहे ‘नासा’च्या व्होएजर-१ या अंतराळातील सुवर्ण हार्डडिस्कमध्ये. या हार्डडिस्कमध्ये अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांचे भाषण, बाळाच्या रडण्याचा आवाज, पशू-पक्ष्यांचे आवाज व अन्य अशा काही आवाजांसमवेतच भारतीय शास्त्रीय संगीताचा सुरेल ध्वनीही समाविष्ट होता.
एखाद्या प्रगत परग्रहवासीयाला ही सुवर्ण हार्डडिस्क मिळाली तर पृथ्वी व पृथ्वीवरील जीवांची त्याला माहिती व्हावी, असा या हार्डडिस्कच्या निर्मितीचा उद्देश होता. ५ सप्टेंबर १९७७ मध्ये ‘टायटन ३ ई’ या रॉकेटच्या सहाय्याने हे यान अंतराळात झेपावले होते. ‘नासा’ची ही आतापर्यंतची सर्वात दीर्घ मोहीम ठरली आहे. हे यान आता आपल्या सौरमंडळाच्याही बाहेर गेले असून इतक्या अंतरावर जाणारी ही पहिलीच मानवनिर्मित वस्तू आहे. हे यान सध्या पृथ्वीपासून १३ अब्ज मैलापेक्षाही अधिक अंतरावर आहे. त्याचा वेग ताशी ३८ हजार मैल इतका आहे. इतक्या गतीने जाणारेही ते पहिलेच यान आहे.
त्याच्यापासून प्रकाशाच्या वेगाने संदेश पृथ्वीवर येतात. हे संदेश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी १३.८ तासांचा वेळ लागतो. हे यान दररोज सुमारे दहा लाख मैलांचे अंतर कापते. (वृत्तसंस्था)