रिझर्व्ह बँकेने सरकारला ५० हजार कोटी द्यावेत : चिदम्बरम् 

0
57

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट 
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सरकारला ३० हजार कोटींचा लाभांश देण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांनी रिझर्व्ह बँक व सरकारवर निशाणा साधला आहे. रिझर्व्ह बँकेकडून सरकारला देण्यात येणार्‍या या लाभांशात नोटाबंदीची किंमत म्हणून आणखी ५० हजार कोटी रुपयांची भर घातली पाहिजे, असे चिदम्बरम् यांनी म्हटले. यासोबतच त्यांनी ट्विट करून रिझर्व्ह बँकेला नोटाबंदीविषयी अनेक प्रश्‍न विचारले आहेत.
गेल्या दोन वर्षांमध्ये रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला तब्बल ६० हजार कोटींचा लाभांश देण्यात आला होता. मात्र, यंदा लाभांशाची ही रक्कम निम्म्यावर आली आहे. हाच धागा पकडत चिदम्बरम् यांनी रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारला धारेवर धरले. रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीमुळे झालेल्या खर्चाचा नुकसानीचा सविस्तर तपशील जाहीर करावा. नोटाबंदीनंतर जुन्या नोटा नष्ट करण्यासाठी आणि नव्या नोटांच्या छपाईसाठी किती खर्च झाला, याबद्दल रिझर्व्ह बँक माहिती देणार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. २०१५-१६ या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने लाभांशापोटी सरकारला ६५,८७६ कोटी इतकी रक्कम देऊ केली होती, तर गेल्या वर्षी हा लाभांश ६५,८९६ कोटी इतका होता. मात्र, यंदा लाभांशाची रक्कम निम्म्याने घटली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून कोणतेही कारण सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे आता सरकार चिदम्बरम् यांना कसे प्रत्युत्तर देते, ते बघावे लागेल. (वृत्तसंस्था)