३६ लाख सदस्यांची गुंतवणूक धोक्यात? 

0
65

मुंबई, ११ ऑगस्ट 
सेबीने कारवाई केलेल्या ३३१ बनावट कंपन्यांपैकी निम्म्याहून अधिक कंपन्यांनी कोणतीही विक्री केली नसून, दरवर्षी कोट्यवधींचा तोटा कागदोपत्री दाखवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेअर बाजारातील या बनावट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार्‍या तब्बल ३६ लाख किरकोळ गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे.एकूण ३३१ बनावट कंपन्यांपैकी १६२ कंपन्या मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. यातील १५४ कंपन्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यातील ५० हून अधिक कंपन्यांनी गेली चार वर्षे तोटा दाखवला आहे. यातील २४ कंपन्यांनी गेल्या आर्थिक वर्षात विक्रीच केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही शेअर बाजारातील नोंदणीमुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी कोट्यावधींची गुंतवणूक केली आहे. ३३१ कंपन्यांमध्ये तब्बल ९५ टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांचा आहे, तर जवळपास ३६ लाख गुंतवणूकदारांनी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. सेबीने मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारांना शेल कंपन्यांचे गेल्या तीन वर्षातील ताळेबंद आणि कर विवरणपत्र तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाची सेबी, शेअर बाजार, अर्थ खात्याकडून चौकशी सुरू असून, गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूक भांडवलाबाबत संभ्रम आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांनी कंपन्यांची आर्थिक स्थिती आणि व्यवस्थापनाची खात्री करूनच गुंतवणूक करावी, असा सल्ला जाणकारांकडून दिला जात आहे.
सेबीने शेल कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बीएसई आणि एनएसई मंचावरील ३३१ शेल कंपन्यांना बाजारातून हद्दपार केले आहे. त्याचबरोबर बीएसई ब गटातील ८ संशयास्पद कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. या कंपन्यांची उलाढाल ६ कोटी ते १००० कोटींच्या दरम्यान आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या कंपन्या तोटा दाखवत आहे. सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांमध्ये एफसीएस सॉफ्टवेअर, पार्श्‍वनाथ डेव्हलपर्स, झेनिथ बिर्ला, एनयू टेक इंडिया, रोहित फेरो, अंकित मेटल अँड पॉवर, इम्पेक्स फेरो टेक आणि कौशल्या इन्फ्रा यांचा समावेश आहे.
निर्देशांकात १ महिन्यांचा नीचांक
शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण झाली आहे. शेअर बाजारातील निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकात शुक्रवारी १ टक्क्याची घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३१८ अंशांची घसरण झाली. अखेर सेन्सेक्स ३१,२१३.५९ पातळीवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १०९ अंशांच्या घसरणीसह ९,७१०.८० पातळीवर बंद झाला.
क्षेत्रीय पातळीवर आज ऑटो, एफएमसीजी, मेटल, पीएसयू बँक आणि कॅपिटल गूड्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक विक्रीचा मारा सुरू होता. ऑटो निर्देशांकात १.४ टक्के, एफएमसीजी निर्देशांकात ०.८ टक्के, मेटल निर्देशांकात ३.४ टक्के आणि पीएसयू बँक निर्देशांकात ४.९ टक्के आणि कॅपिटल गूड्स निर्देशांकात १.२ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.आज मुंबई शेअर बाजारात हिंदाल्को, वेदांता, एसबीआय, बँक ऑफ बडौदा, बॉश, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. तर अरविंदो फार्मा, गेल, एनीस बँक, टाटा मोटर्स, टाटा मोटर्स डीव्हीआर, लुपिन, विप्रो आणि ऍक्सिस बँकेचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहे. (वृत्तसंस्था)