ऍलिसन फेलिक्सने जिंकले कांस्य 

0
88

– ओटी-बोल्टच्या १४ पदकांची बरोबरी 
लंडन, ११ ऑगस्ट 
अमेरिकेची महान धावपटू ऍलिसन फेलिक्सला जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील ४००  मीटर शर्यतीत कांस्यपदक मिळवता आले. परंतु तिने जमैकाच्या मर्लिन ओटी आणि उसेन बोल्ट यांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकांच्या विक्रमाची बरोबरी साधली.
फेलिक्सने आतापर्यंत सहा सुवर्णपदकांसह नऊ ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. जागतिक स्पर्धेतील  १४ पदकांमध्ये नऊ सुवर्णपदकांचा समावेश आहे. तसेच एकंदर १२ पदके त्याने अमेरिकेच्या रिले संघासाठी मिळवली आहेत.जमैकाच्या बोल्टला आठवड्याअखेरीस होणार्‍या ४ बाय  १०० मीटर शर्यतीत पदकांची संख्या फक्त १५ पर्यंत वाढवण्याची संधी आहे. परंतु फेलिक्स ४ बाय १०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर अशा दोन शर्यतींमध्ये सहभागी होणार असल्यामुळे ती पदकांची आकडेवारी १६ पर्यंत उंचावू शकेल.
बुधवारी झालेल्या ४०० मीटर शर्यतीत बहामाची खेळाडू आणि शर्यतीमधील आघाडीवीर शॉनाई मिलर-उयबो विजयरेषेपासून २० मीटर अंतरावर अडखडळल्यामुळे फेलिक्सला कांस्यपदकावर नाव कोरता आले. मुसळधार पावसात झालेल्या या शर्यतीत तिची सहकारी फिलिस फ्रान्सिसने सुवर्णपदक जिंकून सर्वानाच चकित केले. बहरिनच्या साल्वा ईड नासीरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
‘एक सुवर्णपदक हुकल्यामुळे अतिशय खंत वाटते आहे. परंतु, स्पर्धा अद्याप संपलेली नाही. त्यामुळे मी आशावादी आहे’, असे फेलिक्सने सांगितले. २००४ च्या अथेेन्स ऑलिम्पिकमध्ये तिने २०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर वर्षभराने हेलसिंकी येथे झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील २०० मीटर प्रकारात तिने सुवर्णपदकावर नाव कोरले. (वृत्तसंस्था)