क्लीन स्वीपच्या निर्धाराने भारत श्रीलंकेशी झुंजणार

0
85

– तिसरी कसोटी आजपासून  
– कुलदीपला संधी मिळण्याची शक्यता 
कँडी, ११ ऑगस्ट
श्रीलंकेला तिसर्‍या आणि अंतिम कसोटी सामन्यात त्यांच्याच भूमीवर पराभूत करून क्लीन स्वीप करण्याच्या निर्धाराने शनिवारी भारताची ‘विराट सेना’ मैदानात उतरणार आहे. भारत व श्रीलंकेदरम्यान उद्यापासून कँडीत सुरू होणार्‍या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्‍वाचे लक्ष लागले आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत श्रीलंकेचा पराभव केल्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे मनोबल खूपच उंचावले आहे. विदेशी भूमीवर श्रीलंकेचा मालिकेत सुपडा साफ करणारा पहिला संघ बनण्याचा प्रयत्न भारतीय संघ निश्‍चितच करणार आहे. भारताने गाला येथे पहिली कसोटी ३०४ धावांनी तर कोलंबोतील दुसरी कसोटी ५३ धावांनी जिंकली होती. अर्थात आज खराब हवामानामुळे भारतीय संघ सराव करू शकला नाही.
श्रीलंकेने दुष्मंता चामीरा आणि लाहिरू गामेगे या दोन वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. हे दोघे अनुक्रमे नुवान प्रदीप आणि रंगाना हेराथ यांची जागा घेतील. दोन दिवसांपूर्वी येथील खेळपट्टी अतिशय हिरवीगार दिसत होती. खेळपट्टीकडे पाहता वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारचा संघात समावेश करण्याचा निर्णय कर्णधार विराट कोहली घेऊ शकतो. तो निलंबित रवींद्र जडेजाचे स्थान घेऊ शकतो. यापूर्वी मिळालेल्या संधीचे भुवनेश्‍वर कुमारने सोने केले आहे. भुवनेश्‍वर हार्दिक पांड्याचे स्थानही घेऊ शकतो. तर चायनामॅन कुलदीप यादवचा फिरकीपटू म्हणून संघात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाळा येथील चेंडू उसळणार्‍या खेळपट्टीवर चांगली कामगिरी बजावली होती. पहिल्या डावात त्याने घेतलेले चार बळी निर्णायक सिद्ध झाले होते.   (वृत्तसंस्था)