देविंदरसिंह कांगचा ऐतिहासिक विक्रम  

0
86

भालाफेकमध्ये गाठली अंतिम फेरी
विश्‍व ऍथ्लेटिक्स स्पर्धा  
लंडन, ११ ऑगस्ट 
येथे सुरू असलेल्या विश्‍व ऍथ्लेटिक्स स्पर्धेत भारताच्या देविंदरसिंह कांगने आज इतिहास घडविला. विश्‍व ऍथ्लेटिक्स स्पर्धेत भालाफेक प्रकारात अंतिम फेरीत धडक देणारा देविंदर सिंह पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. तर स्टार खेळाडू नीरज चोपडा पात्रता फेरीतच बाद झाला आहे. पात्रता फेरीत ‘ब’ गटातून स्पर्धेत उतरलेल्या कांगने तिसर्‍या आणि शेवटच्या फेकीत ८३ मीटरची नोंद करीत पात्रता फेरीचे गुण प्राप्त केले. त्याने ८४.२२ मीटरचा ‘थ्रो’ केला. पहिल्या फेकीत त्याने ८२.२२ मीटर अंतर गाठले. तर दुसर्‍या वेळी ८२.१४ मीटर अंतरच ‘थ्रो’ करू शकला. खांद्याच्या दुखापतीशी झुंज देत मैदानात उतरलेल्या पंजाबच्या या २६ वर्षीय खेळाडूवर शेवटच्या प्रयत्नात ८३ मीटर अंतर पार करण्याचा दबाव होता. त्याने भारतीय प्रेक्षकांना निराश केले नाही. आणि अखेर लक्ष्य पूर्ण करीत अंतिम फेरीत धडक मारलीच. देविंदरसिंहने लक्ष्य गाठताच उपस्थित भारतीय प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
अ गटातून पाच आणि ब गटातून सात खेळाडूंनी पात्रता फेरी गाठली आहे. हे सर्व खेळाडू उद्या अंतिम फेरीत खेळतील. शेवटच्या पात्रता फेरीनंतर कांग सातव्या स्थानावर राहिला. मे महिन्यात दिल्लीत झालेल्या इंडियन ग्रांड प्रीमियरमध्ये देविंदरसिंह कांगच्या खांद्याला दुखापत झाली होती. मात्र, विश्‍व ऍथ्लेटिक्स स्पर्धेत खांद्याला बँडेज बांधून तो मैदानात उतरला व त्याने इतिहास घडविला. त्यामुळेच त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. आतापर्यंत कुठल्याही भारतीय पुरुष खेळाडूने अंतिम फेरी गाठली नव्हती.   (वृत्तसंस्था)