शरद यादव निर्णय घेण्यास मोकळे

0
38

– नितीशकुमारांची कणखर भूमिका
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट 
महाआघाडीतून बाहेर पडण्याचा आणि भाजपासोबत युती करण्याचा निर्णय जदयूच्या बैठकीत एकमताने घेतला आहे, असे स्पष्ट करताना, हा निर्णय मान्य नसल्यास पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव स्वत:चा निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे मोकळे आहेत, अशी कणखर भूमिका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज शुक्रवारी घेतली.
पक्षाने आपला निर्णय आधीच घेतला आहे. भाजपाशी युती करण्याचा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हता, तो सामूहिक होता. तो जर शरद यादव यांना मान्य नसेल, तर ते आपला स्वत:चा निर्णय घेण्यासाठी मोकळे आहेत. आम्ही त्यांना अडविणार नाही, असे नितीशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
तडजोडीचे दार बंद
नितीशकुमार यांची ही भूमिका म्हणजे, शरद यादव यांच्यासोबत कोणतीही तडजोड न करण्याचे आणि कुठल्याही स्थितीत राजद व कॉंगे्रसशी हातमिळवणी न करण्याचे संकेतच असल्याचे पक्षाच्या उच्चस्तरीय सूत्रांचे मत आहे. शरद यादव यांच्या उघड बंडखोरीलाही नितीशकुमारांनी प्रथमच जाहीरपणे उत्तर दिले आहे.
मोदी, शाह यांना भेटले
तत्पूर्वी, नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. जदयू लवकरच भाजपाप्रणीत रालोआत सहभागी होणार असल्याचे हे संकेत मानले जात आहेत. सर्वप्रथम त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यानंतर अमित शाह यांच्यासोबत न्याहारी घेतली.
महाआघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत युतीचे सरकार स्थापन केल्यानंतर नितीशकुमार यांची पहिलीच दिल्ली भेट आहे. ही सदिच्छा भेट होती. बिहारशी संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरच मी पुन्हा दिल्लीला येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
१९ ला घोषणा शक्य
दरम्यान, येत्या १९ तारखेला पाटण्यात जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून, या बैठकीत रालोआत सहभागी होण्याचा निर्णय अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रालोआत सहभागी होणार असल्याने आमचे काही सदस्यही केंद्रात सहभागी होतील, असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)