उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये फडकणार तिरंगा

0
55

•राष्ट्रगीतही होणार
लखनौ, ११ ऑगस्ट 
येत्या १५ ऑगस्ट रोजी अर्थात देशाच्या स्वातंत्र्य दिनी उत्तरप्रदेशातील सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकविणे आणि राष्ट्रगीत सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य मदरसा शिक्षण परिषदेने याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.
या कार्यक्रमाचे व्हिडीओ शूटिंग आणि छायाचित्रेही काढण्यात यावी, असे निर्देश परिषदेने सर्व मदरशांना दिले आहेत.
या आदेशात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्यातील प्रत्येक मदरशात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात यावा. सकाळी आठ वाजता ध्वजारोहण आणि त्यानंतर लगेच राष्ट्रगीत गायले जावे.
नंतर स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात यावी तसेच स्वातंत्र्य दिनाच्या महत्त्वावर विचार व्यक्त केले जावे. नंतर मदरशातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर करावी. तसेच राष्ट्रीय एकतेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात याव्या.(वृत्तसंस्था)