संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले

0
40

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे आज शुक्रवारी सूप वाजले. १७ जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा प्रारंभ झाला होता, आज ११ ऑगस्टला ते संपले. यावेळचे संसदेचे पावसाळी अधिवेशन अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरले.
या वेळच्या पावसाळी अधिवेशनातून देशाला नवीन राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १७ जुलैला राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाली, यात रालोआचे रामनाथ कोविंद विजयी झाले. ५ ऑगस्टला झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही रालोआच्या व्यंकय्या नायडू यांनी बाजी मारली. प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे संसदेच्या केंद्रीय कक्षात आयोजित विशेष कार्यक्रमातून त्यांना संसदेतर्फे निरोप देण्यात आला.
लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचे अधिवेशन अनिश्‍चित काळासाठी संस्थगित केले. लोकसभेत १९ बैठकीत ७१ तास कामकाज झाले. लोकसभेत भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान (पीपीपी) आणि कंपनी संशोधक विधेयकासह एकूण १४ विधेयक पारित झाली. लोकसभेत झालेल्या गोंधळामुळे जवळपास ३० तास कामकाज होऊ शकले नाही. याची भरपाई सभागृहाने विविध चर्चांत साडेदहा तास जास्त बसून करण्याचा प्रयत्न केला. अधिवेशनकाळात ३८० प्रश्‍न तारांकित करण्यात आले होते, यातील ६३ प्रश्‍नांची तोंडी उत्तरे देण्यात आली. शून्यकाळात सदस्यांनी २५२ मुद्दे उपस्थित केले. नियम ३७७ अंतर्गत सदस्यांनी २८१ लोकमहत्त्वाचे मुद्दे मांडले. संसदेच्या स्थायी समित्यांचे ४४ अहवाल सभागृहात सादर करण्यात आले.(तभा वृत्तसेवा)
०००