विवाह टिकविण्यासाठी चर्चा आवश्यक

0
30

– प्रशांत काळे यांचे मत
– श्‍वेतकेतु विवाह सूचक संस्थेचे उद्घाटन
नागपूर, ११ ऑगस्ट
विवाह मुला-मुलीच्या आयुष्यातील मोठा प्रसंग असतो. मुलीसाठी मुलगा बघताना किंवा मुलासाठी मुलगी बघताना आपण त्यांची माहिती घेतो. मात्र, ती बाह्यरूपी असते. त्यावरूनच लग्न ठरविले जाते. गुण, नाड याविषयी अनेकांकडून सांगितल्या जाते. मात्र, लग्न हे पत्रिका नाही तर समजुतदारीवर टिकून राहते. विवाह टिकवणे महत्त्वाचे असते. परंतु, त्याची कोणी वाच्यताही करीत नाही. खरेतर विवाह टिकविण्यासाठी चर्चा होणे आवश्यक आहे, असे मत श्‍वेतकेतु विवाह सूचक संस्थेचे संस्थापक प्रशांत काळे यांनी मांडले.
लक्ष्मीनगरस्थित सायंटिफिक सभागृहात श्‍वेतकेतु विवाह सूचक संस्थेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘विवाह व कुंडलीचे विवेचन’ या विषयावर बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, सत्तापक्षनेते संदीप जोशी, डॉ. मिलिंद भुसारी, संस्थेच्या संचालिका माधवी पांडे, सहसंचालक कुणाल गडेकर आणि मनीषा काशीकर मंचावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्‍वेतकेतु या विवाह सूचक संस्थेचे अनावरण करण्यात आले.
श्‍वेतकेतु या नावाबाबत माहिती देताना काळे म्हणाले, अरुणी ऋषींचा मुलगा उद्गीलक आणि त्याचा मुलगा श्‍वेतकेतु. श्‍वेतकेतु अतिशय हुशार होता. चंदोग्य उपनिषदाप्रमाणे श्‍वेतकेतुने विवाह संस्थेविषयी पहिले लिखाण केले. विवाह कसा असावा, याविषयी त्यांनी लेखन केले आहे. लोकांना याविषयी माहिती व्हावी आणि श्‍वेतकेतुंचे स्मरण राहावे म्हणून संस्थेचे नाव श्‍वेतकेतु ठेवण्यात आले. भविष्य आणि कुंडलीविषयी ते म्हणाले, बायोकेमेस्ट्री आणि फोटोकेमेस्ट्री यावर भविष्याचे प्रमाण ठरते. लग्नासाठी चार गोष्टी आवश्यक असतात. चांगला स्वभाव, स्वच्छ चारित्र्य, टिकाऊपणा आणि नशीब. या चार गोष्टी नसतील तर कितीही चांगली कुंडली असली तरी ते लग्न टिकू शकणार नाही. मात्र, लग्न जमविण्यासाठीची अशी पद्धत कोणी वापरतच नाही. विवाहासाठी तयार करण्यात आलेले नियम अतिशय प्राचीन आहेत. त्यामध्ये परिस्थितीनुसार बदल करावा, अशी नोंद करण्यात आली आहे. परिस्थिती बदलली. पण, माणसाचा स्वभाव बदलला नाही. त्यामुळे विवाहासाठी अजूनही तेच नियम पाळले जातात. आपण महत्त्वाच्या चार गोष्टींचा विचार केला तर अनेक लग्ने टिकतील.
संस्थेला शुभेच्छा देताना नंदा जिचकार म्हणाल्या, सध्याच्या काळात लग्न जमविण्यासाठी विवाह संस्था अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे अशी संस्था आताच्या काळातील पालकांसाठी मदतीची ठरेल. संदीप जोशी यांनी संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. मनीषा काशीकर म्हणाल्या, आपल्या संस्कृतीत सोळा संस्कार आहेत. त्यातील विवाह हा एक महत्त्वाचा संस्कार होय. योग्य वर आणि वधू मिळावी यासाठी प्रयत्न केले जाते. अशाच योग्य उपवधू-वरांची निवड आमच्या संस्थेद्वारे केल्या जाईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवी पांडे यांनी केले. संचालन श्रद्धा घरोटे यांनी केले. यावेळी प्रभाग क्र. ३६ च्या नगरसेविका पल्लवी श्यामकुळे आणि मीनाक्षी तेलगोटे उपस्थित होत्या. सोहळ्याच्या आयोजनासाठी संध्या अडाळे आणि रिता ठकार यांनी सहकार्य केले.