सहिष्णुता-असहिष्णुतेच्या मर्यादा ठरविण्याची गरज

0
48

– प्रमोद डोरले यांचे स्पष्ट मत
– म. म. बाळशास्त्री हरदास स्मृती व्याख्यानमाला
नागपूर, ११ ऑगस्ट
अहिंसेला सर्वोच्च धर्म मानणे हे एका मर्यादेपर्यंतच चांगले आहे. हीच बाब सहिष्णुता-अहिष्णुतेलाही लागू पडते. या दोन्हींचा स्पष्ट अर्थ महर्षी व्यासांच्या महाभारतात आहे. महाभारत काळातही या गोष्टी होत्या. अन्याय-अत्याचार करणारा सहिष्णु पण त्याला विरोध करणारा असहिष्णु ही त्या काळची परिस्थिती आजच्या आधुनिक भारतातही दिसून येते. त्यामुळेच आज सहिष्णु-असहिष्णुतेच्या मर्यादा ठरविण्याची अत्यंत गरज असल्याचे स्पष्ट मत संत साहित्याचे अभ्यासक प्रमोद डोरले यांनी व्यक्त केले.
भारतीय शिक्षण मंडळातर्फे आयोजित आणि स्व. वीणाताई हरदास पुरस्कृत म. म. बाळशास्त्री हरदास स्मृती व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ‘महाभारत ते भारत’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. कुरुक्षेत्रात कर्णाची धर्माची भाषा, आतेभाऊ असलेल्या शिशुपालाचा श्रीकृष्णाकडून वध यासह अनेक दाखले देत डोरले यांनी महाभारतकालीन व भारताच्या आजच्या परिस्थितीवर भाष्य केले.
प्रमोद डोरले म्हणाले, जगात अनेक संस्कृती आल्या आणि विरल्या सुद्धा. पण, भारतीय संस्कृती आजही टिकून आहे. कारण, यात माणुसकीचा संदेश देणारा धर्म अंतर्भूत आहे. ही बाब आपण भारतीय जोपर्यंत लक्षात घेणार नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाही. महाभारत म्हणजे मानवी जीवनाचे ‘ब्ल्यू प्रिंट’च आहे. त्यावेळचे धृतराष्ट्राचे पुत्रप्रेम म्हणजे आजची भारतामधील घराणेशाही आहे. हस्तिनापूरची फाळणी योग्य नसल्याचे विदुराने सांगितले होते. भीष्माचार्यांनाही ती मंजूर नव्हती. तरीदेखील ती झालीच. १४ ऑगस्ट १९४७ ला आपणही तेच अनुभवले. धर्म कधीच विघटन करीत नाही, उलट तो सर्वांना एकवटून ठेवतो. मात्र दुर्दैवाने आज या सूत्राकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सर्वधर्मसमभाव फोफावला आहे. अल्पसंख्यकाने एखाद्या महिला किंवा तरुणीवर अत्याचार केल्यास त्याला विरोध करणारा आज असहिष्णु ठरविला जातो. धर्माच्या संदेशावर डोरले यांनी सांगितले की, अर्थ व काम यातूनही मोक्ष मिळू शकतो. पण, त्याचा वापर योग्यप्रकारे झाला पाहिजे. आज मात्र केवळ अर्थ व कामाचाच वापर सुरू आहे. हा नुसता चंगळवाद आहे. याला धर्म म्हणता येणार नाही. त्यामुळेच हा चंगळवाद आधुनिक भारताचा स्थायीभाव होत आहे का? यावर चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे स्पष्ट करीत प्रमोद डोरले यांनी व्याख्यानाचा शेवट केला.
प्रास्ताविक संयोजक प्रा. सुधाकर रानडे यांनी केले. मोहिनी जोशी यांनी संचालन करून उपस्थितांचे आभार मानले. व्यासपीठावर भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शिरपूरकर, कार्यवाह ऍड. उपेंद्र जोशी उपस्थित होते.