राजकीय सुधारणांना वेग येणार : वरुण गांधी

0
75

नागपूर, ११ ऑगस्ट
आपल्या देशात राजकीय सुधारणेची प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील दशकात ती वेग घेईल, असा विश्‍वास भाजपा खासदार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या स्थायी समितीचे सदस्य वरुण गांधी यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी हॉटेल रॅडिसन ब्लू येथे पत्रकारांशी संवाद साधला.
देशात केवळ राजकीयच नव्हे, तर इतर क्षेत्रातही झपाट्याने बदल होत आहेत. मुख्य म्हणजे परिवर्तनाचा दर व वेग अधिक असणे ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातील भारतीय राजकीय क्षेत्र उत्तम असेल, याविषयी देखील मी सकारात्मक असल्याचे ते म्हणाले. खासदारांच्या वेतनवृद्धी संदर्भात बोलताना ते म्हणाले, स्वत:चे वेतन वाढविण्याचा अधिकार खासदारांना नाही, तर घटना हाच यासाठी वेतनआयोग आहे. मुख्य म्हणजे खासदारांना एवढ्या वाढीव वेतनाची गरज आहे का? हा मूळ प्रश्‍न आहे. गोंधळ घालणे, कामकाज होऊ न देणे, समस्या सोडवणुकीचे प्रमाण यावर हे अवलंबून असण्याची गरज आहे. शेतकरी आत्महत्यांसंदर्भात बोलताना त्यांनी, कृषी मालाचा परतावा योग्य मिळावा म्हणून प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगितले.