जिप अध्यक्षांची सीईओंवर कुरघोडी

0
83

-विभागप्रमुखांच्या बैठकींना लगाम
-वृत्तविश्‍लेषण
नागपूर, ११ ऑगस्ट
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिवसभर विभागप्रमुखांच्या बैठका घेतात. याचा परिणाम कामकाजावर होत आहे. आता विभागप्रमुखांच्या नेतृत्वातील भरारी पथके दररोज विविध कार्यालयांना भेटी देणार आहेत. हा निर्णय घेेऊन अध्यक्षांनी सीईओंच्या बैठकींना एकप्रकारे लगाम घालण्याचाच प्रयत्न केला आहे. अर्थात अध्यक्षांनी सीईओंवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून रुजू झाल्यापासून डॉ. कादंबरी बलकवडे दररोज विभागप्रमुखांच्या बैठका घेत आहेत. त्यामुळे काम करायला वेळच मिळत नसल्याचे विभागप्रमुखांचे म्हणणे आहे. सीईओंच्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषदेचा १८ कोटींचा निधी अखर्चित राहिला असून, हा निधी परत जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी हा विषय काल झालेल्या जिप स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. कुंभारे यांनी तर चक्क पदाधिकार्‍यांनाच दोषी ठरविले. सीईओंच्या कार्यप्रणालीवर यापूर्वीही अध्यक्षांसह सर्वच पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली होती. सीईओ विभागप्रमुखांना काम करण्यास वेळच देत नसल्याचा पदाधिकार्‍यांचा आरोप आहे. विभागप्रमुखही दररोजच्या बैठकांना कंटाळल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
सीईओंच्या दररोजच्या बैठकांना लगाम घालण्यासाठी जिप अध्यक्ष निशा सावरकर यांनी भरारी पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला. विभागप्रमुखांच्या नेतृत्वातील ही भरारी पथके दररोज पंचायत समिती, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी, शाळा आदींना भेट देऊन पाहणी करणार आहे.
पदाधिकार्‍यांना अनेक विकासकामांच्या फायलींचा निपटारा करण्यासाठी विभागप्रमुखांची गरज भासते. परंतु, ते जेव्हा विभागप्रमुखांना फोन करतात, तेव्हा ते सीईओंकडे बैठकीत असल्याचेच सांगतात. त्यामुळे पदाधिकार्‍यांच्या विविध योजनांच्या फाईल्स प्रलंबित राहतात. परिणामी जिल्हा परिषदेचा १८ कोटींचा निधी अखर्चित राहिला. गेल्या आठवड्यात महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतींसह सर्व सदस्यांनी समितीच्या बैठकीवरच बहिष्कार घातला होता. महिला व बालकल्याण विभागाच्या आठ योजनांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात मंजुरी देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा सदस्यांचा आरोप होता. हा सर्व प्रकार लक्षात घेता विभागप्रमुखांना सीईओंच्या बैठकींच्या जाचातून मुक्त करण्यासाठी भरारी पथकांची योजना आखण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे.