शहरात दोनदिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल

0
82

– केंद्रीय मंत्री, लोकसभाध्यक्ष, मुख्यमंत्री नागपुरात
नागपूर, ११ ऑगस्ट
उद्या १२ आणि १३ ऑगस्ट रोजी नागपुरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांची रेलचेल राहणार असून केंद्रीय मंत्री, लोकसभाध्यक्ष, मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे मंत्री नागपुरात येत आहेत.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा १३ ऑगस्ट रोजी नागपुरात येत असून सकाळी ११.४५ वाजता मिहान येथे ‘यु. के. इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटी’ या संस्थेच्या कोनशिला समारंभास ते उपस्थित राहतील. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री अशोक गजपती राजू यांचे १३ रोजी आगमन होणार असून, दुपारी २.३० वा. मिहानमधील एअर इंडिया एमआरओमध्ये दुरुस्तीसाठी येणार्‍या पहिल्या विदेशी विमानाचे स्वागत ते करतील. यावेळी मुख्यमंत्री व नितीन गडकरी उपस्थित राहतील.
यासोबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान रविवारी नागपुरात येतील. दुपारी १२.३० वाजता राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे उद्घाटन करतील. सोबत केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल देखील नागपुरात येत आहेत. शिवाय अमरावती येथील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन उद्या शनिवारी सकाळी नागपुरात येणार आहेत. त्यांचा नागपुरात कार्यक्रम नाही. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकरही शनिवारी नागपुरात येऊन विदर्भातील इतर कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहे.