अस्वच्छ परिसरामुळेच मुलांचा मृत्यू : योगी

0
52

– बीआरएम रुग्णालयातील बळीसंख्या ६३
– महाविद्यालयाचे अधिष्ठाता निलंबित
गोरखपूर, १२ ऑगस्ट 
येथील बाबा राघवदास मेडिकल महाविद्यालय व रुग्णालयात प्राणवायूच्या अभावी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची संख्या ६३ च्या घरात गेली आहे. यात ३० लहान मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी बीआरएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजीव मिश्रा यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, यातील काही मुलांचा मृत्यू प्राणवायूअभावी झाला असला, तरी घाणीचे साम्राज्य हेदेखील यामागील एक कारण असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, केवळ प्राणवायूच्या अभावामुळे रुग्णांचा मृत्यू झाला असे नाही, वेगवेगळ्या कारणांमुळे मुलांचा मृत्यू झाला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबाद येथे आयोजित गंगाग्राम कार्यक्रमात सांगितले की, गोरखपूर येथील रुग्णालयात अलीकडील काळात बालकांच्या झालेल्या मृत्युमागे घाणीचे साम्राज्य हे एक मोठे कारण आहे. सेफ्टी टँकच्या अभावामुळे घाण पसरत आहे.
ही घटना अतिशय गंभीर अशीच आहे. यासाठी जबाबदार असलेल्या कोणालाही सोडण्यात येणार नाही. अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदित्यनाथ यांनी दिला. तर, सिद्धार्थनाथ सिंह यांच्या मते, रुग्णालयात प्राणवायूची कमतरता असल्याची माहिती प्रशासनाला आजवर कोणीच दिली नाही.
प्रत्येक ऑगस्टमध्ये बालकांचा मृत्यू
सिद्धार्थनाथ म्हणाले की, या रुग्णालयात प्रत्येकच वर्षी ऑगस्ट महिन्यात बालकांचा मृत्यू होतो. या रुग्णालयात प्रकृती चिंताजनक असलेल्याच बालकांना भरती करण्यात येते. २०१४ मध्ये ५६७ बालकांचा मृत्यू झाला होता.
पंतप्रधानांची स्थितीवर नजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरखपूर स्थितीवर अतिशय बारीक नजर ठेवून आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री अनुप्रिया गोयल आणि आरोग्य सचिव स्वत: गोरखपूरला जाऊन स्थितीचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली. (वृत्तसंस्था)