जदयूने रालोआत सहभागी व्हावे : अमित शाह

0
51

नवी दिल्ली, १२ ऑगस्ट 
जदयूने राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे. त्यामुळे जदयू लवकरच रालोआत तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातही सहभागी होण्याची शक्यता आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी नितीशकुमार दिल्लीत आले होते नितीशकुमार यांनी तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती.
या भेटीनंतर अमित शाह यांनी एक ट्विट करत जदयूने रालोआत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. नितीशकुमार यांच्या भेटीचे छायाचित्रही अमित शाह यांनी या ट्विटसोबत दिले आहे. जदयू आणि भाजपाची जुनी मैत्री आहे. जदयू अनेक वर्ष रालोआचा घटक पक्ष होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी जदयू आणि भाजपा यांची मैत्री तुटली होती.
जदयूने भाजपासोबत सरकार बनवण्याच्या निर्णयाला विरोध करणारे ज्येष्ठ जदयू नेते शरद यादव यांची आज जदयू संसदीय पक्षाच्या नेतेपदावरून हकालपट्‌टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद यादव यांनी रालोआचे संयोजक म्हणून काम केले आहे. जदयू रालोआत सहभागी झाल्यावर रालोआचे संयोजक म्हणून नितीशकुमार यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे.
जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची १९ ऑगस्टला बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत जदयूच्या रालोआत सहभागी होण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. जदयू रालोआसोबत मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्येही सहभागी होण्याची शक्यता आहे. मोदी आणि अमित शाह यांच्या भेटीनंतर नितीशकुमार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलतांना, आम्ही बिहारमध्ये सरकारमध्ये आहे, त्यामुळे मोदी मंत्रिमंडळातही आम्ही सहभागी होऊ शकतो, असे विधान केले होते. १५ ऑगस्टनंतर मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.