संसदीय पक्षाच्या नेतेपदावरून शरद यादव यांना काढले

0
55

नवी दिल्ली, १२ ऑगस्ट 
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जाहीर टीका करणार्‍या शरद यादव यांची आज जदयू संसदीय पक्षाच्या नेतेपदावरून हकालपट्‌टी करण्यात आली असून त्यांच्या जागेवर आरसीपी सिंह यांची निवड करण्यात आली. महाआघाडीतून बाहेर पडत भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन करण्याच्या नितीशकुमार यांच्या निर्णयावर शरद यादव यांनी खुलेआम नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी बिहारमध्ये जनसंवाद यात्राही सुरू केली आहे. नितीशकुमार यांनी बिहारच्या जनतेने दिलेल्या जनादेशाशी धोका केल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि शरद यादव यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या शपथविधीच्या निमित्ताने दिल्लीला आले असता नितीशकुमार यांनी, पक्षाचा निर्णय मान्य नसेल तर शरद यादव वेगळा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, असे म्हटले होते. शरद यादव यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या आधीच आज जदयूने शरद यादव यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्‌टी करत त्यांच्या जागेवर आरसीपी सिंह यांची नियुक्ती केली.
राज्यसभेतील जदयूच्या सात आणि लोकसभेतील दोन खासदारांनी आज सकाळी पक्षाचे महासचिव संजय झा यांच्यासोबत राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट घेत त्यांना शरद यादव यांना संसदीय पक्षाच्या नेतेपदावरून हटवण्याबाबतचे तसेच नवा नेता म्हणून आरसीपी सिंह यांना मान्यता देण्याबाबतचे पत्र सादर केले.
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलवलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे जदयूने राज्यसभा सदस्य अनवर अली यांना निलंबित केले आहे. अनवर अली, शरद यादव यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. जदयूने शरद यादव यांना निलंबित करण्याचा निर्णय अद्याप घेतला नसला तरी हा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. जदयूने १९ ऑगस्टला आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी शरद यादव यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीला उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याची संधी शरद यादव यांना देण्यात आली आहे. त्यामुळे त्याआधी शरद यादव यांच्यावर कोणतीच कारवाई केली जाणार नाही, असे मानले जात होते. मात्र त्याआधीच संसदीय पक्षाच्या नेतेपदावरून शरद यादव यांची हकालपट्‌टी करण्यात आल्यामुळे शरद यादव या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आता मावळली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात अण्णाद्रमुकचा प्रवेश?
नवी दिल्ली, १२ ऑगस्ट 
पुढील आठवड्यातील स्वातंत्र्यदिनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित असून, संयुक्त जनता दलासोबतच अण्णाद्रमुकचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश होणार आहे. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच, यावेळी या पक्षांच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. संयुक्त जनता दल व अण्णाद्रमुककडून प्रत्येकी दोन नेते केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता असून, एक मंत्रिपद कॅ बिनेट, तर एक राज्यमंत्री दर्जाचे असेल.