राकॉंच्या अनुपस्थितीमुळे विरोधी ऐक्यात फूट 

0
70

– गुजरात राज्यसभा निवडणुकीनंतरच्या आरोप-प्रत्यारोपाची परिणती
नवी दिल्ली, १२ ऑगस्ट 
गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अहमद पटेल विजयी झाले असले तरी या विजयामुळे कॉंग्रेसला आपला एक मित्रपक्ष गमवावा लागला आहे. या निवडणुकीनंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. याचा परिणाम विरोधी ऐक्यासाठी कॉंग्रेसने बोलवलेल्या बैठकीवरही झाला.
गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभेच्या चुरशीच्या निवडणुकीत सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल विजयी झाले. मात्र अहमद पटेल यांच्या विजयात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सहभाग आहे की नाही, यावरून दोन्ही कॉंग्रेसमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. या निवडणुकीत आम्ही कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता, कॉंग्रेसला मतदान करण्यासाठी पक्षादेश (व्हीप) काढला होता, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात आला होता.
मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोनपैकी एका आमदाराने भाजपाला तर दुसर्‍याने कॉंग्रेसला मतदान केल्याची चर्चा होती. मात्र मतमोजणीचे जे आकडे आले ते पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही आमदारांनी भाजपाला मतदान केल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे. राष्ट्रवादीच्या दोनपैकी एका आमदारानेही कॉंग्रेसला मतदान केले असते तर अहमद पटेल यांना ४५ मते मिळायला हवी होती, असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात अहमद पटेल यांना ४४ मते पडली. कॉंग्रेसजवळ ४४ आमदार होते. यातील दोन आमदारांची मते फुटली, म्हणजे कॉंग्रेसजवळ ४२ मते राहिली. जदयूच्या एका आमदाराने अहमद पटेल यांना मत दिले. म्हणजे पटेल यांची मते ४३ झाली. ४४ वे म्हणजे निर्णायक मत पटेल यांना नेमके कोणी दिले, यावरून संभ्रम आहे. हे मत भाजपाच्या एका आमदाराचे असल्याचा कॉंग्रेसचा दावा आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र ते आपल्या आमदाराचे असल्याचा प्रतिदावा केला आहे. यातूनच दोन कॉंग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली.
राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्याला मतदान केले नाही, असा आरोप करत कॉंग्रेसने आगपाखड केली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दुखावले गेले. आपली नाराजी दर्शवण्यासाठी सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी शुक्रवारी बोलवलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहिष्कार घातला. आमच्या एका मतामुळे अहमद पटेल विजयी झाले, याची जाणीव कॉंग्रेस आगामी काळात ठेवेल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खा. माजिद मेमन यांनी म्हटले.
राज्यसभेच्या निवडणुकीत पाठिंबा देऊनही कॉंग्रेस जर टीका करत असेल तर या बैठकीला उपस्थित राहण्यात काही अर्थ नव्हता, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले. विशेष म्हणजे या बैठकीला आमच्यापैकी कोणी तरी उपस्थित राहील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. मात्र या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कोणीच उपस्थित राहिले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनुपस्थितीमुळे या बैठकीला १६ पक्षांचीच उपस्थिती होती. त्यामुळे अहमद पटेल यांच्या विजयामुळे मिळालेला कॉंग्रेसचा आनंद फार काळ टिकला नाही. आपल्या अतिउत्साहीपणामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेससारखा एक महत्त्वपूणर्र् मित्रपक्ष कॉंग्रेसने गमावला, परिणामी विरोधी ऐक्यात फूट पडली. मात्र विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अद्यापही संपुआसोबत असल्याचा दावा केला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीला उपस्थित नव्हते, पुढच्या बैठकीला आम्ही उपस्थित राहू, असे पवार यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा आझाद यांनी केला.   (तभा वृत्तसेवा)