‘आता प्रत्येक सिनेमात अश्‍लील दृश्यांची मेजवानी!’

0
71

– पहलाज निहलानी यांची खंत
नवी दिल्ली, १२ ऑगस्ट 
केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर पहलाज निहलानी यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. माझ्या जाण्यानंतर आता सिनेमांमधून पॉर्न आणि अश्‍लील दृश्यांची मेजवानीच असेल, असे ते म्हणाले. आपल्याला सेन्सॉर बोर्डावरून हटवण्यामागे काही सिनेनिर्मात्यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.सेन्सॉरशीप महत्त्वाचीच आहे. ती नाकारणे म्हणजे तुम्ही निर्मात्यांना प्रत्येक सिनेमात पॉर्न आणि अश्‍लील दृश्य पेरण्याची पूर्ण सूट देण्यासारखंच आहे. आपल्या देशाची संस्कृती आणि आपल्या पारंपरिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी सेन्सॉरशीप आवश्यकच आहे, असे पहलाज निहलानी यांनी म्हटले आहे. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून अध्यक्षपदावरून नुकतेच त्यांना दूर करून त्यांच्या जागी गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्या देशात सिनेमॅटोग्राफ कायदा भारतीयांना डोळ्यांसमोर ठेवून तयार केला आहे. सिनेमाचा युवा वर्गावर खूप प्रभाव पडतो. तुम्ही सिनेमात जितकी जास्त अश्‍लीलता दाखवाल तितकी समाजात हिंसा आणि गुन्हेगारीच्या घटना वाढणार आहेत. लोक स्वच्छ भारताच्या जाहिराती बघतात आणि प्रभावित होऊन रस्त्यावर थुंकणे थांबवतात. त्यांना चुकीच्या गोष्टी सांगाल तर ते चुकीच्या गोष्टीच करणार. हे लोकांना का कळत नाही, असा सवाल निहलानींनी केला.
सेन्सॉऱ बोर्डाचे काम केवळ प्रमाणपत्र देणे आहे, सेन्सॉरशिप लावणे नव्हे, असा चुकीचा प्रचार सरकारमधली काही मंडळी करत आहेत, असा निहलानींचा आरोप आहे. काही निर्माते माझी बदनामी करण्यासाठी लवादाला सिनेमाचे वेगळे व्हर्जन दाखवतात असाही निहलानींचा आरोप आहे. ते म्हणतात, टीव्ही आणि डिजिटल जगतातही सेन्सॉरशिपची प्रचंड गरज आहे. टीव्हीवर बाललैंगिक शोषण दाखवले जाते. आपल्यासारख्या समाजात हे सगळे दाखवण्याची परवानगी द्यायला हवी का? मी माझे कर्तव्य इमानदारीने केले. मला मंडळातून काढून टाकल्याची माहिती मीडियातूनच मिळाली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपण सरकारवर नाराज नाही, विशेषत: मोदी सरकारची कामगिरी चांगली आहे. मी त्यांचा प्रशंसक आहे. ९८ टक्के निर्माते माझ्यावर खुश होते. २ टक्के  निर्मात्यांची आता दिवाळी असेल. ज्या चुकीच्या गोष्टींविरोधात मी लढत होतो, त्या आता पुन्हा येतील, असे त्यांनी उद्विग्नपणे म्हटले.   (वृत्तसंस्था)