या प्रजासत्ताकाला एका आईचे प्रश्‍न

0
48

अन्वयार्थ
आदित्य ९ वर्षांचा आहे. त्याला आपले वडील राजेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे लागले. काही दिवसांपूर्वीच राजेश यांनी पू. डॉक्टरजी आणि पू. श्रीगुरुजी यांच्या फोटोसमोर उभे राहून आपला मुलगा आदित्य याच्यासमवेत काढलेला सुंदर फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता. ‘‘माझा मुलगा रा. स्व. संघाचा स्वयंसेवक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे,’’ असेही त्यांनी या फोटो समवेत लिहिले होते.
आपल्या मुलाची चिता जळताना स्वत:च्या डोळ्यांनी पाहणे हा कुठल्याही आईच्या अथवा वडिलांच्या जीवनातला सर्वात वेदनादायक प्रसंग असतो. मग जीवनात उरतेच काय? राजेशच्या आईने आपल्या मुलासमवेत केवळ ३४ वर्षेच नाही घालविली, तिने घालविले २,९७,८४० तास, तिने घालविली १७८७०४०० मिनिटे. तिने पाहिली न जाणो किती जन्मांची स्वप्ने, आशा आणि विश्‍वासाचे क्षण…
तिरुअनंतपुरमच्या जवळ कल्लमपल्ली गावचा होता राजेश. त्याचे वडील सुदर्शन नारळ तोडणारे मजूर म्हणून काम करतात. स्वत: राजेश घरबांधणी करणार्‍या मिस्त्रीचे काम करायचा, तर कधी ऑटोरिक्षा चालक म्हणूनही काम करत होता. त्याची पत्नी रिना गृहिणी होती. राजेशला राजीव नावाचा भाऊ आणि राजी नावाची बहीण आहे. त्याच्या आईचे नाव ललिता. ललिता आणि सुदर्शन यांनी किती उत्साहाने आणि आशेने आपल्या तीनही मुलांची नावे तालासुरात ठेवली हे लक्षात यावे. राजेश, राजीव आणि राजी. ३४ वर्षे म्हणजे दोन लाख सत्तावन हजार आठशे चाळीस तास म्हणजे एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख सत्तर हजार चारशे मिनिटे आई ललिताने ज्या राजेशसमवेत घालविले त्याला अचानक, अगदी आकस्मिकपणे जळताना पाहून तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना तरी करू शकतो काय? संसद, विधानसभा सदस्य अथवा वृत्तपत्रातील स्तंभांच्या माध्यमातून आरडाओरड करणारे कथित बुद्धिवादी ही गोष्ट समजू, अनुभवू शकतील काय? राजेशच्या मातेचा आक्रोश, तिचा टाहो या सर्वांच्या कानी पडेल काय?
राजेश आणि रिनाला दोन मुले आहेत. एक सहा वर्षीय आदित्य आणि दुसरा तीन वर्षीय अभिषेक. विशाल व बलदंड बाहू असलेल्या, नेहमी ताठ मानेने वावरणार्‍या त्यांच्या वडिलांना कम्युनिस्ट दहशतवाद्यांनी प्रथम भोसकले, नंतर त्यांच्या अंगावर ८९ घाव घातले आणि त्यांचा प्राण घेतला हे रिना आपल्या मुलांना सांगू शकेल काय? आपल्या पतीच्या भयानक मृत्यूचे स्मरण ठेवून लोकांना सांगण्याचे धाडस कोणती पत्नी दाखवू शकेल. तिचे दिवसच्या दिवस, महिने, वर्षे स्मृतीच्या झरोक्यातून अंधारात उजेड शोधण्यातच जातील.
आणि (संघविरोधी) राजकारणी म्हणतील, ‘तो शहीद झाला, आम्ही मुख्यमंत्र्यांना जाब विचारला. आम्ही केरळ सरकारकडे विचारणा केली’. पण मग, राजेशची हत्या करणार्‍यांना अटक केली काय? गुन्हेगारांना शिक्षा करू असे केरळ सरकार आता म्हणत आहे. करू म्हणता तर ठीकच आहे. संसदेत यावर जोरदार चर्चा झाली, वर्तमानपत्रांनी या विषयावर लिहिले. पण मग पुढे काय? संसदेतील चर्चा किंवा माध्यमांमधून झालेले लिखाण निष्फळ ठरू नये. मात्र, दरवेळी असेच होते. आम्हाला हवे आहेत राजेशचे ते २९७८४० तास, पाहिजेत ती १७८७०४०० मिनिटे. हवी आहे ती   राजेशची प्रचंड ऊर्जा आणि हवी आहे ती त्याची संघशाखा. आम्हाला हवे ते राजेशचे स्वयंसेवकत्व आणि हवी आहे त्याची उपस्थिती.
राजेशची आई ललिता यांच्या खोलवर गेलेल्या सुन्न दृष्टीकडे पाहून एकाच प्रश्‍नाचे उत्तर देण्याची हिंमत दाखवा आणि तो प्रश्‍न म्हणजे राजेश या जगातून का नाहीसा झाला? असे कुठले कारण होते की, त्याचे अस्तित्वच एवढ्या क्रूरपणे नष्ट करण्यात आले? तो एक स्वतंत्र गणराज्याचा सभ्य नागरिक होता. त्याला का मरावे लागले? या प्रश्‍नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत.
राजेश हा देशभक्त, मातृभूमीवर प्रेम करणारा, एका साधारण मजुराचा मजूर पुत्र होता. त्याच्यावर का हल्ला झाला? तो निष्ठावान हिंदू होता. हिंदुस्थानचा देशभक्त नागरिक होता. हिंदू संस्कृती, सभ्यता, जीवनपद्धती आणि राष्ट्ररक्षण हेच ध्येय असलेल्या संघाचा तो स्वयंसेवक होता आणि हाच त्याचा अपराध होता. देशभक्त नागरिक असणे हा जणू त्याचा गुन्हा होता. राजेश अनुसूचित जातीचा अर्थात दलित समाजाचा होता. संघर्षशील, कर्तव्यरत, साहसी, स्वाभिमानी, सुसंस्कृत दलित. त्याचे कुणाशीही शत्रुत्व नव्हते. तरीही त्याची पाशवी, अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. का?
गेल्या १३ महिन्यांत या देशाने अशा प्रकारच्या चौदा भीषण व रक्तरंजित घटना पाहिल्या आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांवर लिहिले जाईल तेव्हा याचे विश्‍लेषण कशा प्रकारे होईल. हा देश कोणाचा आहे? देशात कोणाचे राज्य आहे? एखाद्याची अमानुषपणे, भीषण हत्या झाली तर आम्ही फक्त बघत बसणार काय? अवैध, अमानुष, अस्वीकार्य कृत्य कुणी केले तर आम्ही निर्विकार राहणार काय? मग देशभक्त नागरिक होण्याचा काय अर्थ आहे? तुम्ही देशभक्त आहात म्हणजे तुम्हाला असुरक्षित जीवन जगण्यास बाध्य व्हावे लागेल, असा याचा अर्थ आहे काय? जेव्हा पशुहत्या होते तेव्हा तुम्ही ‘सेक्युलर ट्विट’ करता, जनावराची कत्तल करणार्‍यावर जर कुणी हल्ला चढविला तर हे सेक्युलर लोक केवळ ट्विट करूनच थांबत नाहीत तर जंतरमंतरवर धरणेही देतात. पशूंची कत्तल करणार्‍यांवर जेव्हा सडकून टीका केली जाते तेव्हा तर या सेक्युलॅरिस्टांच्या संतापाचा पारा अधिक चढतो. ते टीका करणार्‍यांनाच लक्ष्य करतात. राजेश तर हाडामांसाचा माणूस होता. त्याची अतिशय क्रूर हत्या होऊनही हे सेक्युलर लोक तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसले आहत. या सेक्युलॅरिस्टांची कमालच आहे? काही लोकांबाबत ते अतिशय हळूवार, संवेदनशील असतात. याकूब मेमनसाठी यांचे हृदय तुटते. मग ऐन मध्यरात्रीही सुप्रीम कोर्टाचा दरवाजा उघडला जातो. कधी अखलाख तर कधी पहलू खानच्या नावाने शोक केला जातो. हृदय तर अखेर हृदयच असते ना! ते कधीच जात विचारून धडधडत नाही. पण काही जणांचे हृदय काही खास लोकांसाठीच तुटते. समोरची व्यक्ती कपाळावर टिळा लावणारी आहे की डोक्यावर टोपी घालणारी आहे हे ठरवून काहीजण सेक्युलर आक्रोश करतात. मग, अशा वेळी लोकशाही, राज्यघटना, समान न्याय, सामाजिक समरसता, सामाजिक न्याय, अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे सारे शब्द निरर्थक, गोलगोल ठरतात, अगदी जॉली एलएलबीमधील न्यायाधीशाप्रमाणेच गोल…
राजेशचा मृत्यू केवळ एका स्वयंसेवकाचा, एका सुसंस्कृत नागरिकाचा, एका देशभक्त युवकाचा मृत्यू नाही, तर त्याच्या मृत्यूमुळे लोकशाही आणि घटनात्मक व्यवस्थेचा बुरखा टराटरा फाटला आहे. केवळ देशभक्त असल्याचा गुन्हा केल्यामुळे आपले प्राण जाऊ शकतील अशी भीती देशातील नागरिकांना वाटत आहे. हजारो वर्षांपासून या देशातील धर्म, संस्कृती आणि जीवनपद्धतीवर हल्ले होत आहेत. आमचे अस्तित्व मिटविण्याचे प्रयत्न सतत होत आहेत. याच्याशी सातत्याने संघर्ष करीत असलेले हिंदुत्वनिष्ठ नागरिक आजही कम्युनिस्ट जिहादचे बळी ठरत आहेत. हाच प्रश्‍न डॉ. हेडगेवार यांच्या जन्मानंतर आलेली तमाम पिढी आज विचारत आहे. कम्युनिस्टांचा एवढा हिंसाचार माजूनही हे बुद्धिवादी व कथित सेक्युलर काहीही लिहायला, बोलायला तयार नाहीत. तेव्हा सर्व सभ्य व सुसंस्कृत मार्गांचा अवलंब करून या लोकांना याची जाणीव करून दिलीच पाहिजे. या लोकांना एक प्रश्‍न अवश्य विचारला पाहिजे की, जर राजेश तुमचा मुलगा असता तरी तुम्ही असेच गप्प  बसले असते काय?
तरुण विजय