गोविज्ञानामुळे शेती आणि गोवैद्यक क्षेत्रात अवतरले नवे युग…!

0
33

समृद्धी
देशी गाय हा खरे म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घरोघर दिसणारा प्राणी! पण, गेल्या काही वर्षांत तो गायब झाला होता. तो परवडत नाही, अशी सर्वसाधारणपणे प्रतिक्रिया होती. गेल्या पाच-सहा महिन्यांत तो विषय पुढे आला तो प्रामुख्याने गोरक्षक आणि गोमांस हा आधिकार आहे, असे सांगणारे यांच्या वादातून. हा वाद एका बाजूला सुरू असताना दुसर्‍या बाजूला गाईचा आपल्या दैनंदिन जीवनात किती उपयोग आहे, हे दाखवणारे प्रयोग मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. हे प्रयोग देशभर सुरू आहेत, पण ते शेतकर्‍यापर्यंत म्हणावे तसे पोहोचलेले नाही. त्याच वेळी दुसर्‍या बाजूला त्याचा आरोग्यरक्षणासाठी आणि व्याधी निवारणासाठी किती उपयोग आहे, हे दाखवणारे कामही अनेक ठिकाणी झाले. त्याचे परिणामही मोठे आहेत, तरीही अजून त्याकडे सामान्य जनतेचे लक्ष गेलेले नाही. रासायनिक खते देऊन होणार्‍या शेतीपेक्षा कुठे एकचतुर्थांश खर्चात जैविक शेती होण्याचे प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी होत आहेत. त्याचप्रमाणे असाध्य व्याधीवर देशी गाईच्या पंचगव्याच्या आधारे परिणामकारक उपचार होण्याचेही प्रयोग यशस्वी होत आहेत. याकडे जाणकारांनी आवर्जून लक्ष देणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने आणि अनेक राज्य सरकारांनी गोवंशाच्या संरक्षणाची भूमिका घेतल्यावर गोरक्षणाचा हक्क आणि गाईचे मांस वापरण्याचा हक्क असे दोन गट निर्माण झाले व त्यांच्यातील तणावामुळे कुठे कुठे कायदा सुव्यवस्थेचे प्रसंगही निर्माण झाले. त्या सगळ्या घटनांत गाईचा शेतीवर व व्याधी उपचार क्षेत्रावर नेमका काय परिणाम होतो, हे विषय बाजूला राहिले. याचे कारण म्हणजे जे प्रयोग झाले ते व्यक्तिगत स्वरूपाचे होते. पण, जेथे संस्थात्मक किंवा संघटनात्मक पातळीवर प्रयोग झाले, त्याला चांगले यश मिळाले.
नुकताच, भाकड गाईंचा सन्मान करणारा एक कार्यक्रम नगर जिल्ह्यात मांजरसुंभे गावात झाला. सध्या सगळीकडे भाकड गाईचा मुद्दा एक समस्या म्हणून चर्चिली जाते. तेथे पन्नासपेक्षा जास्त कुटुंबांना एक एक भाकड गायच देण्यात आली. त्यातील जाणकारांचे म्हणणे असे की, दुभत्या गाईपेक्षा भाकड गाईचे शेण आणि गोमूत्र अधिक प्रभावी असते. तेथील गावांतील शेतकर्‍यांना गोविज्ञान संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले व गाई आणि काही सोयी देण्याची जबाबदारी ‘कमिन्स’ कंपनीने स्वीकारली. पहिल्यांदा शेतकरी हे प्रयोग करायला तयार नव्हते. पण, येणारा अनुभव मोठ्या प्रमाणावर यशाचा आहे असे म्हटल्यावर त्याचा स्वीकार केला. यातील महत्त्वाची बाब म्हणजे एक एकराला लागणारे गाईचे आणि बैलाचे असे शेण फक्त दहा किलो असे दोन-तीन वेळा दिले की पुरते. त्याच्या जोडीला अर्धा किलो मध आणि पाव किलो गाईचे तूप लागते. नंतर आवश्यकतेनुसार वरील पदार्थाचे रसायन महिन्याला पुन्हा द्यायचे असते. उसासारखे पीक असेल तर हा डोस अधिक लागतो. त्या पिकावर कीड पडण्याची शक्यता असेल, तर शंभर लिटरमध्ये एक लिटर ते दहा लिटर गोमूत्र घातलेले द्रावण फवारायचे असते.
याची शास्त्रीय प्रक्रिया संागताना जाणकार शेतीतज्ज्ञ डॉ. आत्माराम कापरे म्हणाले, जे पीक पेरायचे असेल त्या पिकाच्या बियाणावर, रोपावर किंवा उसासारख्या संदर्भात त्या कांड्यावर वरील पदार्थांच्या मिश्रणाचा (त्याला अमृतपाणी असे नाव दिले गेले आहे) त्या बियाणावर लेप द्यायचा. कांहीसे हाताने चोळायचे व दोन-तीन तास सुकू द्यायचे. त्याची पेरणी किंवा लावणी झाल्यावर त्या शेताला एक महिन्याने १० दिवसांनी तशाच स्वरूपाच्या अमृतपाण्याचा फवारा किंवा सडा शिंपडतो तसे ते पाणी शेतात शिंपडायचे. त्या पिकावर जर कीड पडण्याची शक्यता दिसू लागली तर शंभर लिटर पाण्यात देशी गाईचे एक ते दहा लिटर गोमूत्र मिसळून त्याचा फवारा द्यायचा. मंाजरसुंभे येथील शेतकर्‍यांचा अनुभव असा की, एका एकराला रासायनिक खतांच्या वापराच्या तुलनेत पंचवीस टक्के एवढे अधिक उत्पन्न आले आहे. यापूर्वीही असे अनेक प्रयोग करण्यात आले होते. पण, एखादा संघटित प्रयोग केल्यास त्याचा एकत्रित परिणामच अधिक स्पष्ट होतो. कोल्हापूर जिल्ह्यात अनेकांनी असे प्रयोग केले आहेत आणि त्याला जबरदस्त यशही मिळाले आहे. ऊस वगैरेला लागणारा खर्च आणि छोट्या छोट्या पिकंाना लागणारा खर्च हे पाहिले, तर उसाचा खर्च रासायनिक खतांच्या खर्चाच्या एक दशांश असतो, तर छोट्या पिकांचा खर्च त्याला फार रासायनिक खतेच लागत नसल्याने तो एकचतुर्थांश असतो. यातील एक मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे तो म्हणजे बियाणावरील प्रक्रिया. प्रत्यक्ष अमृतपाणी फवारणी आणि गोमूत्रपाणी फवारणी याचा एखादा डोस जरी कमी झाला किंवा एखादा जादा झाला तर त्यामुळे कोणतेही नुकसान नाही. त्याचप्रमाणे जैविक शेतीच्या उत्पादनाला जे महत्त्व आहे ते आहेच. प्रत्येक पिकाला आणि प्रत्येक जमिनीला हे डोस कसे असावेत, यावर सध्या अनेक अभ्यासक संशोधन करत आहेत. अमृतपाणी करताना जसा मधाचा अणि तुपाचा वापर करण्यात येत आहे, त्याप्रमाणे अजून काही आयुर्वेदीय वनस्पतींचा वापर करण्याचेही प्रयोग सुरू आहेत. अशी माहिती गोविज्ञान संस्थेचे अनिल व्यास यांनी दिली. त्यांचा अजून पंचवीस गावांत हा प्रयोग करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या विषयावर मोठे संशोधन करणारे डॉ. सुभाष पाळेकर यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्याला त्यांनी आध्यात्मिक पाया दिला आहे. याकडे शेतकर्‍यंानी आस्थेने बघण्याची गरज आहे. डॉ. पाळेकर यांच्या या ऋषितुल्य संशोधनाच्या आधारे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रत्येक तालुका पातळीवर मार्गदर्शन केंद्र काढले आहे. त्या राज्यात डॉ. पाळेकर यांच्या प्रयोगासाठी प्रत्येक पद्धतीचे पीक आणि प्रत्येक प्रकारची जमीन यासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढायचे ठरविले आहे. ‘झीरो बजेट’ शेती हा त्यांचा सिद्धान्त आहे. रासायनिक शेतीच्या एकचतुर्थांश ते एकदशंाश खर्चात गोशेती आणि सव्वापट ते दीडपट उत्पन्न हा त्यांच्या शेतीचा आशय आहे. ज्या भागात आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची शक्यता अधिक आहे, तेथे डॉ. पाळेकर यांचे किंवा गोविज्ञान संशोधन संस्थेचे हे प्रयोग होण्याची गरज आहे.
महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात मांजरसुंभे येथे जो प्रयोग झाला, तो आता अजून पंधरा-वीस गावांत व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण अनेकांना तो करावा की करू नये, असा प्रश्‍न पडला आहे. म्हणून काही ठिकाणी तर निम्म्या भागात रासायनिक शेतीचा प्रयोग आणि काही ठिकाणी रासायनिक खताचा निम्मा डोस आणि अमृतपाण्याचा निम्मा डोस असा प्रकार सुरू आहे. कोणतीही नवी कल्पना स्वीकारताना अशीच अवस्था असते. प्रत्येक शेतकर्‍याने यातील शक्यतो प्रयत्न करण्याचा प्रयत्न करावा.
गोविज्ञान संशोधन संस्थेतर्फे हा जसा शेतीचा प्रयोग सुरू आहे, त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात एक गोविज्ञान चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या शिबिराचे प्रमुख डॉ. दिलीप कुलकर्णी होते. पाच दिवसांच्या या शिबिरात अनेकांना पंचगव्यावर आधारित उपचार देण्यात आले. त्यातील जाणकारांनीही दखल घ्यावी अशी बाब म्हणजे कॅन्सर आणि मूत्रपिंड यांच्या विकारांनी ग्रासलेल्या २६ रुग्णांवर त्यात उपचार करण्यात आले. त्यात किडनीचे १२ रुग्ण होते. हे सारे उपचार प्रामुख्याने पंचगव्यातील गोमूत्र, गोमय म्हणजे शेण, तूप, दही आणि दूध यांच्या आधारे करण्यात आले. त्यातील स्मिता गडचे या रुग्णाला तर स्ट्रेचरवरून आणण्यात आले. पण, पंचगव्य ओझोन उपचार यांच्या आधारे त्या पंधराव्या मिनिटाला उठून बसल्या! शिबिराच्या शेवटच्या दिवशी तर अन्य स्वयंसेवक कार्यकर्त्यांच्या बरोबर कामाला लागल्या होत्या. त्याचप्रमाणे ज्यांच्यावर आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस सुरू आहे, त्यांच्यावर केवळ पंचगव्याच्या आधारे केलेल्या उपचारामुळे क्रिटिनीनचा काऊंट अकरावरून तीनवर आला होता. या शिबिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या उपचारांचा नेमका काय परिणाम होतो आहे, हे बघण्यासाठी राज्य शासनाच्या आयुर्वेद विभागाचे वरिष्ठ अधिकारी सतीश डुंबरे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या प्रयोगाच्या आधारे एवढेच म्हणता येईल की, प्रत्येकाने या प्रयोगात सहभागी होणे गरजेचे आहे. गोमूत्राचा व्यक्तिगत उपयोग करण्यापूर्वी आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयोगाचा ठरेल. कारण गोमूत्र हे विरेचक आहे, त्याचा डोस किती ठेवायचा हे वैद्य डॉक्टरांना ठरवू दे. पण, दररोज नाकात एखादा थेंब देशी गाईचे तूप घालायला काही हरकत नाही. दररोज एक थेंब ते अर्धा चमचा तूप अर्धा तासपर्यंत तोंडात ठेवल्यास आणि जिभेने दातावर चोळल्यास फार उपयोग होतो, असा सल्ला डॉक्टर देतात. आपल्याकडून गाय ही दीर्घकाळ दुर्लक्षित राहिली आहे. हे प्रयोग लक्षात घेता, गोशेती व गोआरोग्य यामुळे हे नवे युग सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील शेतजमीन तर गेल्या सत्तर वर्षांतील रासायनिक खतांच्या प्रचंड वापरामुळे करपून गेली आहे. एका बाजूला भरपूर पाणी दिल्यामुळे ती वाया गेली आहे, तर दुसर्‍या बाजूला पाचवीला पूजलेल्या दुष्काळामुळे चांगली जमीनही माळरान झाली आहे. ती पुन्हा चांगल्या पोताची करणे ही बाब गोशेतीमुळे शक्य होणार आहे. आता प्रत्येक व्यक्तीने व त्यातही प्रत्येक शेतकर्‍याने एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे…
मोरेश्‍वर जोशी
९८८१७१७८५५