सुंभ जळाला, पीळ कायम!

0
27

रविवारची पत्रे
ज्या बेगडी धर्मनिरपेक्षता, दांभिक अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि घराण्याचा मिथ्या अहंकार या त्रयीने कॉंग्रेसचे बारा वाजवले ती त्रयी सोडायला किंवा तिचा वास्तविक अर्थ समजून घ्यायला कॉंग्रेस आजही तयार नाही. आपले कुठेतरी चुकले आहे, चुकते आहे यावर आत्मचिंतन करायला कॉंग्रेस तयार नाही. ओमर अब्दुल्लासारख्या मित्राकडून, जयराम रमेशसारख्या कॉंग्रेसी निष्ठावंतांकडून घरचे आहेर मिळत असतानाही कॉंग्रेस सुलतानशाहीतून बाहेर यायला तयार नाही.
‘भारत छोडो’ चळवळीच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त संसदेत स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंस्फूर्त, समयोचित, सर्वसमावेशक, विचारप्रवर्तक विचार मांडले. कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांचे इंग्रजीत लिहिलेले हिंदी भाषण तेवढ्या उंचीवर पोहोचू शकणार नाही याची कल्पना होती, परंतु ते एवढ्या खालच्या पातळीवर, संदर्भहीन मुद्यांवर घसरेल असेही वाटले नव्हते. कॉंग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे म्हणून देशावर पिढ्यान्‌पिढ्या राज्य करण्याचा अधिकार आम्हालाच मिळाला आहे ही कॉंग्रेसची अहंकारी धारणा तसूभरही कमी झालेली नाही. सोनिया गांधींच्या भाषण वाचनातून हे पदोपदी जाणवत होते. ‘चले जाव’ चळवळीत त्या वेळी बाल्यावस्थेत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान नसेलही. परंतु, त्या वेळच्या कॉंग्रेस नामक राष्ट्रीय लोकचळवळीच्या योगदानाचे श्रेय लाटण्याचा नैतिक अधिकार आयत्या बिळावर बसलेल्या सोनिया गांधींना आणि त्यांचा मांडलिक असलेल्या आजच्या कॉंग्रेस नामक राजकीय पक्षाला अजिबात पोहोचत नाही. कॉंग्रेस पक्षाच्या जडणघडणीत नवख्या सोनियाचे काय योगदान होते म्हणून त्यांना पक्षाध्यक्षपद दिले गेले? इंदिरा गांधी यांची एक सून आणि राजीव गांधी यांची बायको, एवढीच ओळख होती ना सोनियांची? ती सर्वसमावेशक कॉंग्रेस चळवळ वेगळी, एका कुटुंबाच्या दावनीला बांधलेली ही कॉंग्रेस वेगळी! शेळीने वाघाचे कातडे पांघरले म्हणून ती वाघ होत नाही. गांधी आडनाव पांघरून गांधी होता येत नाही. भारतासारख्या महान राष्ट्राच्या प्रकृती आणि प्रवृत्ती यांचा गंध नसलेल्या सोनिया गांधींनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये, भारताच्या भविष्याची तोंडदेखली चिंता करू नये. उलट सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांची कॉंग्रेस यांचं काय करायचं ते सूज्ञ भारतीय मतदारच ठरवतील. सुंभ जळाला तरी पीळ कायम आहे, ही म्हण कॉंग्रेस पक्षाला तंतोतंत लागू पडते. म्हणूनच देश कॉंग्रेसमुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करत आहे. आम्ही स्वतंत्र भारतात जन्मलो म्हणून त्या वेळच्या ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी होऊ शकलो नाही. परंतु कॉंग्रेस, वामपंथी आणि सेक्युलॅरिजम हे आजच्या घडीला सर्वाधिक घृणित शब्द आहेत. या तिन्हीपासून भारताला ज्या दिवशी मुक्ती मिळेल तो आमचा खरा मुक्तिदिन असेल! म्हणून ‘चले जाव’ चळवळ पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे.
सोमनाथ देविदास देशमाने
९४२१६३६२९१

आपमतलबी ओरड
तरुण भारतचा अग्रलेख (दि. १२-८) वाचला. अत्यंत परखड अग्रलेखाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन ! याच विषयावर अनेक अग्रलेख आज वाचायला मिळाले पण त्यात हिंदुंनाच (अर्थातच शिवसेना, भाजप आणि संघाला) आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवले ( ते केवळ पोटदुखीमुळे ). एका चर्चासत्रात मात्र एका मुस्लिमाने हे मान्य केले की या देशात हिंदू बहुसंख्य असल्यानेच मुस्लिम सुरक्षित आहेत आणि ती वस्तुस्थिती आहे. माजी उपराष्ट्रपती हामीदभाईंना ते मान्य करायचे नसेल तर त्यांच्याकडे दुर्लक्षच केलेले बरे. या देशातील बहुसंख्य मुसलमान हे मूळचे हिंदूच आहेत. पण बाहेरून आलेल्या मूठभर आक्रमक मुस्लिम लुटारूंविषयी जी आत्मीयता येथील मुसलमान वेळोवेळी दाखवतात त्यामुळे येथील हिंदू समाज अस्वस्थ असतो व त्यातून एखादी अप्रिय घटना घडते. यापूर्वी अनेकदा खेळांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाल्यावर येथील मुस्लिमांनी आनंदोत्सव साजरा केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यावेळी हामीदभाईंसारख्या मुस्लिम नेत्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नाहीत, हेही लक्षात येत असते. लुटारू म्हणून आलेल्या आक्रमक मुस्लिमांनी येथील हजारो मंदिरे उद्ध्वस्त केली (नुकत्याच काही मुस्लिम संस्थांनी हे मान्य केले आहे) ते लक्षात घेऊन तेथील हक्क( फक्त तीन ठिकाणे -अयोध्या, काशी व मथुरा) बिनबोभाटपणे हिंदूंना परत केले तर देशात अतिशय चांगले वातावरण निर्माण होऊ शकते. ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’ हे ब्रीद वाक्य हिंदूंचे वैशिट्य आहे आणि म्हणून हिंदू कधीच कोणाला त्रास देत नाही पण या सद्गुणाचा अतिरेक झाल्यामुळे आक्रमकांचे फावले हे वास्तव आहे. आधीच्या राज्यकर्त्यांनी व काही राजकीय पक्षांनी मुसलमानांची वोट बँक निर्माण करून स्वार्थ साधला हेही कारण या वेळी आठवावे लागते. शेवटी हेच सत्य उरते की जोपर्यंत हिंदू येथे बहुसंख्येत आहेत, तो पर्यंत कितीही हामीद भाई निर्माण झाले तरी मुस्लिमांनी विचलित होण्याची आवश्यकता नाही.
श्रीनिवास जोशी
डोंबिवली (पूर्व)

राहुलबाबाला भाजपा, संघाची कावीळ!
गुजरातेतील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी गेलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व युवानेता राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक झाली. कुठलीही इजा झाली नाही. परंतु, ओरड मात्र अगदी वेदनेने तळमळत आहेत अशी. ही दगडफेक भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली, असे त्यांचे मत. कावीळ झालेल्या माणसाला सर्व गोष्टी पिवळ्या दिसतात, त्याप्रमाणे भाजपा-संघाच्या यशाने चिडलेले आमचे पुतणे यांना सर्वत्र भाजपाच त्याच्या डोळ्यांसमोर दिसतेे. काहीही झाले तरी दोष संघ, भाजपाला देण्याची वाईट सवय लागली आहे कॉंग्रेसला. सतत अपयश, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा कॉंगे्रसला रामराम, त्यामुळे त्याच्या अंगाची लाहीलाही होत आहे. एसीमध्ये बसूनही काहीच उपयोग नाही. आतापर्यंत भारत म्हणजे कॉंग्रेस ही भावना होती, त्याला ओहोटी लागलेली आहे. भाजपा-संघाचे लोक खरेच हिंसक असते, तर १९ महिन्यांची आणिबाणी सहन केली असती काय? राज्यसभा निवडणुकीच्या वेळी ४२ आमदारांना कोंडून ठेवले बंगलोरमध्ये. केरळमध्ये स्वयंसेवकांची हत्या होत आहे. राजेश नावाच्या स्वयंसेवकाच्या अंगावर जखमांच्या ८० खुणा होत्या. हातात अधिकार, सत्ता असली म्हणजे शहाणपण येत नाही. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्याने वर चढले. एकदम वर चढण्याचा प्रयत्न केल्यास पडण्याची शक्यता असते किंवा चढल्यावर तोल जातो. जाऊबाई, पुतणेराजे, दुसर्‍यावर टीका, आरोप करून सत्ता परत मिळविता येणार नाही. आत्मनिरीक्षण करा. राजकारणात शत्रूचे काही चांगले गुण असल्यास शिकावे. आम्ही शक्तिशाली आहोत अशी घमेंड केली की, औरंगजेब किंवा शाहिस्तेखानासारखी फजिती होते. वृथा आत्मविश्‍वास असल्यामुळे गोव्यात सर्वाधिक मोठा पक्ष असताना कॉंग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही. कावीळ झाल्यामुळे एरंडीच्या पानांचा रस तुम्ही घेणार नाही. परंतु, पक्षातील लोकांनी सुचविलेल्या गोष्टींवर विचार, चिंतन करा. राजकारण, परदेशात जाण्याइतके सोपे नाही!
निर्मला गांधी
९४२१७८०२९०

गोकुळाष्टमीचा महिमा!
गोकुळाष्टमी हा सण मुलांना भारी आवडतो. श्रीकृष्णाच्या बाललीलांची माहिती असल्यामुळे मुलांना तो आपला सवंगडीच वाटतो! त्याने गोकुळात केलेल्या गमती, गाई-वासरावरील त्याची माया, मित्रांबद्दल स्नेह, मुरलीचे सूर वगैरे सारेच मुलांना आवडते. पण, त्याबरोबर कृष्णाची मल्लविद्याही त्यांना आवडायला हवी. लहान वयात कृष्णाने तालमीच्या व कुस्तीच्या आखाड्यात मेहनत केली म्हणून कंसमामाने पाठविलेल्या चाणूर व मुष्टीक या मल्लांना तो लोळवू शकला. तेव्हा कृष्णाच्या अंगातील अद्भुत गुणांचे कौतुक करावे नि त्याचे शक्यतोवर अनुकरण करावे.
श्रीकृष्णाला गरीब-श्रीमंत, सुंदर-कुरूप असा भेदभाव वाटत नसे. गाई रानात चरायला नेई त्या वेळी सर्वांची शिदोरी तो व त्याचे मित्र एकत्र करीत. सर्व जण बसून मजेने जेवत. कृष्णाचा आवडता मित्र पेंद्या हा गरीब होता नि कुरूप व लंगडाही होता. पण, तो कृष्णाला फार प्रिय होता. कृष्णाच्या स्वभावातील हा चांगुलपणा अवश्य लक्षात ठेवावा नि तो आपल्या आचरणात आणावा. त्याचप्रमाणे जातिभेद न मानता व गरीब-श्रीमंत असा भेद न करता सर्व मित्रांनी मजेने अधूनमधून वनभोजनाला जावे अन् कृष्णजन्माच्या या अष्टमीच्या दिवशी कृष्णाला आवडणारे पदार्थ खावे. दूध, दही, फळे यांंचा सात्त्विक आहार घ्यावा म्हणजे उपवास आयताच घडेल. पोटाला थोडी विश्रांती मिळेल व शरीर हलके व चपळ बनेल. तेव्हा या दिवशी उपवास अवश्य करावा.
गोकुळात कृष्णाबरोबर गोप-गोपी रास खेळत. मुला-मुलींनी टिपर्‍या खेळाव्या. आपल्याकडे देवीच्या नवरात्रात असा दांडिया मुलं-मुली सुंदर पोषाख घालून खेळतात. त्यामुळे व्यायाम व करमणूक- एकदम मिळतात. श्रीकृष्ण गोकुळात नुसतीच गंमत करीत नव्हता. यमुना नदीतल्या कालिया नागाला त्याने आपल्या शक्तीने हरविले आणि त्याच्या विषाने यमुनेचे पाणी विषमय झाल्यामुळे ते पिऊन गुरे-वासरे व माणसे मरण पावण्याचे संकट त्याने दूर केले. एकदा इंद्राने चिडून अतिशय जोराचा पाऊस पाडला. घरेदारे, गुरे-ढोरे व माणसेसुद्धा वाहून जाण्याचे भय वाटू लागले. तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीने उचलून सर्वांचे रक्षण केले. त्या वेळी सर्वांना धडा मिळाला की, गोवर्धन उचलण्याची सर्व लोकांनी धडपड केली म्हणून कृष्णाने- देवाने त्यांना मदत केली आणि त्यांची धडपड यशस्वी झाली.
आपण मनापासून प्रयत्न करायला हवा म्हणजेच देव आपल्याला मदत करतो. तुम्हाला ठाऊक आहे ना, श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला. पण, त्याचे कर्तृत्व, त्याच्या अंगातील शक्ती इतकी सामर्थ्यवान होती की, तुरुंगाचे गज त्याला कोंडून ठेवून शकले नाहीत! प्रतिकूल परिस्थितीवर जे मात करू शकले तेच सामर्थ्य!
गोकुळाष्टमीच्या दिवशी गोड पक्वान खाऊन खाऊन तोंड गोड होते. पण, कृष्णाच्या चरित्रापासून आपण योग्य बोध घेऊन वागलो, तर आपले सर्व आयुष्यच आपण आनंदमय बनवू शकू…
पुष्पा कठाळे
०७१२-२२८८३१२

घरटे- त्यांचे आणि आपले…
घर हे मनुष्याच्या, प्राण्याच्या, पक्ष्याच्या जीवनातील अतिशय सुरक्षित, विश्‍वसनीय आणि निवान्त स्थान आहे. दिवसभराच्या भ्रमंतीनंतर प्रत्येकाचे आश्रयस्थान म्हणजे घर. संध्याकाळ झाली की गाई हंबरून आपल्या गोठ्याकडे, पक्षी किलबिल करत आपल्या घरट्याची वाट धरतात. मनुष्याच्या, प्राण्याच्या, पक्ष्याच्या जीवनात घराचे मोलाचे स्थान आहे. म्हणूनच तुकडोजी महाराज म्हणतात-
‘‘राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सौख्ये मिळाली या झोपडीत माझ्या…’’ घर असो, झोपडी असो, की महाल, प्रत्येकाला आपल्या घराची ओढ असते. माझ्या राहत्या घरी, लांब चोच असणार्‍या, काळपट रेखीव सुंदर अशा चिमणीवर्गीय एका पक्ष्याने जवळपास तीन वर्षांपासून एक सुंदर, सुबक, रेखीव असे घरटे तयार केले आहे. त्या घरट्यात गेल्या तीन वर्षांपासून तो पक्षी आणि त्याच जातीचे इतर पक्षी दरवर्षी उन्हाळ्यात राहायला येतात. साधारण दोन ते तीन महिने या पक्षीमहोदयांचा माझ्या घरी मुक्काम असतो.
दरवर्षी हे पक्षी दाम्पत्य आपल्या घरट्याची मांडणी मोठ्या उत्साहाने करतात. घरटे बनल्यावर तीन-चार दिवसांनी हा मादीपक्षी अंडे उबवतो. काही दिवसांनी त्या अंड्यातून इवलेसे, लांब चोच असणारे पक्षी डोकावतात. ते इवलेसे पक्षी जेव्हा घरट्यातून डोकावतात तेव्हा खूपच गोजिरवाणे वाटतात. पिलांचे पोषण करण्याचे काम मात्र नरपक्षी करत असतो. रोज आपल्या चोचीत लहान लहान अळ्या व किडे आणण्याचे काम हा पक्षी करतो.
आपल्या पिलांना भरवायचे काम हा नरपक्षी करतो. काही दिवसांनी या पक्ष्यांची लहान लहान पिले मोठी होऊन उडायला लागतात. परत पुन्हा त्याच जागेवर त्याच पक्षीवर्गीय जातीचा दुसरा पक्षी येऊन ते घरटे दुरुस्त करतोे व राहण्यास सुरुवात करतो. पक्ष्यांचा हा नित्यक्रम मी गेल्या तीन वर्षांपासून पाहात आहे. हा पक्षी आमच्या घरातील सदस्यांचा मित्रच बनला आहे. अगदी घरट्यात जाताना हा कानाजवळून उडत जातो. या पक्ष्यांना आमची भीतीच वाटत नाही.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पक्ष्यांनी जी घरट्यासाठी जागा निवडली त्यावरून पक्ष्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करावेसे वाटते. हे घरटे माझ्या घरी असलेल्या विजेच्या मीटरखाली आहे. त्या पक्ष्यांनी निवडलेली जागा अतिशय सुरक्षित आहे. येथे ना मांजर पोहोचू शकत, ना पाल पोहोचू शकत. कोणताही प्राणी त्या पक्ष्यांच्या अंड्यांना इजा पोहोचवू शकत नाही, असा समज कदाचित त्या पक्ष्यांना असावा. घरटे इवलेसे, पण अतिशय सुंदर व रेखीव आहे.
घरट्याच्या आतमध्ये सुंदर कापसाचा बिछाना आहे. हे घरटे म्हणजे काळजीवाहू आदर्श कुटुंबाचे द्योतक आहे. शेवटी मनुुष्य असो वा इवलासा पक्षी असो, प्रत्येक जीवाला आपल्या पिलांची, आपल्या घरट्याची काळजी असते. प्रत्येकाला शेवटी आपल्या कुटुंबाविषयी एक संवेदनशील मन असते. आपल्या घरट्याची, आपल्या पिलांची काळजी अत्यंत जबाबदारीने आणि नेटाने हे पक्षी दाम्पत्य घेत होते. आपल्या कुटुंबाची काळजी जबाबदारीने घ्यायचा वस्तुपाठच या पक्ष्यांनी दाखविला होता…
अभय का. जोशी
९४२१६१०९७५

उशिरा सुचलेले शहाणपण!
कालपरवा विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने एक पत्र प्रत्येक विद्यापीठाला पाठवले आहे. त्यात त्यांनी, या वर्षी म्हणजेच २०१७ साली ‘चले जाव’ आंदोलनाला ७५ वर्षे व स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून देशभरात प्रत्येक महाविद्यालयात, देशासाठी ज्या वीरांनी बलिदान दिले- स्वातंत्र्यसैनिक व देशाचे हुतात्मा यांचे स्मरण करण्यासाठी ९ ऑगस्ट ते ३० ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात ९ ऑगस्टला सकाळी ९.३० वाजता सर्वांनी शपथ घ्यावी, असेसुद्धा नमूद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या दहशतवादमुक्त, गरिबीमुक्त, घाणमुक्त, जातिवादमुक्त भारताचा उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. हे पत्र येताच, देशात चर्चा सुरू झाली की, आदेश योग्य की अयोग्य?
एक विद्यार्थी म्हणून विचार करत असताना, प्रत्येकाला हा निर्णय योग्यच वाटणारा आहे. परंतु, व्यक्तीला किंवा विशिष्ट विचारधारेला विरोध करायचा म्हणून काही नेते लोक या आदेशाला दूषण लावीत आहेत.
आज देशात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी हा, देशभरातील वेगवेगळ्या माध्यमातून येणार्‍या कराच्या माध्यमातून अनुदान घेऊन शिक्षण घेत आहे. परंतु, आज किती लोकांना त्याची जाणीव आहे? तरीही ‘भारत तेरे तुकडे होंगे…’चे नारे लागतातच! ‘काश्मीर मांगे आझादी…’चे नारे लागून, ‘याकुब तर घराघरातून काढू…’ अशी धमकी देणारे नारे काही दिवसांआधी लागलेले आहेतच. त्यामुळेच देशातील सैनिकांचे योगदान व त्यांचे बलिदान विसरू नये यासाठी व आपल्या देशाचा इतिहास समोर यावा, या उद्देशासाठी यूजीसीचा हा निर्णय योग्य वाटतो. फक्त त्याची अंमलबजावणी योग्य व्हावी, ही अपेक्षा!
वैभव बावनकर
९५४५७४५५८०