बाप्पा सांगा कुणाचे?

0
54

अग्रलेख
काही गोष्टी अगदी काहीही झाले तरीही त्या येतच असतात. म्हणजे तुम्ही काही करा अथवा न करा, त्या गोष्टी, घटना काळाच्या एका टप्प्यावर येतातच अन् तुम्ही त्यांना सामोरे जाण्याशिवाय दुसरे काहीही करूच शकत नाही. आता पंधरा ऑगस्ट परवावर आला आहे. हा आपला स्वातंत्र्यदिन आहे. गेली सत्तर वर्षे झालीत स्वातंत्र्यदिन आणि गणतंत्रदिन म्हणजे नेमके काय, हेच बहुतेकांना कळत नाही. या दिवशी नेमके काय झाले होते नि आपण त्या निमित्ताने काय करायचे असते, हेही आपल्याला माहिती नाही. इतके मात्र नक्की की, त्या दिवशी देशात सर्वत्र सुट्‌टी असते. आता तर पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिन मंगळवारी आला आहे. म्हणजे बघा मधल्या सोमवारी सुट्टी टाकली की तीन दिवस आपण आऊटिंगला जाऊ शकतो. त्यातही या वेळी सेकंड सॅटरडे आला असल्याने धमालच आहे. एकुणात चार दिवसांची मौज वाट्याला आली आहे. यालाच स्वातंत्र्य म्हणत असावे. आता या दिवशी झेंडावंदन करायला गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना निमंत्रणे असतात. बरे, नेता असल्याने त्यांना कुणाला ‘नाही’ असे म्हणता येत नाही. त्यामुळे कार्यक्रमांची ‘ही’ गर्दी असते. बापुजींच्या स्वप्नातला देश घडवायचा आहे, अशा खास टायपातली भाषणे करायची असतात. विदर्भातील एका मोठ्या जिल्ह्यातील जिल्हा ठिकाणच्या नगर परिषद अध्यक्षाला खूपच निमंत्रणे होती. गोष्ट आजपासून किमान विसेक वर्षांपूर्वीची आहे. पंधरा मिनिटांच्या अंतरावर कार्यक्रम होते. ते एका कार्यक्रमात गेले अन् म्हणाले, ‘‘मला दुसरीकडे जायचे आहे. लवकर आटपा.’’ आयोजक म्हणाले, बस, झेंडा फडकवा अन् राष्ट्रगीत… तर हे महाभाग म्हणाले, ‘‘राष्ट्रगीत वगैरे राहू द्या, जन गण मन म्हणा अन् मले मोकळा करा!’’ आता नेमके काय नि कशासाठी असते, हे कळत नसणे ही खासियत झालेली आहे. तेही बरेच आहे, कारण आता सारेच संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे जुने माहिती नसणे, हेच बरे असते. आता बघाना हल्दीघाटची लढाई महाराणा प्रताप हरलेच नव्हते, अकबर ही लढाई जिंकलाच नव्हता, असा एक नवा शोध काढण्यात आला आहे आणि अभ्यासक्रमात तसा बदलही करण्यात आला आहे. इतिहासात जे काय घडले ते वास्तव होते की घुसडण्यात आले होते, हेच कळायला मार्ग नाही. तेव्हा जे काय घडले असेल ते कुणाला ठावूक? तेव्हा तसला निर्णय घेणारे किंवा ती घटना ज्या महापुरुषांच्या बाबत घडली ते काही अमक्या जातीचे अन् तमक्या धर्माचे होते, हे कडक इस्त्रीसारखे झालेले नव्हते. जातींना अन् धर्मांना अशी धार आली नव्हती अन् लोक काही आपल्याच जातीच्या गुणवंतांचा जाहीर सत्कार कार्यक्रम करत नव्हते. त्यामुळे आता महापुरुष, घटना आणि स्थळे जातीत विभागली आहेत. जातीची मंडळेही दबंग झालेली आहेत. मताधिकार अन् त्याचे मतमूल्य सार्‍यांनाच कळू लागले आहे. बरे, राजकारण्यांना सार्‍यांचीच मते हवी असल्याने कुणालाच नाराज करून चालत नाही. त्यामुळे आमच्या जातीच्या नेत्यांबद्दल, महापुरुषांबद्दल अमकी तमकी घटना इतिहासात घडलीच नव्हती, असा दावा केला जातो. राजकारण्यांचे कसे असते की, ‘तुझेही बरोबर अन् तुझे तर काही चुकतच नाही’ या त्यांच्या ब्रीदवाक्यामुळे हा आला तर असे अन् तो आला तर तसे, असा त्यांचा खाक्या असतो. हेच सत्य आहे, असे कुणीही म्हणत नाही. मनगटी बळाची दांगट ताकद जिकडे असेल, मताधिक्याचे आधिक्य ज्यांचे असेल त्यांचे म्हणणे सत्य मानायचे असते. त्यामुळे इतिहास आपल्या आताच्या न्याय, अन्यायाच्या तत्त्वावर वाकविला जातो. आता कालौघातही ज्याचे महापुरुष असणे हे कायम आहे, टिकून आहे तोही आपल्यासारखाच माणूस होता अन् त्याचेही पाय थोडेफार मातीचे असू शकतात, त्याच्या भावना अन् वागणे हे सामान्य माणसांसारखेच असू शकते, यावर कुणी विश्‍वासच ठेवत नाही. कारण तो आता देव झाला आहे. त्याच्या मोठेपणावर आमचा समाज, जात, धर्म यांची ठाकुरकी असते. त्याच्यानंतर त्या पदावर पोहोचण्याची लायकी कुणीच दाखविलेली नसते. त्यामुळे एखाद्या शूर लढवय्याने एखाद्या नर्तकीवर प्रेम केले असेल, तर ती त्याची मानवी वर्तणूकच होती, हे मान्य करायला आम्ही तयारच नसतो. त्याने बायको सोडून एखाद्या नर्तकीवर जान नौछावर करणारे प्रेम करणे, हे आता आम्हाला अनैतिक वाटते अन् मग ते तसे नव्हतेच, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही जिवाचा आटापिटा करतो. बरे, काळाच्या मागे जाऊन घटना बदलू शकत नाही. तसे घडलेच नाही, हे सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दंडेली, रग्गेली, मनगटी बळ! आता होते कसे की, वर्गात अफजल खानाचा वध, हा पाठ शिकविला जात असताना वर्गातल्या ‘खाना’कडे पोरं आपली बघतात. खरेतर या खानाचा त्या अफजलाशी कसलाही संबंध नसतो. आता शिवाजी महाराजांनीही त्या खानाला काही तो खान आहे, म्हणून त्याचा धर्म पाहून मारले नव्हते. महाराजांची वाघनखे काही भगवी नव्हती. स्वराज्याच्या आड येणार्‍या कुणालाही महाराजांनी बक्षले नाही. त्याला आडवेच केले. महाराजांनी खानाच्या पोटात बिचवा खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला, हे शिक्षण सांगत असताना मुलांनी वर्गातल्या खानाकडे सहेतूक बघणेही योग्य नाही अन् आपण खान आहोत म्हणजे त्या इतिहासातल्या खानाला असे मारणे, हा आपल्यावर अन्याय आहे, असे आताच्या मुलाने समजणेही चूकच. त्यामुळे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलेच नाही, ते घुसविले गेले आहे. वास्तविक अफजल खानच म्हणाला की, तुम्ही तुमचे स्वराज्य स्थापन करा, असे म्हणून अफजल खान शामियान्यातून बाहेर पडत असताना पाय घसरून पडला आणि टोकदार दगडावर पडून त्याचे खरेतर बोट फाडले, नंतर ते पोट फाटले असे झाले, असा नवाच इतिहास शिकवायचा अन् तेच सत्य आहे, असे म्हणायचे. इतिहासाचे संदर्भ असे वर्तमानातील इगोनुसार बदलून टाकायचे, असा नवा ट्रेंड आला आहे. आता खरेतर इतिहासच शिकवायला नको अन् शिकवायचाच असेल तर आताच्या जाती, धर्म, पंथ यांचे इगो दुखावणार नाहीत, अशा पद्धतीचा सर्वसमावेशक असा इतिहास तयार करून तो शिकवायला हवा. काय आहे कुणाच्या भावना दुखविल्या जाऊ नये. विज्ञान, गणित, शास्त्र असे विषय शिकविताना कुठे जात आडवी येते का? अस्मिता वगैरे दुखावली जाते का? तेही पाहिले पाहिजे. आता गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला, बरेच शोध पाश्‍चिमात्य लोकांनीच लावले आहेत. म्हणजे आमचे पूर्वज काय मूर्ख होते का? ते काही नाही, शोध लागला, अमक्याने लावला असे शिकविण्याचे काही कारण नाही. आता बघाना गणपती लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केला, असेच शिकविले जात होते. हे दिवस आले की, लोकमान्यांच्या नावानेच कल्ला व्हायचा. त्यांनी गणेशोत्सव सुरू केला अन् त्यामुळे आज ही स्थिती आहे, असे म्हणायलाही लोक मागे-पुढे बघत नव्हते. खरेतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी केल्याचा नवा शोध लावण्यात आला आहे. सव्वाशे वर्षांनंतर हा शोध लागला आहे. आता नेमके काय झाले ते एकतर लोकमान्य टिळक यांना, नाहीतर श्रीमंत रंगारी यांनाच माहिती असावे. आपण त्यावर काहीच भाष्य करू शकत नाही. याबाबत अधिकृत रीत्या भाष्य करू शकतो तो आमचा बाप्पाच, पण आता तो इतकी वर्षे येतो आहे अन् दहा दिवसांनी पुढच्या वर्षी येण्याचे वचन देऊन जातो आहे पण तोही कधी काही बोलला नाही. त्यामुळे प्रश्‍न कायम आहे, बाप्पा सांगा कुणाचे?