पुण्यात साकारल्या शाडू मातीच्या गणेशमूतीर्र्

0
22

पंतप्रधानांच्या आवाहनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
पुणे, १२ ऑगस्ट 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यातील आपल्या लोकप्रिय मन की बात कार्यक्रमातून नागरिकांना शाडू मातीच्या गणेश मूर्ती घरोघरी बसविण्याचे आवाहन केले होते. या हाकेला प्रतिसाद देत पुण्याच्या रमणबाग येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या दोन हजारावर मुलांनी शाडू मातीच्या साह्याने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या आहेत.२,१६१ विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती तयार करण्याचा एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. दरवर्षी स्टॉलवर जाऊन बाप्पाची मूर्ती खरेदी करणार्‍या या मुलांनी स्वत: मूर्ती तयार केल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आगळाच आनंद झळकत होता.
या उपक्रमाबाबत शिल्पकार अभिजित धोंडफळे म्हणाले की, दरवर्षी प्रत्येकाच्या घरात गणेश विराजमान होतात. बाप्पाच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात. त्या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केल्यास पर्यावरणाला घातक असल्याने विद्यार्थ्यांनी शाडू मातीची मूर्ती तयार केल्या. यातून पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. पंतप्रधानाच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातील आवाहनाला बच्चे कंपनीने चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी विद्यार्थी हर्षवर्धन शेट्टी म्हणाला की, मी प्रथमच गणपती तयार केला असून, त्याचा वेगळाच आनंद आहे. ही मूर्ती तयार करण्यास मला अर्धा तास लागला. आता प्रत्येकच वर्षी मी बाप्पाची मूर्ती तयार करणार आणि घरी विराजमान करणार आहे. (वृत्तसंस्था)