निव्वळ गुंता ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’

0
143

एका जबरदस्त हिटच्या प्रतीक्षेत असलेल्या बॉलीवूडच्या, या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या सामाजिक संदेश देणार्‍या चित्रपटाकडून बर्‍याच अपेक्षा होत्या. त्यातच गेल्या एक-दीड वर्षात ‘एअरलिफ्ट’, ‘बेबी’, ‘जॉली एलएलबी २’ आणि ‘रुस्तम’सारखे वेगळ्या आणि साामजिक विषयांवरचे चित्रपट करून अक्षय कुमारबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत. दिग्दर्शक श्री नारायण सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या संकल्पनेला मध्यवर्ती ठेवून ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट तयार केला.
मथुरेनजिकच्या एका गावात चित्रपटाची कथा घडते. पत्रिकेत मंगळ प्रभावी असल्याने केशव (अक्षय कुमार) या युवकाचे लग्न जमत नाही. सायकल दुरुस्तीचे दुकान चालविणारा केशव ३६ वर्षांचा झाला आहे. त्याच्या पत्रिकेतील मंगळाचा दोष काढण्यासाठी मल्लिका नावाच्या म्हशीसोबत त्याचे लग्न लावून दिले जाते. एकदा दुरुस्त केलेल्या सायकलची ‘होम डिलेव्हरी’ देण्यासाठी केशव नेमका जयाच्या (भूमी पेडणेकर) घरी जातो. पहिल्याच भेटीत त्यांचे प्रेम जुळते. यथासांग विवाह सोहळा पार पडल्यानंतर जया सासरी येते आणि इथून खर्‍या कथानकाला सुरुवात होते. आपल्या सासरी शौचालय नसल्याचे कळताच अशा घरात राहण्यास ती नकार देते. आपली पत्नी घरात राहावी यासाठी शौचालय बांधले जावे, यासाठी केशवचे प्रयत्न सुरू होतात. पण, अनेक रूढींमुळे घरात शौचालय बांधायला त्याला विरोध होत राहतो. आता या समस्यांना तोंड देऊन केशव आपल्या पत्नीसाठी शौचालय बांधू शकतो? या विषयावरील सामाजिक रूढी दूर सारता येतील? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे चित्रपटातूनच मिळतील.
दिग्दर्शन, छायाचित्रण, संवाद आणि खर्‍या ग्रामीण भागातील चित्रीकरण तसेच, स्वच्छ भारत अभियानातील तरतुदी या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. अभिनयाच्या बाबतीत अक्षय आणि भूमी दोघांचाही अभिनय दर्जेदार आणि सहज वाटतो. इतर कलाकारांनी त्यांना चांगली साथ दिली आहे. चित्रपटाची लांबी आणि लोकप्रिय नसलेली गाणी ही चित्रपटाची कमकुवत बाजू म्हणावी लागेल. पहिल्या भागात केशव-जया यांची प्रेमकथा आणि दुसर्‍या भागात शौचालयासाठीची लढाई असेच या चित्रपटाचे स्वरूप आहे. शौचालयांच्या बांधकामातील घोटाळे आणि ते न बांधण्याविषयीचे सामाजिक समज यावरही चित्रपट भाष्य करतो. चित्रपटात सामाजिक विषय आणि प्रेमकथा असा गुंता झाला आहे.
चित्रपटाचे बजेट साधारण १८ कोटी आहे आणि अक्षय कुमारने चित्रपटासाठी मानधन न घेता, चित्रपटाच्या नफ्यात हिस्सा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय, चित्रपटात अनेक ब्रॅण्ड्‌सचे प्रमोशनही करण्यात आले आहे. देशभरात ३२०० पेक्षा जास्त स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. एकूणच चित्रपटाची रिकव्हरी कॉस्ट १०५ कोटी असल्यामुळे किमान १४० कोटींचा व्यवसाय केल्यासच त्याची गणना हिट चित्रपटांमध्ये होणार आहे. गेल्या काही महिन्यात बॉलीवूडमध्ये हिट चित्रपटांचा दुष्काळ पडला असल्याच्या पृष्ठभूमीवर आणि पुढचा सुट्यांचा आठवडा बघता ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ला चांगला प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा चित्रपट उद्योगात व्यक्त करण्यात येत आहे.
रेवती जोशी-अंधारे