साराहाह ऍपवर लोकांच्या उड्या

0
69

मुंबई, १२ ऑगस्ट 
सध्या फेसबूकच्या न्यूज फीडमध्ये वारंवार साराहाह या ऍपच्या लिंक्स दिसत असून तुम्ही यावरून एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातील गोष्ट सांगू शकता, पण यामध्ये तुमची ओळख गोपनीय राहील.
एखाद्याविषयी तुमच्या मनात असलेले प्रेम किंवा तिरस्कार तुम्ही त्याच्यापर्यंत या ऍपच्या माध्यमातून पोहोचवू शकाल. आपली ओळख गुप्त राहात असल्यामुळे सध्या या ऍपवर अनेकांच्या उड्या पडत आहेत. तुमच्या फेसबूक मित्रांनी तुम्हाला ‘साराहाह’ची लिंक शेअर केली असेलच. सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसात ‘साराहाह’च्या लिंक्सचा पूर आला आहे. या लिंकवर क्लिक करा आणि साईन इन करून एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातला प्रश्‍न विचारू शकता.
‘साराहाह’वर अकाऊंट उघडण्यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोअर किंवा ऍपल स्टोअरवरून ‘साराहाह’ हे ऍप डाऊनलोड करू शकता. आयओएससाठी ‘साराहाह’ची २२ एमबीची, तर ऍन्ड्रॉईडसाठी १२ एमबीची फाईल आहे. ऍप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला साईन इन करावे लागेल. तुमच्या अकाऊंटची मेसेज लिंक फेसबूक अकाऊंटवर शेअर करा. यानंतर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुमचे मित्र तुम्हाला मेसेज पाठवत जातील. मात्र मेसेज पाठवणार्‍या व्यक्तीचे नाव तुम्हाला समजणार नाही, हीच या ऍपची खासियत आहे. तुम्हाला संबंधित मेसेजवर क्लिक केल्यानंतर एक मेसेज बॉक्स दिसेल. तुम्ही त्यावर तुमचे उत्तर लिहून पाठवू शकता. हे ऍप सौदी अरेबियातील जेन अबीदिन तौफिकने तयार केले असून जुलै २०१७ मध्ये हे सोशल मीडिया ऍप अपडेट करण्यात आले आहे.
या ऍपचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. मेसेज पाठविणार्‍या व्यक्तीची ओळख गुप्त राहणार असल्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणालाही कशाही प्रकारचा मेसेज पाठवू शकते. यामध्ये शिवराळ किंवा अश्‍लील मेसेजचाही समावेश होतो. तुम्हाला मेसेज पाठवणार्‍या व्यक्तीची ओळख पटणार नसल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची भीती आहे. अर्थातच अशा मेसेजविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. (वृत्तसंस्था)