६ चेंडूत ६ फलंदाज त्रिफळाचित

0
95

१३ वर्षीय गोलंदाजाची कमाल
लंडन, १२ ऑगस्ट 
इंग्लंडमधील १३ वर्षांचा एक शाळकरी मुलगा ल्यूक रॉबिन्सन सध्या प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या बाल वयात ल्यूकने अशी कमाल केली की क्रिकेट जगतातील बड्या दिग्गजांनी जमले नाही. त्याने सहा चेंडूत (एक षटक) सहा फलंदाजांना त्रिफळाचित करण्याची कमाल केली. हा देखील एक आगळावेगळा विक्रम आहे.
ल्यूकने फिलाडेल्फिया क्रिकेट क्लबच्या १३ वर्षाखालील श्रेणीत या आठवड्यातील सामन्यात विजयी कामगिरी केली. ल्यूकने हा विश्‍वविक्रम रचल्यावर त्याच्या या कामगिरीबद्दल जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ल्यूकने जेव्हा हा अनोखा विक्रम रचला त्यावेळी त्याचे संपूर्ण कुटुंब या सामन्याला हजर होते. ल्यूक स्वप्नपूर्तीचे षटक टाकण्यासाठी आला तेव्हा त्याचे वडील स्टीफन रॉबिन्सन हे पंच म्हणून समोर उभे होते. तर त्याचा भाऊ मॅथ्यू देखील मैदानातच क्षेत्ररक्षण करत होता. तर ल्यूकची आई हेलन ही या सामन्यात धावफलक नोंदण्याची भूमिका बजावत होती. तर ल्यूकचे आजोबा ग्लेन हे प्रेक्षकात बसून त्याचा सामना पाहत होते.
ल्यूकच्या या अनोख्या विक्रमानंतर बोलताना त्याच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी मागील ३० वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. मी देखील एकदा हॅटट्रीक घेतली आहे. पण ल्यूकने केलेला विक्रम आजवर तरी माझ्या ऐकीवात नाही. मी माझ्या मुलाच्या अतुलनीय व अनोख्या कामगिरीने खूप आनंदी आहे. त्याच्या गोलंदाजीदरम्यान मी स्वत: मैदानावर पंच म्हणून होतो हे मी माझे भाग्य समजतो, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. ल्यूकची आई हेलन यांनी अशाप्रकारचा विक्रम नोंदवणारा आपला मुलगा एकमेव असल्याचे सांगितले. ल्यूकच्या अनोख्या विक्रमामुळे क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
दुसरीकडे, विरोधी संघातील एका वरिष्ठ खेळाडूने म्हटले की, हे अगदी खरे आहे. मी अनेक सामने बघितले. गोलंदाजांना हॅटट्रिक घेताना पाहले परंतु; सहा चेंडूत सहा बळी घेणारा गोलंदाज बघितला नव्हता. मी गेल्या ३० वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. खरोखरच मी पूर्वी कधी अशी गोलंदाजी बघितली नाही. त्यावेळी मी स्तब्ध झालो होतो. मी विचार करत होतो की, खरेच असे घडले काय?, अशा शब्दात त्यांनी ल्यूकच्या गोलंदाजीचे कौतुक केले. (वृत्तसंस्था)