टीम इंडियाच्या ६ बाद ३२९ धावा

0
77

शिखर धवनचे दमदार शतक
– श्रीलंकेविरुद्धची तिसरी कसोटी
कँडी, १२ ऑगस्ट 
सलामीचे फलंदाज शिखर धवन (११९) आणि के.एल. राहुल (८५) यांच्या महत्त्वपूर्ण दमदार खेळीच्या भरोशावर टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी आज शनिवारी ६ बाद ३२९ धावांचा पल्ला गाठला.धवन आणि राहुलने भारतीय संघाला सकाळचा सत्रात चांगली सुरुवात दिली आणि पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची मजबूत भागीदारी केली. मात्र, नंतरच्या सत्रात श्रीलंकन गोलंदाजांच्या फिरकीपुढे मध्यम फळीतील फलंदाज संघर्ष करण्यासाठी विवश झाले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ९० षटकांमध्ये सहा फलंदाज गमावून ३२९ धावा बनवल्या आहेत. सलामीवीर शिखर धवनपाठोपाठ चेतेश्‍वर पुजाराही माघारी परतल्याने भारत समाधानकारक धावफलक झळकावू शकला. पुजारा अवघ्या ८ धावा करुन तंबूत परतला.
त्यापूर्वी शतकवीर शिखर धवनला पुष्पकुमारने माघारी धाडले. धवन १२३ चेंडूत ११९ धावा झळकावून माघारी परतला. धवनने १२३ चेंडूत १७ चौकारांसह ११९ धावा केल्या. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक ठरले. मात्र त्यानंतर काहीसा आक्रमक झालेल्या धवनला पुष्पकुमारनेच चंदीमलकरवी झेलबाद केले. धवन बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या २ बाद २१९ अशी होती. दुसरीकडे शतकाच्या दिशेने कूच करणारा के. एल. राहुल मात्र शतकापासून वंचित राहिला. राहुल एक मोठा फटका खेळण्याच्या नादात वैयक्तिक ८५ धावांवर झेलबाद झाला. धवन-राहुलने तब्बल १८८ धावांची भागीदारी करुन दमदार सलामी दिली.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर के.एल. राहुल आणि शिखर धवन यांनी आश्‍वासक सुरुवात केली. सलामीवीरांनी अर्धशतके झळकावत टीम इंडियाची धावसंख्या झटपट शंभरी पार केली. के. एल. राहुल आणि शिखर धवन यांनी आश्‍वासक सुरुवातीनंतर वैयक्तिक अर्धशतके पूर्ण केली. राहुलने ६७ चेंडूत तर धवनने अवघ्या ४५ चेंडूत अर्धशतक झळकावले. राहुलचे हे सलग सातवे अर्धशतक ठरले. दरम्यान, अखिलाडूवृत्तीमुळे निलंबन झालेल्या फिरकीपटू रवींद्र जाडेजाच्या जागी, चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचा या कसोटीत समावेश करण्यात आला आहे.तत्पूर्वी, भारताने या कसोटी मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण तिसरी कसोटी जिंकून श्रीलंका दौर्‍यात नवा इतिहास घडवण्याची संधी विराट कोहलीच्या टीम इंडियाला आहे. भारताने श्रीलंका दौर्‍यातली तीन कसोटी सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली, तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा हा परदेश दौर्‍यातला पहिला क्लीन स्वीप ठरेल. भारताने कसोटी क्रिकेटच्या ८५ वर्षांच्या इतिहासात आजवर कधीही परदेशात निर्विवादरित्या मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाचा श्रीलंकेतला ३-० असा विजय विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा ठरेल.
धावफलक :
भारत : फलंदाजी :
शिखर धवन – ११९ धावा १२३ चेंडू, के.एल.राहुल – ८५ धावा १३५ चेंडू, चेतेश्‍वर पुजारा – ८ धावा ३३ चेंडू, विराट कोहली – ४२ धावा ८४ चेंडू, अंजिक्य राहणे – १७ धावा ४८ चेंडू, रविचंद्रन अश्‍वीन – ३१ धावा ७५ चेंडू, वृद्धीमान साहा – १३ धावा, ३८ चेंडू आणि हार्दिक पांड्या – १ धाव, ६ चेंडू हे दोघे खेळत आहेत.
श्रीलंका गोलंदाजी :
विश्‍व फर्नांडो – १९ षटके ६८ धावा १ बळी, लाहिरु कुमारा – १५ षटके ६७ धावा ० बळी, दिमत करुणारत्ने – ५ षटके २३ धावा ० बळी, दिलरुवान पेरेरा – ८ षटके ३६ धावा ० बळी, लक्षण संदाकन – २५ षटके ८४ धावा २ बळी, मलिंदा पुष्पकुमारा – १८ षटके ४० धावा ३ बळी. घ(वृत्तसंस्था)