साप्ताहिक राशिभविष्य

0
425

१३ ऑगस्ट  ते १९ ऑगस्ट २०१७

मेष-  प्रतिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न
धनेश शुक्र स्वतःच्या धनस्थानी असल्यामुळे या राशीच्या मंडळींना या आठवड्याची सुरुवात आर्थिक लाभ देणारी ठरू शकते. राशीस्वामी सुखस्थानातून उत्तम योग निर्माण करीत असल्यामुळे मान, सन्मान, प्रतिष्ठा जोपासण्याचा आपला प्रयत्न राहील. यामुळे एखादेवेळी अहंकार बळावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. एखाद्याशी भांडण निर्माण झाल्यास प्रथम स्वतःची बाजू तपासून पाहा. काहीजण स्थावर मालमत्तेसंबंधी निर्णय घेऊ शकतील. आठवड्याच्या शेवटी संतती संबंधी काही आनंददायी बातमी कळेल. आपल्या स्वभावात जरा तापटपणा निर्माण होण्याची शक्यता आहे.
शुभ दिनांक- १३,१४,१५,१९.

वृषभ- आर्थिक- व्यावसायिक बळ
आठवड्याच्या सुरुवातीला धनात असणारा राशीस्वामी शुक्र आपल्याला चांगलेच आर्थिक व व्यावसायिक बळ प्रदान करीत आहे. मात्र तो धनयोगासाठी निश्‍चितच उत्तम ठरत असला तरी प्रकृतीला त्रास निर्माण शक्यता राहील. त्यामुळे दगदगीची कामे, प्रवास योग टाळायला हवेत. प्रकृतीसंबंधी काही तक्रारी निर्माण झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. गृहकलह, आपसात मतभिन्नता, गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्या. घरात ज्येष्ठ महिलावर्गाची प्रकृती सांभाळावी लागू शकते. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी दक्षता घ्यावी. सर्व व्यवहारांवर नजर ठेवावी. कुटुंबात धार्मिक कार्याचे आयोजन संभवते.
शुभ दिनांक- १५,१६,१७,१८.

मिथुन-  नोकरी-व्यवसायात तणाव 
या आठवड्यात आपला राशीस्वामी बुध पराक्रम स्थानी असला तरी तो वक्री आहे व तशातच अस्तंगतही होणार असल्याने काही काळ कसोटीचा ठरण्याची शक्यता निर्माण होते. मात्र या सार्‍यात समाधानाची बाब म्हणजे आपली आर्थिक बाजू बरीच सावरलेली राहील. नोकरी-व्यवसायात तणावपूर्ण वातावरण राहील. आपल्याला प्रकृतीची काळजी घेण्यास सुचविणारी स्थिती देखील निर्माण झाली आहे. प्रकृती साथ देणार नाही व कामाचा ताण वाढेल. अशा काळात सहकार्‍यांशी सलोखा ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. त्यांच्या मदतीनेच अडचणीतून मार्ग निघू शकेल. भागीदारीत नुकसान. प्रवास, तीर्थाटनाचे प्रबळ योग येण्याची संभावना आहे.
शुभ दिनांक-१३,१४,१८,१९.

कर्क- कामकाजात प्रगती, उत्साह 
राशीस्वामी चंद्र या आठवड्याची सुरुवात दशमातून करीत आहे, हे एक शुभलक्षणच समजावयास हवे. त्याची ही अनुकूलता आपल्या कामकाजात प्रगती, नोकरी-व्यवसायात उद्दिष्टपूर्ती करून आपला उत्साह टिकवून ठेवणार आहे. तथापि कौटुंबिक वातावरणात काहीसा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तींशी कलह टाळा. गृहकलह, आपसात मतभिन्नता, गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्या. जोडीदाराची प्रकृती सांभाळा. कुटुंबात मतभेद टाळा. भागीदारीच्या व्यवसायात असाल तर मात्र व्यवहारात सावध राहा. पूर्वार्धात सारे मोठे आर्थिक व्यवहार पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविषयक चिंता राहील.
शुभ दिनांक- १५,१६,१७,१९.

सिंह-  अडचणींचा निपटारा व्हावा
या आठवड्याच्या पूर्वार्धात काही अतिशय शुभ ग्रहयोग आपल्या वाट्याला आले आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या व्यावसायिक उत्कर्षातील बर्‍याच अडचणींचा निपटारा या काळात होऊ शकणार आहे. आरोग्य व नोकरीबाबत काही गंभीर त्रास उत्पन्न होणार नसले, तरी काहींना पोटाचे त्रास सहन करावे लागू शकतात. आपल्या सहकार्‍यांशी सहयोग कायम ठेवा. शत्रूच्या कारवायांवर वेळीच अंकुश घाला. विशेषतः रवीच्या राश्यंतरानंतर आर्थिक आघाडीवर समाधानाचे वातावरण राहील. लेखन, साहित्य, कला या क्षेत्रात असणार्‍यांना विशेष लाभ संभवतो. मुलांच्या प्रगतीकडे मात्र जरा लक्ष द्यावे लागेल. शुभ दिनांक- १३,१५,१७,१८.

कन्या- कार्यक्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण 
आपल्या राशीस्थानी सध्या गुरू येऊन बसलेला आहे. त्यामुळे एक सार्वत्रिक सुखदपणा आपल्याला लाभू शकतो. वाईटाच्या संगतीपेक्षा बुद्धिमान लोक सज्जनांच्या सोबतीत राहणे पसंत करतात- तसेच काहीसे या आठवड्यातील ग्रहमानामुळे घडणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील वातावरणात बदल घडून ते आनंदी व उत्साहवर्धक बनावे. व्यवसाय सावकाश का होईना मात्र प्रगती करू लागेल. व्यवसायाच्या निमित्ताने एखादा प्रवास योगही येऊ शकतो. काहींना नोकरीत पदोन्नती, अधिकारवाढ मिळू शकते. कुटुंबात एखादे मंगलकार्यही ठरू शकेल. रवीच्या राश्यंतरानंतर थोडा खर्च वाढण्याची शक्यता आहे. मात्र त्याने आपल्या अंदाजपत्रकावर फारसा भार यावयाचा नाही.  शुभ दिनांक- १६,१७,१८,१९.

तुला- कुसंगती, व्यसने टाळा
या आठवड्यातील ग्रहमान पाहता आपणांवरील फिरून आलेल्या शनीच्या साडेसातीचा दबाव काही प्रमाणात कमी व्हावा असे वाटते. मात्र कुटुंबात मुलांच्या संबंधाने काही काळजीचे किंवा मतभेदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आपल्या स्वभावात जरा तापटपणा निर्माण होण्याची शक्यता असली तरी सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तर आपले काही त्रास आपोआपच कमी होऊ शकतील. बोलून कोणाचेही मन दुखवू नका. कुसंगती, व्यसने टाळण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक स्थितीत काहीशी सुधारणा व्हावी. कुटुंबातील वाद, मतभेद सामोपचाराने मिटवता येऊ शकतील. आठवड्याच्या मध्यात एकादी चांगली घटना आनंद देऊन जाईल.
शुभ दिनांक- १३,१४,१७,१८.

वृश्‍चिक-  व्यावसायिक स्पर्धा वाढणार
आपणांस सध्या साडेसातीचा पुन्हा काही दिवस अनुभव येत आहे. हा काळ काहीसा त्रास वाढविणारा आहे.  आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण राहू शकेल. या प्रतिकूलतेवर मात करून पुढे वाटचाल करण्याची हिंमत बाणावी लागेल. व्यावसायिक स्पर्धेत आपली आघाडी टिकवून ठेवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल. कार्यक्षेत्रात सहकार्‍यांशी सामंजस्याने वागणे आवश्यक आहे. दरम्यान, या राशीच्या कलावंतांना काही उत्तम संधी चालून येतील. कामाचे कौतुक होईल. काहींना स्थानबदल, नोकरीत बदल संभवतात. कुटुंबापासून दूर जाण्याचेही योग आहेत. आठवडाअखेरीस आकस्मिक खर्च, कौटुंबिक अनारोग्य यामुळे मनस्ताप वाढीचे संकेत आहेत.
शुभ दिनांक- १४,१५,१६,१७.

धनु- प्रयत्नांची पराकाष्ठा करावी
सध्या आपण साडेसातीच्या तणावयुक्त कालखंडातून जात आहात. त्यामुळे आपले मनोबल व उत्साह टिकवून ठेवणे आवश्यक आहे. व्यवसाय व नोकरीत आपली कर्तबगारी सिद्ध करून दाखवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागू शकते. कुटुंबात मात्र आपला वट राहील. काही जणांच्या पायाला जणू भिंगरी लागावी असे वारंवार प्रवासाचे योग संभवतात. प्रवासात सतर्क राहायला हवे. पैशांची व सामानाची काळजी घ्यावी. प्रवासात तसेच मित्रमंडळीत कलह- वादविवाद टाळावेत. प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. वाहने सांभाळून चालवावीत. कुटुंबात सहकार्याचे वातावरण राहील. मंगल कार्याची बोलणी वा त्यादिशेने तयारीचा शुभारंभ व्हावा. शुभ दिनांक- १५,१६,१७,१८.

मकर- भागीदारीच्या व्यवसायात यश
राशीस्वामी शनी अतिशय अनुकूल आहे. त्यायोगे व्यावसायिक यशाचा व आर्थिक प्रगतीचा हा आठवडा ठरू शकतो. जोडीदाराचे व्यावसायिक सहकार्य तसेच भागीदारीच्या व्यवसायात यश मिळण्याचे योग प्रबळ होताना दिसत आहेत. नोकरदार वर्गाला देखील चांगले योग यावेत. काहींना लांबच्या प्रवासाचे योग संभवतात. मात्र त्यात दगदग टाळावी. प्रकृती आणि आर्थिक व्यवहाराबाबत बेफिकिरी निर्माण करणारे देखील ग्रहमान आहेत. मात्र प्रकृतीची काळजी घ्यायलाच हवी. व्यसनांपासून सावध रहावे. वाहने सांभाळून चालववीत.  मोठे आर्थिक व्यवहार करताना पुरेशी खबरदारी घेतल्यास नुकसान टाळता येईल.  शुभ दिनांक- १५,१७,१८,१९.

कुंभ- सहकार्‍यांशी मतभेद नको
हा आठवडा आपणांस कार्यसिद्धी व मानसिक समाधान देणारा आहे. व्यवसायात अपेक्षेनुसार अर्थलाभ होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण समाधानाचे राहील. आपल्या स्वभावात आठवडाअखेरीस काहीसा तापटपणा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आपला मित्रपरिवार, कुटुंब व व्यवसायाच्या ठिकाणी होऊ देऊ नका. मित्र व सहकार्‍यांशी मतभेद निर्माण होण्याचा धोका राहील. बोलून कोणाचे मन दुखवू नका. थोडा संयम ठेवणे व प्रतीक्षा करणे लाभाचे राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रकृतीविषयक चिंता निर्माण होऊ शकते. निश्‍चित वेळापत्रक आखून औषध-पाणी, पथ्ये सांभाळली पाहिजेत. वाहने सांभाळून चालवा. शुभ दिनांक- १३,१४,१६,१८.

मीन : नवनवीन संधी लाभणार
या आठवड्यात आपल्याला अतिशय समाधानकारक ग्रहयोग लाभले आहेत.  धन ते पंचम असा चंद्राचा सुखकर प्रवास राहणार आहे. त्यामुळे व्यवसायात किंवा नोकरीत नवनवीन संधी चालून येऊ शकतात. आर्थिक आवक उत्तम राहील. प्रतिष्ठा वाढेल. आपले हितशत्रू जोर धरण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यांना वेळीच आवर घालायला हवा. नंतर मनस्ताप, दगदग करून प्रकृती बिघडवण्यात अर्थ नाही. अपघाताचे भय निर्माण होत आहे. त्यामुळे या आठवड्यात वाहने सांभाळून चालवावीत. रस्त्यावर सदैव सतर्क राहा. त्याचप्रमाणे वाताचा, दम्याचा जुना त्रास असलेल्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून, सावधगिरी बाळगून आपली प्रकृती सांभाळायला हवी. शुभ दिनांक- १३,१५,१७,१९.
– मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६