डोंट वरी बी हॅपी

0
34

आजच्या आधुनिक व्हर्च्युअल दुनियेत जगण्याचं आश्‍वासक टेक्निक
प्रस्तावना
आजच्या तरुण पिढीला अनंत संवाद माध्यमांनी ‘मोहून, घेरून व बंदिस्त’ करून टाकलं आहे. काहींच्या बाबतीत व्यवसायाच्या गरजा दृष्टीने कानाडोळा जरी केला तरी त्याचा अतिरेक होताना दिसतोय! त्यातही आपलं ‘प्रेम, भावना व नातेसंबंध’ याचं प्रदर्शन करण्याची एक स्पर्धा असल्याप्रमाणे सगळे ‘कॉम्प्युटर वा मोबाईल’ मुठीत ठेवण्याच्या भ्रामक कल्पनेत स्वत:च ‘व्हर्चुअल जगाला’ शरण गेली आहेत. हा प्रकार डिसगस्टिंग तर आहेच शिवाय प्रत्येकजण दुसरा किती आहारी गेला आहे या आरोप-प्रत्यारोपात व्यस्त आहे. ‘मी आणि माझं’ या एकेरी प्रवासात दुसर्‍यांच्या भावभावनांना धुत्कारणारी ही जमात आपल्याच तालात बेदरकरपणे आयुष्य गुजारताना स्वत:च्याच तालात वागत व इतरांना वागवत भ्रामक कल्पनांमध्ये रमण्यात धन्य मानत आहे. परिणामस्वरूप ही पिढी आत्मकेंद्रित झालेली असून, त्यांची ही मानसिकता व त्याबरहुकूम वर्तन त्यांच्यासाठीच अनेक समस्या निर्माण करत आहे. ज्याची त्यांना ना साधी जाणीव ना दखल घेण्याची गरज भासत आहे. त्यातही ‘पतिपत्नी’ हे नातं टिकवायचं असेल तर एकमेकांवर प्रेम, गाढा विश्‍वास, निष्ठा, एकमेकांना समजून घेण्याची, समजावून सांगण्याची व त्यासाठी तडजोड करण्याच्या प्रवृत्तीची गरज असते. परंतु, प्रत्येकजण या ‘रॅटरेस’मध्ये आपणच सर्वात व्यस्त असल्याच्या आविर्भावात ‘स्पर्धा व कामाचे प्रेशर’ या अनाकलनीय परिस्थितीच्या भयानकतेची भीती आपल्याच अत्यंत जवळच्या माणसांना घालून जीवनातील साध्या साध्या गोष्टीतून मिळणार्‍या आनंदाला मुकली आहेत. मग अर्थातच ‘मी आणि माझं’ या एकेरी प्रवासात दुसर्‍यांच्या भावभावनांना धुत्कारणारी ही जमात आपल्याच तालात ‘बेदरकरपणे, दिशाहीन व एकल’ आयुष्याच्या प्रवासाला लागलेली दिसते. आम्हा दोघांचं बॉंडिंग खूप मस्त आहे, असे जाहिरातदार खरंतर एकमेकांपासून दुरावत चालल्याची परिस्थिती आहे.
संकल्पना
‘नवरा-बायको’ हे नातं मानवाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग असल्याने साहजिकच या विषयावरील नाटकांना चांगलीच सेलेबिलिटी आहे. ‘टॉम ऍन्ड जेरी, के दिल अभी भरा नही, नवा गडी नवं राज्य, गोष्ट तशी गमतीची, त्या तिघांची गोष्ट, यू टर्न’ या नाटकांना प्रेक्षकांचा लाभलेला प्रतिसाद ‘वरील स्टेटमेंटला’ पुरेसा समर्थनार्थ ठरतो. एका प्रेमविवाहित प्रतीकात्मक जोडप्याच्या माध्यमातून लेखक ‘मिहीर राजदा’ यांनी आजच्या समाजाला एक ‘अलार्मिंग, आयओपनर व टीचिंग’ देण्याचा प्रयत्न केला आहे. विवाहित पतिपत्नीच्या आयुष्यात ‘अलायन्स, कॉन्संट्रेशन व मॅग्नेटिझम’ यांचं ‘अस्तित्व, स्तर व संतुलन’ तपासण्याची संधी दिलेली आहे. या नाटकातील ‘अक्षय आणि प्रणोती’ या व्यक्तिरेखा रंगवताना त्यांना विरुद्ध स्वभावाचे, (रिजिड ऍन्ड फ्लेक्झिबल) दाखवल्याने त्यांच्यातील प्रसंग प्रेमापेक्षाही वादविवादाचे व एकमेकांना दुखावणारे दाखवले आहेत. त्यांची ‘टिपिकल मराठी भाषा, विचारसरणी, भावभावना, प्रसंग व मनाची गुंतागुंत’ हे सारं काही चपखलपणे मांडल्याने ‘मिहिर राजदा’ हा गुजराथी भाषिक लेखक आता पूर्णपणे मराठी नाट्यसृष्टीत रुळल्याचं या नाटकाने सिद्ध केलं आहे. आज ग्लोबलायझेशनमुळे प्रत्येक महानगरात कॉर्पोरेट जीवनशैली घराघरातून दिसत असली तरीही ‘मिडलक्लास फॅमिली’मधील सुखदु:खाचे प्रसंग फारसे बदललेले नाहीत. आपण कितीही ‘मल्टीलिंग्वल’ असल्याचा आव आणला तरीही अशा प्रसंगांना ‘व्यक्त’ होण्यासाठी ‘मातृभाषा’ अटळ असल्याचं ‘मिहीर राजदा’ अधोरेखित करतात, ही बाब निश्‍चितच अभिनंदनीय!
कथासंहिता
अक्षय (उमेश कामत) आणि प्रणोती (स्पृहा जोशी) हे एक प्रेमविवाहित जोडपं. अक्षय एका आयटी कंपनीत ‘रिसर्च इंजिनीअर’ तर प्रणोती एका दूरदर्शन मालिका बनवणार्‍या कंपनीची ‘क्रिएटिव्ह डिरेक्टर’. यांच्या लग्नाला जवळपास तीन वर्षे होऊनही ‘प्रणोतीच्या-बिझी शेड्यूल व सेल्फ क्रिएटेड इश्युज’मुळे ‘हनिमून’ आजतागायत ’पोस्टपोन’ होत गेला आहे. ‘अक्षयला कॉम्प्युटर आणि प्रणोतीला सिरीयल शूट’ यांनी घेरल्याने दोघांनाही एकमेकांसाठी वेळ नाही, ‘पॅरेन्टल रिस्पॉन्सिबिलीटीज पोस्टपोनमेंट’मुळे ‘सेक्स्युअल रिलेशन्स’मधील इश्युज, पीसीओडीसारखी प्रणोतीची समस्या, अक्षयचा ‘स्पर्म काऊंट’ कमी होणं, मूलच न होण्याची शक्यता निर्माण होणं, मग ठरवून दोघांचं ‘विलग होणं’, त्यातूनही प्रणोतीने जीवनाचा आनंद शोधणं, एकटेपणाचा आनंद, स्वातंत्र्याचा आनंद, स्वैरतेचा आनंद आणि त्यातूनही समाधान न मिळाल्यामुळे हरल्याची भावना, एकुणात काय की ‘स्व’च्या पलीकडे विचार न केल्याने व भ्रामक कल्पनांमध्येच सुख शोधण्याच्या धडपडीत ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशा परिस्थितीची जाणीव होणं ही सगळी स्थित्यंतरे एका ओळीत ओवून लेखकाने दिग्दर्शकाच्या हातात सादरीकरण सोपवलं आहे.
सादरीकरण
अद्वैत दादरकर हा एक हुशार दिग्दर्शक व अभिनेता आहे. त्याने हा प्रयोग संयतपणे व सहजपणे बांधला आहे. यातील काही प्रसंगात परिस्थिती केव्हाही टोकाला जाऊ शकेल असं वाटतं, पण दिग्दर्शकाने ते खुबीने टाळलं आहे. अभिनयाच्या बाबतीत ‘उमेश कामत’ या नाटकाचा ‘यूएसपी’ आहे. त्याची ‘चॉकलेट बॉय’ ही इमेज त्याच्या ‘एंट्रीपूर्वीच’ प्रेक्षकांना आपलंसं करते. टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं झालेलं स्वागत त्याला निश्‍चितच ऊर्जा देत असणार, जी त्याने नाटकाच्या शेवटपर्यंत भूमिकेतील सकारात्मकतेच्या साथीने राखली आहे.
अक्षयमधला ‘अकोमोडेटिव्ह पुरुष’ सतत पडती भूमिका घेत, हसत खेळत, मन मारत, तिच्या एककल्ली वर्तनानंतरही प्रणोतीवरील प्रेमाखातर, दुखावण्यातून सावरणं फारच छान पेश केला आहे. यात ‘अक्षय व प्रणोती’मधील भावनिक दरी निर्माण होण्यासाठी त्यांचे प्रेमसंबंध, विचार व दृष्टिकोन स्पष्टपणे दाखवल्याने अक्षय ‘दारुण निराशा, वैफल्य व संताप’ याचं बळी ठरतो. प्रणोतीच्या वागणुकीने खोलवर दुखावलेला व आत्मसन्मानाला इजा पोहोचलेला ‘अक्षय’ संयतपणे, टोनडाऊन करत समर्पित झालेला दाखवताना ‘उमेश कामतने’ त्याचं यशस्वी माघार घेणं, प्राप्त परिस्थितीला स्वीकारणं हे सारं काही मस्तच दाखवलं आहे.
प्रणोती स्वत:वर प्रेम करणारी, हट्टी, दुसर्‍याच्या मनाचा विचार न करणारी, आपलंच म्हणणं खरं करणारी, त्यासाठीची तिची चिडचिड, उद्रेक, ‘टिपिकल स्त्री’ उपहासात्मक बोलणं हे सारं काही चपखलपणे दाखवलं आहे.
उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांची अभिनयाची केमेस्ट्री मस्त जुळलेली आहे परंतु त्यात सर्वात मोठा वाटा हा उमेश कामत या कलाकाराचा व अक्षय या व्यक्तिरेखेचा होय. याच्याविरुद्ध अगदी नाटकाच्या शेवटापर्यंतसुद्धा ‘स्पृहा जोशी व प्रणोती’ प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्यात अपयशी ठरतात. या दोघांच्याही अभिनयाचा पोत वेगवेगळा आहे तरी परंतु या दोघांमधील ‘अंडरस्टँडिंग, मिस-अंडरस्टँडिंग व ताळमेळ’ त्यांच्यातील ‘ऐक्य’ दाखवण्यात यशस्वी ठरतं परंतु याचं श्रेय ‘लेखक मिहीर राजदा’ यांनाच जातं.
या दोघांचा ‘गुजराथी’ मित्र चिंतन (आशितोष गोखले) ‘पैसेवाला,’ ‘हपी गो लकी’, ‘सच्चा साथी, हितचिंतक, मदतगार’ हा सुरुवातीपासून थोडा लाऊड वाटतो. पण, या दोघांना भानावर आणण्यात, तणावपूर्ण परिस्थितीत हास्यलहरी निर्माण करण्यात’ उपयुक्त ठरतो. सुरुवातीला ही भूमिका लेखक मिहीर राजदा स्वत: करत असे परंतु आता ‘गोखले कुलोत्पन्न: – विद्याधर, विजय अशी लीगसी आशितोष गोखलेकडे चालून आली आणि त्याने त्याची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. तरी परंतु त्याचा शब्दाक्रोश अनावश्यक वाटतो.
नेपथ्यकार ‘प्रदीप मुळ्ये’ यांनी एका रंगमंचावर ‘नायक नायिकेचं घर, चिंतनच्या घराची गच्ची व बसस्टॉप या तीन सहजतेने वावरण्याजोग्या जागा सुटसुटीतपणे निर्माण केल्या असून त्याला सुयोग्य प्रकाशयोजना व पार्श्‍वसंगीताची साथ लाभल्याने प्रसंग उठावदार होतात.
सारांश
‘डोन्ट वरी बी हॅपी’ या नाटकाच्या नावातच लेखकाने यातील पात्रांना एक आश्‍वासक विचार रुजवण्याचा प्रयत्न केला आहे आणि रंगमंचीय आविष्कारातून प्रेक्षकांची साथ मिळवली आहे. आयुष्यात अशा गोष्टी घडतंच असतात, म्हणून काही निराश व्हायचं नाही, थांबायचं नाही किंबहुना संकटांना ओलांडून पुढे जायचं आणि आपलं आयुष्य नव्याने सुरू करायचं असंच काहीसं लेखकाला सुचवायचं आहे. लेखकाने ‘अक्षय आणि प्रणोती’ यांच्या माध्यमातून एकमेकांवरील प्रेम, तीन वर्षांपूर्वी झालेला प्रेमविवाह या आनंदी परिस्थितीची ‘व्हर्चुअल जगातील कॉर्पोरेट लाईफस्टाईल’मुळे कशी वाट लागते याचा धडाच या पिढीला शिकवला आहे. हे नाटक ३० ते ४० वयोगटातल्या अविवाहित व विवाहित तरुणाईसाठी असल्याने आणि त्यांना हा ‘विषय व रंगमंचीय बौद्धिक’ पटल्याने तरुणाईचा भरघोस प्रतिसाद लाभलेला आढळतो. अंतत: सकारात्मक विचारांना जोपासतांनाच नकारात्मकतेची किनार लाभल्याने एक विचार करायला लावणारी कलाकृती बघायला मिळते.
– एनसी देशपांडे /९४०३४९९६५४