श्रीकालहस्ती आणि श्रीचिदंबरम्

0
28

या मंदिर समूहापैकी शेवटचं मंदिर आहे आकाशतत्त्वाच्या ‘श्रीचिदंबरा’चं! पुद्दुचेरीपासून ७८ किलोमीटर्स आणि चेन्नईपासून २३५ किलोमीटर्स अंतरावर असलेलं चिदंबरम् नावाच्या तालुक्याचं गाव. गेवा (एुेलेशीळर असरश्रश्रेलहर) या खारफुटी जातीच्या विषारी झुडुपांच्या जंगल परिसरात हे भव्य मंदिर आहे. या झुडुपाला तमिळ भाषेत ‘तिल्लै’ म्हणतात.

‘पंचभूतस्थलं’ या मंदिर समूहात चौथ्या क्रमांकाचं मंदिर आहे आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातलं ‘वायुतत्त्वाच्या श्रीकालहस्ती’चं. तिरुपतीपासून ३६ किलोमीटर्स अंतरावर असलेल्या कालहस्ती गावात स्वर्णमुखी नदीच्या तटावर शिवशंकर वायुतत्त्वात विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. या नावात शिवाच्या अनन्यसाधारण तीन भक्तांची नावं आहेत – श्री नावाचा कोळी (प्राणी), काल नावाचा सर्प आणि हस्ती म्हणजे हत्ती. हा पशुपती आहे हे सांगण्यासाठी त्याचं नावच त्याच्या प्राणी भक्तांच्या नावांवरून ठेवलं आहे. या मंदिराचा उल्लेख जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीच्या तमिळ वाङ्‌मयात आढळतो. या स्थानाला अनेक भाविक दक्षिण काशीही म्हणतात.
या ठिकाणी पहिलं मंदिर पाचव्या शतकात पल्लव राजवंशाच्या राजांनी बांधलं. ११ व्या शतकात त्याचा जीर्णोद्धार षोळ राजांनी केला आणि नंतरचा जीर्णोद्धार विजयनगरच्या कृष्णदेवरायानं केला. तीन गोपुरांपैकी सर्वात उंच गोपूर जवळपास १२० फूट उंच आहे. इथेही विजयनगर साम्राज्याचं स्थापत्यवैशिष्ट्य १००० स्तंभांचा प्रदक्षिणा पथ सदृश्य सभागार आहेच.
मुख्य गर्भगृहाशिवाय इथे १००० लिंग कोरलेलं एक आणखी लिंग आहे. मंदिराच्या गाभार्‍यात अजिबात वारा नसूनही आतल्या नंदादीपाची ज्योत सतत अस्थिर असते म्हणतात. तिच्या प्रकाशात वायुतत्त्वाचं हे स्वयंभू लिंग हलताना दिसतं. हे शिवलिंग अस्पर्शित आहे. इथल्या शिवलिंगावर थेट अभिषेक आणि इतर सजावट करत नाहीत तर इथे असलेल्या उत्सव मूर्तीवरच अभिषेक आणि इतर सोपस्कार केले जातात. कारण वायुतत्त्व हे अदृश्य असतं. त्याचं प्रतिनिधित्व करणारं हे शिवलिंग या श्रद्धेतूनच इथला पूजाविधी निश्‍चित करण्यात आला आहे. दक्षिण भारतातले भाविक इथे कालसर्पदोषाच्या निवारणासाठी येत असतात.
श्रीकालहस्तीश्‍वराचा स्थलवृक्ष म्हणून ‘बिल्ववृक्षा’चे पूजन केलं जातं. इथेही पार्वतीसाठी स्वतंत्र गर्भगृह आहे आणि तिचं नावही सुंदर आहे ‘श्रीज्ञानप्रसूनाम्बिका.’
या ठिकाणी ब्रह्मदेवानं केलेल्या तपश्‍चर्येनं प्रसन्न होत कैलास सोडून श्रीशंकर इथे येऊन राहिले अशी आख्यायिका आहे. ६३ नायन्मारांपैकी एक असलेल्या कण्णप्पाची परीक्षा घेण्यासाठी शंकरानं इथल्या मंदिराच्या भिंतींना हादरे दिले. मंदिर पडेल या भीतीनं भक्त पळून गेलेत, पण कण्णप्पानं मात्र शिवलिंगाचं रक्षण करण्यासाठी स्वतःचं शरीर त्यावर झोकून देलं. तरीही शिवलिंगाच्या डोळ्यातून रक्त येऊ लागलं. ते पाहून कण्णप्पानं कट्यार घेऊन आपला एक डोळा काढला आणि त्या पिंडीच्या रक्त येणार्‍या डोळ्यावर लावला. तर दुसर्‍या डोळ्यातून रक्त येऊ लागलं. म्हणून कण्णप्पानं दुसर्‍या डोळ्याच्या जागेचा नेमका अंदाज यावा म्हणून स्वत:च्या एका पायाचा अंगठा डाव्या डोळ्याच्या ठिकाणी लावला, आणि तो दुसराही डोळा काढू लागला. तेव्हा शंकर स्वत: प्रकटले आणि त्यांनी कण्णप्पाला कैलासाला नेलं.
अशीही आख्यायिका आहे की, निपुत्रिक मृकुंड ऋषींनी शंकराची आराधना केली. प्रसन्न झालेल्या शंकरानं त्यांना दीर्घायुषी पण मतिमंद मुलगा किंवा अल्पजीवी पण मेधावी मुलगा यापैकी एक निवडण्यास सांगितलं. मृकुंड ऋषींनी अल्पजीवी पण अत्यंत मेधावी मुलगा मागितला. तोच हा मार्कंडेय. अवघ्या सोळाव्या वर्षीच त्याचा मृत्यू होता. ती मृत्यूची वेळ जवळ येऊ लागली तसं त्यानं शिवशंकराचा धावा सुरू केला. दक्षिणेतले भाविक असं मानतात मार्कंडेयानं इथेच तप केलं होतं. त्याला यमापासून वाचवण्यासाठी साक्षात शंकर प्रकटले होते. त्याला दीर्घायुष्यासह ‘शैव तत्त्वज्ञाना’चं अतिगुह्यतम ज्ञानही दिलं.
शैवपरंपरेनुसार श्रीकालहस्तीश्‍वर म्हणजेच ‘ज्ञानदक्षिणामूर्ती.’ शंकराच्या या अत्यंत लोकप्रिय दाक्षिणात्य रूपाविषयी आपण मागच्या एका लेखात सविस्तर परिचय करून घेतला होताच त्यामुळे या लेखात पुनरुक्ती टाळते आहे.
वायुतत्त्वाचा श्री ज्ञान दक्षिणामूर्ती कालहस्तीश्‍वर आणि याची पार्वती आहे- ज्ञानप्रसूनाम्बिका. प्रसून म्हणजे पुष्प, फूल म्हणजे ही ज्ञानपुष्पाची आई. असं म्हणतात की, श्रीशिवाकडे असलेल्या ज्ञानाचं तेज इतकं प्रखर आहे की ते ऋषीमुनींनादेखील धारण करणं अशक्य होतं. पण, जगाच्या कल्याणासाठी ते ज्ञान माहीत होणं आवश्यक होतं म्हणून पार्वतीनं धारण केलं आणि सौम्य करून ते जगाला दिलं. हे सांगताना उपमा वापरली आहे ती सूर्य आणि चंद्राची. शिव हा सूर्यासारखा प्रखर आहे आणि पार्वती ही चंद्रासारखी शीतल आहे. ‘तो’ वायुतत्त्वातला ज्ञानदक्षिणामूर्ती आहे आणि ‘ती’ ते ज्ञान धारण करून प्रसृत करते म्हणून ती ज्ञानप्रसूनाम्बिका आहे!
भारतीय ज्ञान हे मौखिक परंपरेतून धारण केलं गेलं, प्रसारित झालं, आणि जपलं गेलं. यात केवळ ध्वनीचा वापर करण्यात येतो. ध्वनिलहरींचा प्रवास पोकळीतून होऊ शकत नाही त्याला वायुतत्त्वच लागतं. श्री ज्ञान दक्षिणामूर्ती हा वायुतत्त्वाचं प्रतीक आहे!
आकाशतत्त्वाचा – श्रीचिदंबरम् आणि श्री शिवाकांशी
या मंदिर समूहापैकी शेवटचं मंदिर आहे आकाशतत्त्वाच्या ‘श्रीचिदंबरा’चं! पुद्दुचेरीपासून ७८ किलोमीटर्स आणि चेन्नईपासून २३५ किलोमीटर्स अंतरावर असलेलं चिदंबरम् नावाच्या तालुक्याचं गाव. गेवा (एुेलेशीळर असरश्रश्रेलहर) या खारफुटी जातीच्या विषारी झुडुपांच्या जंगल परिसरात हे भव्य मंदिर आहे. या झुडुपाला तमिळ भाषेत ‘तिल्लै’ म्हणतात. तोच इथला स्थलवृक्ष आहे आणि हे मंदिर ‘तिल्लै नटराज कोविल’ म्हणून ओळखलं जातं. इथे आकाशतत्त्वाचे ‘श्रीसभानायक’ ‘शिवाकांशी’ विराजमान आहेत!
इसवी सनाच्या दुसर्‍या शतकातल्या तमिळ साहित्यात उल्लेख असलेल्या या मंदिराचा परिसर ५० एकराचा आहे. पल्लव राजांनी इसवी सनाच्या ६ व्या शतकात बांधलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार षोळ राजे, त्यानंतर इसवीसन १२१३ मध्ये ‘अरगलूर उडय ईरारदेवन् पोन् परप्पिनान्’ उपाख्य ‘वन कोवरायन्’ यानं केला. हा कुलोत्तुंग षोळ राजाला समकालीन होता. या मंदिरात पाच सभामंडप आहेत त्यांना अनुक्रमे ‘चिद् सभा,’ ‘कनक सभा,’ ‘नृत्य सभा,’ ‘देव सभा’ आणि ‘याग सभा’ म्हणतात.
मंदिराच्या चार गोपुरांपैकी सर्वात उंच गोपूर २५० फुटाचं आहे. भरतनाट्यम् या अभिजात द्राविड नृत्यशैलीचा उगम ज्या नृत्यमुद्रांमधून त्या शिवशंकराच्या १०८ नृत्यमुद्रा याच गोपुरांवर आहेत.
या स्थानाविषयीच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. एकदा शिवशंकर कैलास पर्वतावरून भिक्षाटनरूपात (दिगंबरावस्थेत) तिल्लैवनात फिरत होता. त्याला कोणीच ओळखलं नाही. तिथे राहणार्‍या ऋषीपत्नींना त्यांच्या पौरुषत्वाचा मोह झाला. चिडलेल्या ऋषींनी सिद्धींचा वापर आधी विविध विषारी साप, एक वाघ शिवावर सोडले. त्यानं सर्व सापांना दागिन्यांप्रमाणे सर्वांगावर खेळवलं आणि वाघाचं कातडं सोलून ते शरीराभोवती गुंडाळलं. शेवटी चिडलेल्या ऋषीगणांनी एक बुटका, उन्मत्त आणि क्रूर राक्षस निर्माण केला. हाच तो ‘अपस्मार’! क्षणार्धात त्याला पालथा पाडून शिव त्याच्या पाठीवर उभा राहून आनंदतांडव करू लागला. तेव्हा सार्‍यांनाच त्याची ओळख पटली.
इथेच श्रीविष्णूनं रचलेलं शिवाचं ‘आनंदतांडव’ आणि शिवकांशीचं ‘लास्य’ नृत्याचे प्रेक्षक म्हणून पतंजली ऋषींच्या रूपातला शेषनाग, शिवभक्त व्याघ्रपद आणि सारी देवसभा आली होती. याचं प्रतीक विश्‍लेषण पुढच्या लेखांकात बघू या.
– डॉ. रमा गोळवलकर ९४२२११४६२०