बलुचिस्तानचा संघर्ष-एक मागोवा…

0
101

बलुचिस्तानमध्ये असा मतप्रवाह आहे की, बलुचिस्तानचा प्रदेश हा कधीच पाकिस्तान वा अफगाणिस्तानचा नव्हता. तो भारताचाही नव्हता. १४१० मध्ये या प्रदेशाची निर्मिती झाली, असा बलुची लोकांचा दावा आहे. पाकिस्तान निर्माण होण्यापूर्वी बलुचिस्तान निर्माण झालेला असल्याने ते आजही स्वत:ला स्वतंत्र मानतात.

‘‘मुझे जिंदगीभर पाकिस्तान में जिनेकी दुवा न दो!’’- हे आर्त उद्गार काढले होते बलुचिस्तान नॅशनल पार्टी (मेंगल) या पक्षाचे सिनेटर हबीब जालिब बलुच यांनी. या बलुच यांची १४ जुलै २०१० रोजी बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथे भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांचा गुन्हा काय? असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. त्यांनी साधारण अपराध केला नव्हता, तर सत्ताधीशांना दुखविण्याचा महागंभीर गुन्हा केला होता. तो म्हणजे त्यांनी पाकिस्तानी कृतघ्नतेचा बुरखा फाडणारे वक्तव्य दिले होते. ‘‘ अ्ल कायदा आणि तालिबान यांना नेस्तनाबूत करण्यासाठी अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तान यांच्यावर युद्ध लादण्याआधी पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली असती तर या दोन्ही दहशतवादी संघटना नेस्तनाबूत झाल्या असत्या.’’- हे आहे आजच्या बलुचिस्तानचे विदारक वास्तव.
१५ ऑगस्ट २०१६ रोजी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलेल्या भाषणात सुमारे एक मिनिट बलुचिस्तानची भयाण स्थिती वर्णन करणारे परखड व स्पष्ट विवेचन केले होते. या त्यांच्या जाहीर उल्लेखाने अनेकांची जिज्ञासा जागृत झाली आणि बलुचिस्तानच्या धगधगत्या समस्येवर जनतेचे प्रबोधन करावे असे वाटले. हेदेखील स्वाभाविकच म्हणावे लागेल. अशी मनस्वी व तीव्र लालसा मराठी भाषकांना परिचित असलेल्या ख्यातनाम लेखक अरविंद व्यं. गोखले यांच्या ठायी निर्माण झाल्याने एका कालसुसंगत प्रभावी पुस्तकाचा जन्म झाला. ‘संघर्ष बलुचिस्तानचा’ हे श्री गंधर्व-वेद प्रकाशनने मे २०१७ मध्ये प्रकाशित केलेले पुस्तक मराठी वाचकांच्या ज्ञानात अमूल्य भर टाकणारे ठरेल, यात शंका नाही.
बलुचिस्तानवर लिहा, अशी प्रकाशकांकडून लेखकाला विनंती करण्यात आल्यावर या प्रांताचा इतिहास माहिती करून घेण्यासाठी त्यांना बरीच धडपड करावी लागली, असे मत लेखकाने मनोगतात व्यक्त केले आहे. त्यांनी असे म्हटले असले, तरी त्यांच्याकडे पाकिस्तानविषयक निदान १०० पुस्तके असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. यात बलुचिस्तानविषयी बरीच माहिती असल्याचेही ते सांगतात. या त्यांच्या विशाल पुस्तकसंग्रहावर कधी धूळ बसू नये याची काळजीही घेतात. यातून त्यांची या विषयाप्रती असलेली ओढ दिसून येते. हे कमी म्हणून की काय, नुकतेच प्रकाशित नासिर दाश्ती लिखित ‘द बलोच ऍण्ड बलोचिस्तान’ हे पुस्तक हाती आल्याने त्यांचे काम सोपे झाल्याची प्रांजळ कबुलीही ते देतात. सदर लेखकाने पाकिस्तानविषयक त्यांचे ज्ञान परिपूर्ण नसल्याचा उल्लेख करून विनयशीलतेचेच दर्शन घडविले आहे, असे म्हणावे लागेल. पाकिस्तान हा अभ्यासाचा विषय आहे हे नक्की, असे मौलिक मत ते नोंदवितात. देशातील बुद्धिजीवी वर्गाने या मताची दखल घेणे गरजेचे आहे.
या पुस्तकात बलुच जनता, कलातची खानसत्ता, बलुचिस्तानचे बेपत्ता, देश बलुचिस्तान, ग्वादरचे दार, संघर्षयात्रा, नवाब अकबर बुक्ती, बहाद्दर नेता, जिहादी जाळ्यात, बलुच आर्त, स्वातंत्र्य की स्वायत्तता? अशी ११ प्रकरणे यात समाविष्ट आहेत. या नामावलीवरून पुस्तकाची व्याप्ती, लेखकाचा व्यासंग व सखोलपणा याची झलक दिसून येते. पुस्तकाच्या शेवटी सविस्तर संदर्भग्रंथ सूची देत पुस्तकाला परिपूर्णता आणली आहे, हे नि:संशय!
बलुच हे प्रामुख्याने भटके लोक आहेत. बलोच किंवा बलुच हा शब्द संस्कृत शब्दापासून तयार झाला असावा, असे लेखकाचे म्हणणे आहे. बल म्हणजे बळ किंवा ताकद आणि ओच किंवा ओज या शब्दाचा अर्थ ओजस्वी, तेज:पुंज अशा अर्थाने घ्यावा लागेल. अशा तेज:पुंज ताकतीच्या लोकांचा प्रदेश तो बलुचिस्तान! बलुच हे एकूण १३० जमातींमध्ये विभागले गेले आहेत. बलुच जनतेची लोकसंख्या पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या तुलनेत जेमतेम ४ टक्के आहे. इराणमध्ये १५ ते २० लाख लोक बलुच भाषा बोलणारे आहेत. पाकिस्तानात ६ लाख बलुच असल्याचे मानण्यात येते. बलुचिस्तानचे क्षेत्रफळ ३ लाख ४७ हजार चौरस कि.मी. इतके आहे. ब्रिटिश भारतात बलुचिस्तानचा प्रदेश वायव्य सरहद्द प्रांताचा भाग मानला जात असे. २०११ च्या जनगणनेनुसार बलुचिस्तानची लोकसंख्या १ कोटी ३१ लाख इतकी होती. यात सिंधी, पंजाबी, हजारा व पठाण या लोकांचा समावेश आहे. बलुचिस्तानचा प्रदेश पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळाच्या ४४ टक्के आहे. या प्रदेशाला ७७० कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे. बलुचिस्तानात एकूण ३२ जिल्हे आहेत. पाकिस्तानी शासकांनी १९४७ पासूनच बलुचिस्तानची पिळवणूक केली आहे. या शतकाच्या सुरवातीला बलुचिस्तानचे दारिद्र्य ४८ टक्के होते, ते १० वर्षांनंतर ५१ टक्क्यांपर्यत पोचले. याचमुळे बलुच माणूस संतप्त झाला आहे. आमच्यापाशी सर्व मुबलक असूनही याचा वाटा आम्हाला का मिळत नाही? ही त्यांची व्यथा आहे.
कोणत्याही भारतीय व्यक्तीने बलुचिस्तानमध्ये जाऊन तेथील अमानवीय स्थितीची ओळख जगास करून देऊ नये यासाठी पाकिस्तानी शासक सतत डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवत असतात. हे दर्शविणारा किस्सा लेखकाने सविस्तरपणे वर्णन केला आहे. तो असा- अरविंद गोखले अनेकदा पाकिस्तानात जाऊन आले. मात्र, त्यांना आजपर्यंत बलुचिस्तानात शिरकाव करता आला नाही. १९८७ साली रिलायन्स विश्‍व क्रिकेट स्पर्धा भारत-पाकिस्तान-श्रीलंका या देशांत भरविण्यात आली. काही सामने क्वेट्यगला झाले. भारताचा एकही सामना तेथे नव्हता. लेखकाने क्वेटा मागूनही त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याऐवजी पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाने त्यांना फैसलाबाद, पेशावर, कराची, लाहोर आणि मुलतान या शहरांना भेट देण्याची परवानगी देण्यात आली.
बांगला देशच्या निर्मितीनंतर बलुचिस्तान आणि तेव्हाचा वायव्य सरहद्द प्रांत यांनी एकत्रितपणे उठाव करण्याची तयारी केली होती, असा तेव्हा आरोप झाला. त्या कटासाठी अताउल्ला मेंगल व घौस बक्श बिझेंजो या नेत्यांना अटक करण्यात आली. उठावाच्या काळात बंडखोरांना शोधून काढून लष्कराच्या ताब्यात देण्यासाठी ज्या जमातीने प्रयत्न केले असे म्हटले जाते ती जमालीनची जमात होती. जफरुल्लाखान जमाली यांच्या घराण्यातील व्यक्तींनी हे काम केले होते. याचे बक्षीस जफरुल्लाखान जमाली यांना मुशर्रफ यांच्या काळात मिळाले. त्यांची थेट पंतप्रधानपदावर नेमणूक करण्यात आली. अशा प्रकारे लष्कराने बलुच जमातीत फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला असला, तरी याने असंतोषाचे शमन होऊ शकले नाही.
पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आय. एस. आय. यांनी गेल्या ७० वर्षांत बलुच जनतेवर केलेल्या अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. त्या भागात राहणारे असोत की, बलुचिस्तानबाहेर असलेले बलुच नागरिक असोत, ते बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी धडपड करणारे आहेत, असा चुकूनही संशय आला तरी त्यांची धरपकड करणे आणि त्यांना नाहीसे करणे हे एकमेव काम यंत्रणेवर सोपविण्यात आले आहे. त्यांची दहशत सर्वत्र पसरली आहे. बेपत्ता झालेले अनेक जण घरी येतात तेव्हा ते मृत झालेले असतात किंवा केव्हाही मृत्यू त्यांना गाठेल, अशी अवस्था झालेली असते. भारताकडून बलुचिस्तानचा प्रश्‍न उपस्थित केला जाताच बलुच जनतेवर सातत्याने राग काढण्यात येत आहे.
चीनचा बलुचिस्तानात मोठ्या प्रमाणात प्रवेश झाल्याने व त्यांच्या रक्षणार्थ पंजाबी लोकांना तेथे स्थायिक केल्याने स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण होऊन आपण अल्पसंख्यक होऊ का? अशी भीती भेडसावू लागली आहे. या चिनी प्रभावाचा भारतावर परिणाम होणे अपरिहार्य आहे. यामुळे या भागातील भूराजकीय परिस्थितीत मोठा बदल घडून आला आहे. या अनुषंगाने लेखकाने चौथ्या प्रकरणात असे स्पष्ट मत मांडले आहे की, पाकिस्तानमध्ये उघड उघड दिसणारे चिनी अस्तित्व रोखायचे असेल, तर बलुचिस्तानमध्ये जे घडत आहे ते आणखी चिघळायला हवे. भारताने या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. मोदींनी बलुचिस्तानविषयी केलेली टिप्पणी याची नांदी ठरू शकेल, असे वाटते.
या प्रांतातील असंतोषाने कोणती चरमसीमा गाठली आहे, याचे मर्मभेदक वर्णन अरविंद गोखले यांनी केले आहे. पाकिस्तानचे जनक महंमद अली जिना यांचे क्वेट्यापासून १३० कि.मी. अंतरावरील झियारत येथे निवासस्थान होते. मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर जिना विश्रांतीसाठी इथे वास्तव्यास होते. १५ जून २०१३ रोजी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने ही इमारत रॉकेटच्या मार्‍याने नष्ट केली. या ऐतिहासिक स्मारकावर पाकिस्तानचा झेंडा फडकत असे, तो लिबरेशन आर्मीने काढून टाकला व तेथे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा झेंडा लावला. १९४८, १९५८, १९६२, १९७३ ते १९७७ या कालखंडामध्ये बलुचिस्तानात बंडखोरी झाली. आज कुठे आहे ती बंडखोरी? असा प्रश्‍न बलुच व्यक्तीला विचारला तर ती म्हणते- ‘‘ती तशी दिसणार नाही, पण बंडखोर कुठे ना कुठे लपलेले आहेत. योग्य वेळ येताच ते बाहेर पडतील.’’ या सर्व बंडखोरीला अत्यंत निर्दयपणे चिरडून टाकण्यात आले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही भूमिगत रीत्या काम करत असते. कुठे ना कुठे स्फोट किंवा हल्ला झाला की त्यामागे ही मुक्तिसेना आहे, हे लक्षात येते व तसा दावाही केला जातो. हे सर्व मुळातूनच वाचणे आवश्यक आहे. याशिवाय त्याची गुंतागुत व गांभीर्य कळू शकत नाही.
या पुस्तकात अनेक बलुच लढवय्यांची तपशिलासह आकर्षक चित्रे आहेत. यात बलुचिस्तानचे आशास्थान असलेल्या ब्रह्मदाग बुग्ती- बलुचिस्तानच्या लढ्याचा एक नवा चेहरा करीमा बलोच, जिच्यावर एका लष्करी अधिकार्‍याने अत्याचार केले त्या साजिया खालिद यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. बलुचिस्तानच्या अवकाशात नव्याने तळपणारा तारा म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या ब्रह्मदाग बुग्ती यांनी भारत, इराण किंवा अन्य कोणत्याही देशाकडून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी मदत दिली गेल्यास त्याला ना असणार नाही, असे म्हटले आहे. ब्रह्मदाग बुग्तींनी २०१६ मधे भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यांनी जिनेव्हामध्ये भारतीय दूतावासाकडे राजकीय आश्रय मिळण्यास्तव अर्ज दाखल केला आहे.
बलुचिस्तानमध्ये असा मतप्रवाह आहे की, बलुचिस्तानचा प्रदेश हा कधीच पाकिस्तान वा अफगाणिस्तानचा नव्हता. तो भारताचाही नव्हता. १४१० मध्ये या प्रदेशाची निर्मिती झाली, असा बलुची लोकांचा दावा आहे. पाकिस्तान निर्माण होण्यापूर्वी बलुचिस्तान निर्माण झालेला असल्याने ते आजही स्वत:ला स्वतंत्र मानतात. स्वातंत्र्यपूर्वकाळात सायमन कमिशनपुढे दिलेल्या साक्षीतच जिनांनी बलुचिस्तान हा पाकिस्तानचा नाही, भारताचाही नाही, असे म्हणत या प्रदेशाला स्वतंत्र ठेवणेच योग्य ठरेल, असे मत मांडले होते. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर ते पहिले गव्हर्नर जनरल झाल्यावर त्यांनी भूमिका बदलली आणि कलातसह सर्व बलुचिस्तान पाकिस्तानातच राहील, असा अट्टहास धरला. अशा अनेक ऐतिहासिक संदर्भांची पुस्तकात रेलचेल आढळते, हेच याचे वैशिष्ट्य आहे.
बलुचिस्तानला स्वतंत्र व्हायचे असेल, तर बांगला देशप्रमाणे तिथे बरीच उलथापालथ व्हायला पाहिजे. बलुचिस्तानशिवाय पाकिस्तान म्हणजे हिर्‍याशिवाय अंगठी, अशी त्यांची अवस्था होईल. बलुचिस्तानला पाकिस्तानच्या जन्मापासून आंदोलन करावे लागले आहे. तेथील जनता आपण स्वतंत्र आहोत या मिजाशीत होती. अर्थात, ही मिजास एक वर्षातच संपुष्टात आली. त्यानंतर बलुचिस्तानवर अक्षरश: नांगर फिरविण्यात आला. पाकिस्तानमध्ये सत्ताधारी कोण होते किंवा कोणी जास्त अत्याचार केले? असा प्रश्‍न विचारण्यात अर्थ नाही. सर्वांनीच त्यांच्यावर अत्याचार करत त्यांचे शोषण केले आहे. भारताला पाकिस्तानची डोकेदुखी कायमची संपवायची असल्यास त्याच्याच भाषेत उत्तर देत, त्यांची ही दुखरी नस सतत दाबत ठेवत नांगी ठेचणे क्रमप्राप्त आहे.
अरविंद गोखले यांनी या पुस्तकाद्वारे सखोल चिंतन करत, संषोधनात्मक खजिनाच वाचकांपुढे उघडा केला आहे, असे म्हटल्यास ते चूक ठरू नये. हे पुस्तक विचारवंतांनी व अभ्यासकांनी संग्रही ठेवण्यायोग्य आहे, असे प्रकर्षाने वाटते.
– सतीश भा. मराठे/९४२२४७७६६८