मुस्लिम भगिनींचे इंद्रेशकुमार यांना रक्षासूत्र बंधन

0
59

नागपूर, १२ ऑगस्ट
महिलांचा सन्मान, परस्परांमधील बंधुभाव आणि सर्वजाती-धर्माचे ऐक्य या माध्यमातून संपूर्ण समाजात सौहार्द निर्माण करण्याच्या हेतूने मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे देशव्यापी स्तरावर रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात येत आहे. यात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेशकुमार यांना मुस्लिम भगिनींनी रक्षासूत्र बांधून उत्सव साजरा केला.
देशभरातील विविध शहरात हा उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आज नागपुरातील हॉटेल जेडी सन्स येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवाला रा. स्व. संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, नगरसेवक संजय बालपांडे, मंचाचे राष्ट्रीय संयोजक विराग पाचपोर, प्रदेश संयोजक फारुख शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर इंद्रेशकुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, रक्षासूत्र बंधन हा सण सर्वांसाठी आहे. यात कोणत्याही धर्माचा अभिनिवेश नाही. परस्परातील स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा हा सण आहे. जात, धर्म विसरून समाजातील एकोपा कायम रहावा हा या उत्सवामागील मुख्य हेतू असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात दिलीप देवधर, विराग पाचपोर, प्रा. विजय केवलरामानी, प्रा. नाजरा सिराज पटेल हाजी अब्दुल कदीर यांचा शाल, श्रीफ़ळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला युवा प्रकोष्ठ प्रमुख दिवाण शाद अली, शहर संयोजक रियाज खान, अन्सार अली, इरशाद हुसैन, अकील खान, रतन बैसवारे आदी उपस्थित होते.