राष्ट्रीय कॅन्सर संस्थेचे आज उद्‌घाटन

0
66

-अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार
-मुख्यमंत्री फडणवीस, रतन टाटा यांची उपस्थिती
नागपूर, १२ ऑगस्ट
राष्ट्रीय कॅन्सर संस्थेतर्फे सुरू करण्यात येणार्‍या अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या राष्ट्रीय कॅन्सर हॉस्पिटलचे उद्‌घाटन उद्या रविवार, १३ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा, केंद्रीय कोळसा व नवीकरणीय ऊर्जा मंत्री पीयूष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, सन थर्मास्युटिकल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप सांघवी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आयटीसीचे संजीव पुरी, एस बँकेचे प्रबंध संचालक राणा कपूर, टाटा मेमोरियल ट्रस्टचे डॉ. कैलास शर्मा, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. आशा कापडिया यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थानतर्फे आऊटर हिंगणा रिंग रोड, जामठा येथे कॅन्सर रुग्णांसाठी सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेल्या सुमारे २३ एकर परिसरात रुग्णालय व संशोधन संस्था स्थापन करण्यात येत आहे. या परिसरात कॅन्सर रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे कॅन्सरसारख्या आजारावर प्रभावी उपचारासोबतच मार्गदर्शनाची सोय उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन होणार असून यामध्ये एक्स-रे, अल्ट्रासाऊंड,मेमोग्राफी, सिटी स्कॅन, एमआरआय तसेच पीईटी स्कॅन या रेडिओ निदानासोबतच सुसज्ज प्रयोगशाळा रेडिएशन ऑनकॉलॉजी, किमोथेरेपी, सर्जरी आणि क्रिटिकल केअर आदी सुविधा रविवारपासूनच सुरू होत आहे. मुख,स्तन तसेच मेंदू आणि मानेच्या कर्करोगासंदर्भात पहिल्या टप्प्यातील निदान व परीक्षण करण्याची सुविधा येथे उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांच्या या उपचारासंदर्भात राष्ट्रीय मंच तयार करण्यात आला आहे. पुढील वर्षी दुसर्‍या भागात कर्करुग्णांसाठी आणखी उपचारांच्या सुविधा उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय कॅन्सर संस्थेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन बोर्डाचे प्रमुख ऍड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष खासदार अजय संचेती, महासचिव शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर तसेच वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक आदी समाजातील कॅन्सर रुग्णांना सेवा पुरविण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून सदैव कार्यरत राहणार आहेत.