डोकलाम : मोदी कारकीर्दीचा सुवर्णबिंदू!

0
400

दिल्ली दिनांक
नरसिंह राव पंतप्रधान असताना एका राजाचा किस्सा सांगितला जात असे. एक राजा होता. शत्रूची नजर त्याच्या राज्यावर पडली. शत्रुसैन्य त्याच्या दिशेने निघाले. सेनापतीला हे वर्तमान कळताच त्याने  राजाला सावध केले- ‘‘महाराज! शत्रुसैन्य आपल्या दिशेने निघाले आहे.’’ राजा म्हणाला, ‘‘अच्छा!’’ दोन दिवसांनी सेनापती पुन्हा  म्हणाला, ‘‘महाराज! शत्रुसैन्य आता ५० मैलांवर आले आहे.’’ राजा उत्तरला, ‘‘अच्छा!’’ सेनापतीने दोन  दिवसांनी सांगितले, ‘‘महाराज! फक्त २० मैलांवर शत्रू आला आहे.’’ महाराजांची तीच प्रतिक्रिया! चार दिवसांनी सेनापती म्हणाला, ‘‘महाराज! शत्रू आता आपल्या राजधानीच्या वेशीपर्यंत आला आहे.’’ राजाचे पुन्हा तेच उत्तर! दुसर्‍या दिवशी सेनापती  म्हणाला, ‘‘महाराज! शत्रूने आपल्या नगरात प्रवेश केला आहे. महाराज म्हणाले, ‘‘अच्छा!’’ नंतर सेनापतीने सांगितले, ‘‘महाराज! शत्रूचे सैन्य  राजमहालाच्या दरवाजापर्यंत आले आहे.’’ राजा म्हणाला, ‘‘अच्छा!’’ सेनापतीने  शेवटचा इशारा देत सांगितले, ‘‘महाराज! सैन्य आता महालात शिरले आहे. राजा म्हणाला, ‘‘माझा कमंडलू कुठे आहे?’’ सेनापती म्हणाला, ‘‘तुमच्या आसनाच्या बाजूलाच आहे.’’ सेनापतीला वाटले, राजाच्या कमंडलूत काहीतरी जादू असणार!  राजा आता काहीतरी करणार! राजाने कमंडलू हाती घेत सेनापतीला म्हटले, ‘‘सेनापतीजी! मी आता जंगलात चाललो, तुम्ही राज्य सांभाळा!’’ राजाही गेला आणि राज्यही गेले!
मोदींचा ठाम निर्णय!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे होऊ दिले नाही. चिनी सैन्य मागील काही वर्षांपासून दरवर्षी एक किलोमीटर याप्रमाणे डोकलामचा रस्ता तयार करीत होते. चिनी सीमा ते डोकलाम  हा भाग निर्जन आहे. डोकलामपर्यंत एक रस्ता आहे. त्या रस्त्यावरून जीपसारखे वाहन जा-ये करू शकते. मात्र, डोकलाम उंचीवर आहे. तेथून चीनच्या सैन्यावर सहज मारा करता येऊ शकतो. या जीपचा मार्ग रोखता येऊ शकतो. यावर उत्तर म्हणून चीनने रस्ता तयार करण्याचा कार्यक्रम मागील काही वर्षांपासून हाती घेतला होता. दरवर्षी फक्त एक किलोमीटरचा रस्ता तयार केला जात होता! हा रस्ता नागरिकांसाठी नाही, तर चिनी रणगाडे व चिलखती गाड्या  यासाठी  बांधला जात होता. या रणगाड्यांमधून चिनी सैन्य डोकलामला न्यायचे, वाटेत विरोध झाल्यास तो मोडून काढावयाचा आणि मग भारताचा गळा दाबायचा आणि पूर्वोत्तर भारत गिळंकृत करावयाचा, ही चीनची मोठी योजना!
मोठा निर्णय
चीनच्या या योजनेची कल्पना भारतीय लष्कराला होती. प्रत्येक लष्करप्रमुख पंतप्रधानाला हे सांगण्याचे काम करीत होता. पण, पंतप्रधान- राजाप्रमाणे ‘अच्छा’ म्हणत निर्णय घेण्याचे टाळत होते. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनाही चीनची योजना माहीत होती. त्यांनी पंतप्रधानांना हे सारे सांगून, भारताने आता निर्णय घ्यावा, असे सांगितले.जनरल रावत हे अलीकडच्या काळातील एक सर्वोकृष्ट सेनापती ठरतील असे दिसते. जनरल कृष्णस्वामी सुंदरजी यांच्यानंतर भारतीय लष्कराला दूरदृष्टीचा सेनापती मिळाला नाही. काही सेनापती आदर्श घोटाळ्यात अडकले, काही सुकमा जमीन घोटाळ्यात सापडले, काही जन्मतारखेच्या वादात अडकले. पण, चीन काय करीत आहे याकडे गंभीरपणे लक्ष देऊन सरकारकडून योग्य तो निर्णय करण्याचे साहस-  धाडस कुणी दाखविले नाही. ते जनरल रावत यांनी दाखविले. जनरल रावत यांचे खरोखरीच कौतुक करण्यात आले पाहिजे.  पाकिस्तानची सीमा त्यांना सांभाळावी लागत आहे. काश्मीर खोर्‍यात त्यांना युद्ध लढावे लागत आहे आणि अशा स्थितीत त्यांनी डोकलाम प्रकरणी सरकारने निर्णय घ्यावा, असे सुचविले. म्हणजे तयारी तर त्यांनाच करावी लागणार होती, त्यांना सरकारचा होकार हवा होता. मोदी यांनी या सार्‍याचा विचार करून डोकलाममध्ये चीनचा रस्ता अडविण्याचा निर्णय  घेतला.
परिणाम
भारताच्या ४० जवानांनी बलाढ्य चीनला रोखले. नंतर भारतीय सैनिकांची संख्या ४०० करण्यात आली. तेव्हापासून चीनचा थयथयाट सुरू आहे. कधी चीन तिबेटमध्ये जाऊन तोफा डागतो, कधी युद्धाभ्यास करतो, तर कधी ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये लेख लिहून आपला संताप व्यक्त करतो. भारताला दररोज धमक्या दिल्या जात आहेत- ‘‘आम्ही भारताला धडा शिकवू, आमची ताकद कमी लेखली जात आहे. भारताला दुर्बुद्धी सुचली आहे, भारताला स्वत:च्या ताकदीचा घमंड आला आहे…’’ अशा वेगवेगळ्या धमक्या दिल्या जात आहेत. याचा भारतावर कोणताही परिणाम झालेला नाही. चीनला आपल्या ताकदीवर एवढा विश्‍वास आहे, तर ४०० भारतीय सैनिकांना हटवून त्याने रस्ता बांधकाम सुरू करावे. ते चीनने केलेले नाही. त्याने फक्त ग्लोबल टाइम्समध्ये लेख लिहिणे सुरू ठेवले आहे. आता त्याने डोकलामसमोरच्या भागात आपले ८०० सैनिक तैनात केले आहेत. चीन केवळ धमक्यांवर थांबणार नाही, याची कल्पना भारतालाही आली आहे. दिमापूर व तेजपूर मुख्यालय असलेल्या आपल्या लष्करी पथकांना सज्ज राहण्याचे आदेश लष्कराने जारी केले आहेत. काही भागात लष्कराची तैनाती करण्यात आली आहे.  युद्धाची सारी तयारी केली जात आहे. कारण, चीन काय करील याचा अंदाज कुणालाही आलेला नाही!
अंदाज नव्हता
डोकलाममध्ये भारत आपला रस्ता अडवू शकतो, असे चीनला कधी वाटले नाही. भारताचा निर्णय त्याच्यासाठी आश्‍चर्यकारक राहिला आहे. आपल्या धमक्यांचा भारतावर परिणाम होत नाही, हा त्याच्यासाठी दुसरा धक्का आहे. चीनचे लष्करी सामर्थ्य वाढले आहे. पण, भारताचेही वाढले आहे. भारतीय लष्कर, वायुदल, नौदल चीनच्या सैन्यापेक्षा सरस आहे, असे मानले जाते. त्यामुळे भारताने चीनच्या धमक्यांना घाबरण्याचे कारण नाही. संख्याबळ चीनच्या बाजूने आहे, तर अनुभव भारताच्या बाजूने आहे.
चीनची भूमिका
चीन, धमकीतंत्रात फार पुढे गेला आहे. आता काहीच न करणे त्याला परवडणारे नाही. त्याने काहीच न केल्यास जगात त्याची नाचक्की होणार आहे. अशा स्थितीत चीन काहीतरी करणार, हे पक्के मानले जाते. मात्र, तो डोकलाम भागात काही करणार नाही, असे काहींना वाटते. कारण, भौगोलिकदृष्ट्या त्याला ते परवडणारे नाही. चीन,  पाकव्याप्त काश्मीरमधून भारताच्या सीमेत काहीतरी करील, असे तज्ज्ञांना वाटते. नंतर तो डोकलामच्या बदल्यात सौदेबाजी सुरू करील. म्हणजे डोकलाम चीनच्या डोक्यातून जाणार नाही आणि भारत डोकलाम सोडू शकणार नाही.
पहिली फेरी भारताकडे
डोकलाम प्रकरणात पहिली फेरी भारताने जिंकली आहे. याचे सारे श्रेय  मोदी यांच्याकडे जाते. त्यांनी एक जोखमीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे परिणाम गंभीर असू शकतात, याची कल्पना असूनही त्यांनी डोकलामचा निर्णय घेतला व त्यावर ते ठाम आहेत. याने पहिली फेरी त्यांच्या नावे जमा झाली आहे. डोकलाम प्रकरणाचा शेवट कसा होतो, हे आताच सांगता येणार नाही. मात्र, मोदी यांच्या तीन वर्षांतील कारकीर्दीतील निर्णयांचे मूल्यांकन करावयाचे झाल्यास, डोकलाम हा त्यांच्या कारकीर्दीचा एक सुवर्णबिंदू ठरला आहे!
बांगला देश युद्धाने इंदिरा गांधींचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले तसेच डोकलाम प्रकरणात मोदींचे नाव लिहिले जाईल. पाकिस्तानचे दोन तुकडे करणार्‍या नेत्या म्हणून इंदिरा गांधींचा उल्लेख केला जातो तसेच  एका महासत्तेला- चीनला- आव्हान देणारा पंतप्रधान, अशी मोदींची नोंद होणार आहे!
– रवींद्र दाणी