भंडार्‍यात तिरंगा गेला गगनावेरी

0
68

– हजारोंच्या साक्षीने संकल्पपूर्ती
– १२१ फूट उंच ध्वजस्तंभ
भंडारा, १६ ऑगस्ट 
संपूर्ण विदर्भात आपली वेगळी ओळख निर्माण करीत ३० बाय २० फुटाचा १२१ फूट उंच झेंडा फडकविण्याचा भंडारा नगर परिषदेचा संकल्प पूर्णत्वास गेला आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून स्थानिक नगर परिषदेने ही संकल्पसिद्धी केली. योगायोग असा की सह पालकमंत्री म्हणून जबाबदारी आल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या ऐतिहासिक झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. भंडारा जिल्हा विदर्भात नंबर एक बनविण्याचा निर्धार यावेळी त्यांनी बोलून दाखविला.
ध्वज २४ तास फडकणार
२४ तास फडकणारा १२१ फूट उंचीचा राष्ट्रध्वज विदर्भात एकमेव असून तो उभारण्यासाठी सरकारी पातळीवर तसेच विमान वाहतूक मंत्रालयाची विशेष परवानगी घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी दिली. राष्ट्रध्वज उभारण्याबाबत असलेल्या नियमात सरकारने काही बदल केले असून, त्यानुसार १०० फुटाच्या वर असलेले राष्ट्रध्वज २४ तास फडकवता येतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
स्वातंत्र्यपूर्व काळात शहीद झालेल्या भंडारा येथील वीरांचा सन्मान व शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नगराची वेगळी ओळख निर्माण व्हावी, या हेतूने भंडारा नगर परिषदेने स्थानिक गांधी चौकात १२१ फूट उंचीचा राष्ट्रध्वज फडकविण्याचा निर्णय घेतला. कमी वेळात ही संकल्पपूर्ती करावयाची असल्याने दिवसरात्र काम करून स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधण्यात आला.
यावेळी आमदार परिणय फुके, आ. रामचंद्र अवसरे, आ. चरण वाघमारे, आ. बाळा काशीवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी, जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज, भंडारा नपचे उपाध्यक्ष रूबी चढ्‌ढा, भाजपा जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, मुख्याधिकारी अनिल अढागळे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी केले. सर्वात उंच झेंडा लावण्यामागील पार्श्‍वभूमी, आगामी वर्षभरात करावयाच्या कामाची माहिती देत त्यांनी भंडार्‍याला शुद्ध पाणी व स्वच्छ वातावरण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
नागपूरच्या धर्तीवर विकास
यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी नागपूरच्या धर्तीवर भंडार्‍याचा विकास ही आता आपली जबाबदारी असून, पंतप्रधानांच्या दहा कलमी कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नरत राहू, असे आश्‍वासन दिले. नगराध्यक्ष सुनील मेंढे यांचे या आयोजनासाठी त्यांनी कौतुकही केले.
हा ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यासाठी भंडारा आणि परिसरातील हजारो नागरिक गांधी चौकात एकत्रित आले होते. सहपालकमंत्री बावनकुळे यांनी रिमोटद्वारे ध्वजारोहण केले. यावेळी नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे भारत मातेचा जयघोष करण्यात आला. गांधी चौकात लागलेला हा राष्ट्रध्वज भंडाराच नाही तर विदर्भातही आकर्षणाचा विषय ठरेल, यात शंका नाही.