चौफेर

0
125

व्वा! अशोकराव!

मा. अशोकराव चव्हाण,
माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, नांदेड.
ह. मु. मुंबई.
सप्रेम नमस्कार!
राजमान्य राजेश्री. पत्र लिहिण्यास कारण की, परवा आपण एक भलामोठा विनोद केल्याचे समजले. दूऽऽर राजधानीत केलेल्या त्या विनोदावर सारा महाराष्ट्र खळाळून हसला म्हणे! छान टाईमपास झाला बघा! तसेही कॉंग्रेसच्या नेत्यांना आता तेवढेच एक काम राहिले असल्याचे आमचा बबन म्हणाला. बबन! आमचा गडी हो! इतक्यात लयच बिघडलाय् ताल त्याचा. चार पेपर वाचून, दोन-चार चॅनेल्सवर चालणार्‍या कुठल्याही विषयावरच्या निरर्थक चर्चा ऐकून खूप हुशार समजायला लागलाय् स्वत:ला. त्यामुळे, त्याचं म्हणणं तुम्ही नका घेऊ फारसं मनावर. चव्हाण काय नि ओबामा काय, सर्वांनाच फैलावर घेतो तो अलीकडे. तर सांगायचा मुद्दा असा की, सर्वप्रथम आपण केलेल्या ‘त्या’ धाडसी विधानाबद्दल आपल्याला त्रिवार कुर्निसात! खरं तर भाऊ, जाहीर सत्कारच व्हायला हवा तुमचा. तोही भर चौकात. म्हणजे काय? व्हायलाच हवा. केवढ्या त्वेषाने वार केलेत तुम्ही परवा मोदी सरकारवर. म्हणालात, हे सरकार खादाड आहे. भ्रष्टाचारी आहे. ‘‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’’ असं म्हणत सारेच खाताहेत्… व्वा! मानलं बुवा तुम्हाला. खरं सांगतो अशोकराव, ऊर अभिमानानं भरून आला बघा, तुमचा तो आवेश बघून. आठवतं? आदर्श घोटाळ्यात, शहीद सैनिकांचे नाव घेऊन मुंबईत निर्माण केलेल्या एका फ्लॅट स्कीममध्ये आपल्या जवळच्या नातवाईकांना फ्लॅटस् मिळवून दिल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तुम्हाला. नाहीच आठवणार तुम्हाला ते… पण, क्षणभर आम्हालाही विसर पडला बघा त्या घटनेचा, तुमचे कालचे बोलणे ऐकून. आपण केलेले कारनामे विसरूनच समोरच्यावर वार करायचे असतात म्हणे राजकारणात? तुम्ही तर काय राजकारणाचा वारसा घेऊनच जन्माला आला आहात. त्यामुळे स्वत: केलेला आदर्श घोटाळा पदराआड दडवून, जेव्हा तुम्ही मोदी सरकारवर वार करायला आवेशानं तलवार उपसली, तेव्हा तुमच्या हिमतीला तर दादच द्यायला हवी. हो ना? तेव्हा अशोकराव, सलाम तुमच्या त्या करारी बाण्याला… अन् स्वत: घातलेला गोंधळ बेमालूमपणे विसरून जाण्याच्या तुमच्या त्या शैलीलाही…
काय गंमत आहे बघा, कोळशापासून तर टुजीपर्यंत, भ्रष्टाचाराच्या आरोपांचा डोंगर ज्यांच्या माथ्यावर आहे, ए. राजापासून तर सुरेश कलमाडींपर्यंत अन् डॉ. मनमोहनसिंगांपासून तर खुद्द अशोक चव्हाणांपर्यंत ज्या पक्षाचे लोक आजही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे आहेत, त्या पक्षाला आणि त्याच्या नेत्यांना जर आता भ्रष्टाचाराचा वीट आला असेल, तर हा काळाचा महिमा म्हणायचा की सत्ता हातून गेल्यानंतर सुचू लागलेले शहाणपण म्हणायचे, हा तर प्रश्‍नच आहे. पण, ज्या पद्धतीने या पक्षाचे लोक मोदींवर टीकेची बरसात करत सुटलेत अन् भ्रष्ट कारभाराविरुद्धचा त्यांच्या मनातला तिटकारा ज्या तर्‍हेने व्यक्त होतोय् तो बघितल्यावर, सत्तेत असताना आम जनतेच्या भावभावनांचे लचके तोडणारी जमात सत्तेविना कासावीस होत अलीकडे थेट हरीश्‍चंद्राचाच अवतार धारण करू लागलीय् की काय, असा प्रश्‍न पडतो.
मुख्यमंत्री असताना पदाचा गैरवापर करून ज्यांना आदर्श इमारतीत फ्लॅट मिळवून दिला, त्या सासूबाईंना ‘दूरचे नातेवाईक’ संबोधणारे तुम्ही अशोकराव! तुम्हाला केव्हापासून भ्रष्टाचारमुक्तीची स्वप्नं पडू लागली हो? कॉंग्रेस पक्षातल्या एकाहून एका मातब्बर भ्रष्टाचारी नेत्यांविरुद्ध कधी चकार शब्द काढला नाही तुम्ही अन् भाजपाच्या कथित खाबुगिरीवर तुटून पडण्याइतके बळ एकवटू लागलात अचानक?
बरं ते जाऊ द्या! राजकारणात वावरायचं तर असली पोपटपंची करावीच लागते म्हणतात. पण, तुम्हीच सांगा अशोकराव, मोदी सरकारला फेकू फेकू म्हणून हिणवताना जराशी लाज वाटत नाही काहो तुमच्या पक्षाच्या एकाही नेत्याला? तो प्रसंग आठवतो? विलासराव मुख्यमंत्री होते. एका निवडणुकीत महाराष्ट्रातले भारनियमन पूर्णपणे संपविण्याचे आश्‍वासन वारेमाप देत सुटले होते कॉंग्रेसचे नेते. पण, तो शब्द नंतरच्या काळात पूर्ण करता आला नाही तेव्हा ‘‘निवडणुकीत असली आश्‍वासनं द्यावीच लागतात,’’ असं हसत हसत म्हणणारे विलासराव देशमुख तुमच्याच पक्षाचे होते ना? त्याबाबत तुमचा संताप कधी व्यक्त झाल्याचे ऐकिवात नाही, चव्हाणसाहेब! का? ती लोकांची फसवणूकही नव्हती अन् फेकाफेकी तर मुळीच नव्हती, असा दृढ विश्‍वास झालाय् तुमचा? सत्तेची दालनं, खुर्च्या, लाल दिव्याच्या गाड्या गेल्यापासून बरेच बावचळल्यासारखे वागताहेत कॉंग्रेसचे लोक. बेतालही आणि बेलगामही… खरं तर सत्तेतल्या तुमच्या सहा दशकांशी तुलना करावी इतकी कामं गेल्या तीन वर्षांत मार्गी लागली आहेत. त्याबाबत कौतुकाचे चार शब्द तुमच्या तोंडून निघण्याची शक्यता, तर जणू राजकारणातला अनपेक्षित चमत्कार ठरेल. अहो, गेल्या सात दशकांत कायम सत्ता हाताशी राहिली, सार्‍या सुविधा पायाशी लोळण घेत राहिल्या, निर्णय घेण्याचे अधिकार ताब्यात होते, तरीही या राज्याचा विकास करू शकला नाहीत तुम्ही. त्याची थोडीशी खंत बाळगायचे सोडून, लोक या सरकारला कंटाळल्याची खोटी बतावणी करत निघालात? अरे, ते तर तुमच्या कारभाराला कंटाळले होते. म्हणूनच इथून तिथून सगळीकडून तुम्हाला हद्दपार करताहेत लोक आता. ग्राम पंचायतीपासून तर राज्य सरकारपर्यंत, सर्वदूर भाजपाचे सत्तेत येणे हा काय लोक त्यांना कंटाळल्याचा परिणाम आहे? तुम्हाला तर निवडणुकी जवळ आल्याशिवाय त्या परिसरात जाण्याचीही फुरसत होत नाही हो साहेब! अन् आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही शब्द देताहात त्या मिरा भाईंदरच्या विकासाचा? मग इतकी वर्षे तिथला विकास खुंटला त्याला कोण होतं जबाबदार? नरेंद्र मोदी की देवेन्द्र फडणवीस?
तुम्हीच कशाला, सत्ता गमावलेल्या तमाम जनांना आता अचानक तरतरी आली आहे. पुढची अजून कित्येक वर्षे ही सत्तासुंदरी ताब्यात येण्याची शक्यता नसल्याच्या वास्तवाने बेचैन झाला आहात तुम्ही सारे. मग फेकू म्हणून टर उडविण्याचा प्रकार काय किंवा भ्रष्टाचाराचे पालुपद आळवण्याचा डाव काय, असले निलाजरे प्रकार करून दिवस काढणे सुरू आहे तुमचे. त्यातही आदर्श घोटाळ्यात अडकलेले तुमच्यासारखे नेते जेव्हा इतरांवर भ्रष्टाचाराचा आरोप करता ना, तेव्हा तर हसावं का रडावं तेच कळत नाही बघा! अजून सिद्ध झालेला नसतानाही, पदाच्या वापराचा नुसता आरोप झालेल्या माणसाला मंत्रिमंडळापासून दूर ठेवायला लागणारी ताकद कधीतरी सिद्ध करता आलीय् तुम्हाला? अन् तुमच्या पक्षालाही? कलमाडींसारख्या भ्रष्ट नेत्यांची फौज बाळगणारा पक्ष तुमचा. अरे तुमची तर रीतही ए. राजा, लालू प्रसाद यादवांसारख्या भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालण्याची राहिली आहे. तरीही तुम्ही सांगणार, सध्याचे सरकार खाबुगिरी करतेय् म्हणून? अशोकराव, खरंच कीवच केली पाहिजे बुवा तुमच्या विनोदबुद्धीची!
या देशातल्या लोकांना कवडीची अक्कल नसल्याचा गैरसमज करून घेत सत्ता गाजवत राहिलात आजवर. पण लक्षात ठेवा, आता लोक समजदार झाले आहेत. निवडणुकीच्या काळातली तुमची नौटंकी लागलीच ध्यानात येते आता जनतेच्या. म्हणूनच इतके नक्राश्रू ढाळले तरी मतं पदरात पडत नाहीत अन् सत्ताही हाती गवसत नाहीय् तुमच्या. त्यामुळे होणारा त्रागा मग अशा विनोदबुद्धीतून, कीव करावा इतक्या खालच्या पातळीवरून व्यक्त होतो! खरं ना? पण एक सांगू साहेब! सराव करून घ्या आता. कारण भविष्यात हीच वेळ येणार आहे तुमच्यावर…!
आपला,
एक सामान्य नागरिक.

सुनील कुहीकर ९८८१७१७८३३